Tadoba Tiger Reserve : ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील खुल्या जिप्सी बंद, आता 'हा' पर्याय
चंद्रपूर : तुम्ही जर ताडोबा व्याघ्र प्रकल्पात खुल्या जिप्सीमध्ये फेरफटका मारण्याच्या विचारात असाल, तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. खुल्या जिप्सी बंद करण्याचा निर्णय प्रशासनाकडून घेण्यात आलाय.

चंद्रपूर : ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प म्हणजे भारतातीलच नव्हे तर जगातील पर्यटकांची आवडती 'टायगर सफारी'... मात्र, तुम्ही जर ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात खुल्या जिप्सीमध्ये फेरफटका मारण्याच्या विचारात असाल, तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. ताडोबामध्ये खुल्या जिप्सी बंद करण्याचा निर्णय प्रशासनाकडून घेण्यात आलाय. त्यामुळे आता पर्यटकांना खुल्या जिप्सीमधून सफारी करण्याचा पर्याय नसेल. पर्यटकांच्या सुरक्षेसाठी ताडोबा व्यवस्थापनानं हे महत्त्वाचं पाऊल उचललं आहे. ताडोबा व्याघ्र प्रकल्पात काही दिवसांपूर्वी स्वाती ढुमणे या महिला वनरक्षकाचा वाघाच्या हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू झाला. यानंतर प्रशासनानं उपाययोजनासांठी वेगवान हालचाली करण्यास सुरुवात केली.
ताडोबातील टायगर सफारी दरम्यान तुम्ही उघड्या जिप्सीतून वाघ पाहण्याचा अनेकदा आनंद घेतला असेल मात्र, आता या खुल्या जिप्सीच्या डिजाईनमध्ये मोठा आणि आमूलाग्र बदल करण्याचा महत्वाचा निर्णय ताडोबा प्रशासनाने घेतला असल्याचं ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक डॉ. जितेंद्र रामगावकर यांनी सांगितलं आहे. पर्यटकांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी ताडोबा प्रशासनानं सर्व पर्यटक जिप्सींना जाळी लावण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यासाठी ताडोबा प्रशासनाकडून बंदिस्त जिप्सीचे डिजाईन्स मागविण्यात आले आहेत.
ताडोबा व्याघ्र प्रकल्पात काही दिवसांपूर्वी वाघाच्या जनगणनेचं काम करताना स्वाती ढुमणे या महिला वनरक्षकाचा वाघाच्या हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू झाला. यामुळे पुन्हा एकदा जंगली श्वापदांचा हल्ला हा किती अनपेक्षित असू शकतो हे ठळकपणे समोर आलं. विशेष म्हणजे याआधी देखील ताडोबा आणि उमरेड-कऱ्हांडला व्याघ्र प्रकल्पात वाघाने पर्यटकांच्या जिप्सीचा पाठलाग केल्याच्या घटना समोर आल्या आहेत. तरी देखील अनेकदा पर्यटक सुरक्षेचे नियम धाब्यावर बसवून जवळून वाघ पाहण्याचं, त्यांचा रस्ता अडवण्याचं जीवघेणं धाडस करतात. त्यामुळे पर्यटक जर ऐकत नसतील तर, जिप्सीच्या डिजाईनमध्येच असे बदल करावे ज्यामुळे वाघ किंवा इतर जंगली प्राणी पर्यटकांवर हल्ला करू शकणार नाही, अशी मागणी पुढे आली.
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी जिप्सी कशाप्रकारे असावी यासाठी ताडोबा प्रशासनाने सर्व सामान्य लोकं, स्वयंसेवी संस्था आणि व्यावसायिकांना बंदिस्त जिप्सीचे डिजाईन पाठविण्याचे आवाहन केले आहे. या मधील सर्वोत्कृष्ट डिझाईनला ताडोबा व्यवस्थापनाकडून 25 हजारांचं पारितोषिक देखील दिले जाणार आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या :
- Omicron Variant : कोविशिल्ड लस घेतलेल्यांसाठी आनंदाची बातमी, ओमायक्रॉनचा धोका कमी : संशोधन
- Omicron Variant : ओमायक्रॉनमुळे अमेरिका सतर्क, आंतरराष्ट्रीय प्रवाशांना कोरोना चाचणी अनिवार्य
- माती खाल्ली अन् सवय लागली! लोकांना माती खाण्याचं व्यसन; मोठ्या प्रमाणात होतेय विक्री, काय आहे प्रकार?
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
