(Source: ECI/ABP News/ABP Majha)
वेळ पडल्यास ईडी, सीबीआयकडे जाईन पण अमरावतीच्या पोलीस आयुक्तांना तुरुंगात टाकणारच: आ. रवी राणा
Amravati : अमरावतीच्या पोलीस आयुक्तांनी भ्रष्टाचार करुन खोटे गुन्हे दाखल केल्याचा आरोप आमदार रवी राणा यांनी केला आहे.
अमरावती: वेळ पडल्यास ईडी किंवा सीबीआयकडे जाणार पण पोलीस आयुक्त आरती सिंह यांना तुरुंगात टाकणार असं वक्तव्य आमदार रवी राणा यांनी केलं आहे. आरती सिंह यांनी भ्रष्टाचार केला, खोटे गुन्हे दाखल केलेत असा आरोपही त्यांनी केला आहे. आरती सिंह या अमरावती शहर पोलीस आयुक्त आहेत.
रवी राणा म्हणाले की, "अमरावतीमध्ये आरती सिंह यांनी भ्रष्टाचाराचा कळस गाठला आहे. पैसे घेऊन गुन्हेगारांशी सेटलमेंट त्या करत आहेत. या आधी त्यांनी ज्या-ज्या ठिकाणी काम केलंय त्या-त्या ठिकाणीही असाच भ्रष्टाचार केला आहे. माझ्यावर आणि माझ्या कार्यकर्त्यांवर जो गुन्हा दाखल करायचा आहे तो दाखल करा, त्याला उत्तर मी देईन. अमरावती जिल्ह्यामध्ये जो काही भ्रष्टाचार सुरू आहे, त्या विरोधात मी पंतप्रधान, गृहमंत्री सर्वोच्च न्यायालय तसेच ईडी किंवा सीबीआयकडे जाईन पण आरती सिंह यांना तुरुंगात टाकणारच."
अमरावती महापालिका आयुक्तांवर मागील महिन्यात शाईफेक करण्यात आली होती. या शाईफेक प्रकरणी आमदार रवी राणा यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. आमदार रवी राणा यांना कोर्टाने अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.
अमरावती पोलीस आणि राणा दाम्पत्य यांच्यामध्ये एक प्रकारचा वाद सुरू असल्याचं दिसतंय. खासदार नवनीत राणा यांनी अमरावतीच्या पोलीस आयुक्तांच्या विरोधात संसदेत हक्कभंग दाखल केला आहे. त्यांच्या तक्रारीवरून अमरावती पोलीस आयुक्त, मुंबई पोलीस आयुक्त आणि पोलीस उपआयुक्त, अमरावती यांना 6 एप्रिल रोजी लोकसभा सचिवालयात हजर राहण्याची नोटीस बजावण्यात आली आहे. राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ, मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे, अमरावतीच्या पोलीस आयुक्त डॉ.आरती सिंह आणि अमरावतीचे तत्कालीन पोलीस उपायुक्त शशिकांत सातव यांना ही नोटीस बजावण्यात आली आहे.
संबंधित बातम्या:
- Amravati News : अमरावतीत मनपा आयुक्त शाईफेक प्रकरणी आमदार रवी राणांचा अटकपूर्व जामीन मंजूर
- नवनीत राणांच्या तक्रारीवरून राज्यातील चार अधिकाऱ्यांना नोटीस, लोकसभा सचिवालयात हजर राहण्याचे आदेश
- Ravi Rana: ...तर, मला सभागृहातच फाशी द्या, आमदार रवी राणा यांचे सरकारला आव्हान