Eknath Shinde Journey : रिक्षाचालक ते मुख्यमंत्री व्हाया शाखाप्रमुख; एकनाथ शिंदेंचा संपूर्ण राजकीय प्रवास
Eknath Shinde Journey : एकनाथ शिंदे म्हणजे, कडवट शिवसैनिक आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचे खंदे कार्यकर्ते. आनंद दिघेंनंतर ठाण्यात शिवसेना वाढवण्याचं काम एकनाथ शिंदेंनी एकहाती केलं.
Eknath Shinde Journey : सकाळपासूनच राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी घडत आहेत. शिवसेनेचे प्रबळ नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे पक्षावर नाराज झाले असून सध्या ते पक्षाच्या काही आमदारांच्या गटासह सूरतमध्ये मुक्कामाला आहेत. शिंदे थेट भाजप नेत्यांच्या संपर्कात असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारच अडचणीत येणार का? अशी चर्चा सुरु झाली आहे. विधान परिषद निवडणुकीत (Vidhan Parishad Election 2022) शिवसेनेची मतं फुटल्यानंतर शिवसेनेत भूकंप झाला. त्यानंतर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह शिवसेनेचे काही आमदार नॉट रिचेबल असल्याची माहिती समोर आली. एकनाथ शिंदे तब्बल 35 आमदारांसह सूरतमध्ये असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे सध्या ठाकरे सरकार कोसळणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे.
एकनाथ शिंदे 25 आमदारांसह रात्री उशिरा सूरतच्या ल मेरिडियन हॉटेलमध्ये पोहोचले आणि तिथं त्यांची भाजप नेत्यांशी चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे यानंतर होणाऱ्या राजकीय घडामोडींकडे आता लक्ष लागलं आहे. अशातच संपूर्ण ठाकरे सरकारला वेठीस धरणारे एकनाथ शिंदे म्हणजे, कडवट शिवसैनिक आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचे खंदे कार्यकर्ते. आनंद दिघेंसोबत आपला राजकीय प्रवास सुरु करणारे एकनाथ शिंदे गेली अनेक वर्षे शिवसेनेसोबत सक्रिय राजकारणात आहेत. आनंद दिघेंनंतर ठाण्यात शिवसेना वाढवण्याचं काम एकनाथ शिंदेंनी एकहाती केलं. एवढंच नव्हे तर शिवसेनेनं भाजपला रामराम केल्यानंतर राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्यासोबत महाविकास आघाडी सरकार स्थापन होण्यातही एकनाथ शिंदेंचा मोठा सहभाग होता. जाणून घेऊया एकनाथ शिंदेंची राजकीय कारकिर्द....
एकनाथ शिंदे जरी अस्सल ठाणेकर असले तरी त्यांच्या जन्म ठाण्यात झाला नव्हता. 4 फेब्रुवारी 1964 रोजी साताऱ्यात त्यांचा जन्म झाला. शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या शिंदेंची परिस्थिती तशी बेताचीच. एकनाथ शिंदेंनी लहान वयातच गाव सोडलं आणि ठाण्यात स्थायिक झाले. ठाण्यात आल्यानंतर त्यांनी किसन नगर मनपाच्या शाळा क्रमांक 23 मधून शालेय शिक्षण घेतलं तर मंगला हायस्कूल ज्युनिअर कॉलेजमधून कॉलेज पूर्ण केलं. आर्थिक अडचणींमुळं त्यांना कॉलेज सोडावं लागलं आणि अगदी तरुण वयातच एकनाथ शिंदे यांनी कामाला सुरुवात केली.
सुपरव्हायझर... रिक्षाचालक ते थेट नगरसेवक
सुरुवातीच्या काळात ते ठाण्याच्या प्रसिद्ध वागळे इस्टेटमधील एका माशांचा कंपनीत सुपरव्हायझर म्हणून कामाला होते. कालांतराने त्यांनी ही नोकरी सोडत आत्मनिर्भर व्हायचं ठरवलं आणि ठाण्यात ऑटो रिक्षा चालवू लागले. काम करत असताना एकनाथ शिंदे यांच्या आयुष्याला दोन व्यक्तिंमुळे कलाटणी मिळाली. त्या व्यक्ती म्हणजे, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि ठाण्याचे शिवसेना नेते आनंद दिघे.
वयाच्या अवघ्या 17व्या वर्षी एकनाथ शिंदे यांनी आनंद दिघे यांच्या नेतृत्वात शिवसेनेत प्रवेश केला आणि पक्षाच्या कामाला सुरुवात केली. पक्षाची कामं करताना शिंदेंना आनंद दिघेंचा सहवास लाभला आणि त्यांच्या प्रति विश्वास वाढू लागला. कालांतरानं एकनाथ शिंदे आनंद दिघेंचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जाऊ लागलं. पक्षाप्रतिची निष्ठा पाहुन एकनाथ शिंदेंना त्यांच्या कामाची पावती मिळालीच. 1984 साली वयाच्या विसाव्या वर्षी एकनाथ शिंदे यांच्यावर आनंद दिघेंनी जबाबदारी सोपवली. ठाण्याच्या किसन नगरचं शाखाप्रमुख पद त्यांना देण्यात आलं. इथूनच खऱ्या अर्थानं एकनाथ शिंदेंच्या राजकीय प्रवासाला सुरुवात झाली.
आनंद दिघे यांच्या खांद्याला खांदा लावून एकनाथ शिंदे हे काम करू लागले. पक्षानं दिलेल्या संधीचं शिंदेंनी सोनं करुन दाखवलं.
दरम्यान एकनाथ शिंदे यांच लग्न झालं आणि त्यांनी लता शिंदे यांच्या सोबत संसाराला सुरुवात केली. त्यांना तीन मुलं झाली. दीपेश, शुभदा आणि श्रीकांत. कालांतरानं एकनाथ शिंदेंवर दुःखाचा डोंगर कोसळला. 2000 साल हे शिंदे कुटुंबासाठी अत्यंत वेदनादायी ठरलं. एकनाथ शिंदेंची दोन मुलं दीपेश आणि शुभदा यांचा अपघाती मृत्यू झाला. शिंदे कुटुंबावर दुःखचा डोंगर कोसळला. या दुःखातून बाहेर येण्यासाठी दिघे यांनी शिंदेंना खूप मदत केली. तर एकनाथ शिंदेंचे पुत्र श्रीकांत शिंदे हे सध्या लोकसभेत खासदार असून त्यांनी मेडिकल सेक्टरमध्ये शिक्षण घेतलं आहे.
दुःखातून सावरल्यानंतर एकनाथ शिंदे पुन्हा एकदा राजकारणात सक्रिय झाले. 1984 नंतर आनंद दिघे यांनी एकनाथ शिंदे यांना महापालिकेचं तिकीट दिलं. वर्ष होतं 1997, त्यांनी नगरसेवकची निवडणूक लढवली आणि नगरसेवक म्हणून निवडणून आले. त्यानंतर 2001 साली त्यांना ठाणे मनपाचं सभागृह नेता करण्यात आलं. 2002 साली ते पुन्हा नगरसेवक झाले आणि पुढच्या दोनच वर्षांत त्यांना पक्षाकडून आमदारकीचं तिकीट मिळालं. 2004 च्या निवडणुकीत शिवसेनेचा दारुण पराभव झाला होता, पण एकनाथ शिंदे यांनी बाजी मारली आणि थेट आमदार झाले. 2005 साल हे पुन्हा त्यांच्यासाठी महत्वाचं ठरलं. एकनाथ शिंदे ठाण्यात शिवसेनेचे जिल्हा प्रमुख झाले. कुणा आमदाराला पक्षातील हे पद देण्याची ही पहिलीच वेळ होती.
2009 साली पुन्हा निवडणुका झाल्या आणि शिंदे पुन्हा आमदार झाले. पुढे 2014 उजाडलं. आता राजकारणाची समीकरणं देखील बदलली होती. शिवसेना आणि भाजपची 25 वर्ष जुनी युती संपुष्टात आली होती. तर दोन्ही पक्षांनी स्वबळावर त्या सालची विधानसभा लढवली. शिवसेनेची थोडी पिछेहाट झाली होती. पण शिंदे यांनी पुन्हा गड राखला.
यंदा मात्र त्यांच्यासाठी नवी संधी चालून आली होती. भाजप राज्यात सत्तेत बसली आणि शिवसेना विरोधी बाकावर. त्यावेळी एक महत्वाचा निर्णय मातोश्रीवरून घेण्यात आला. शिवसेना भवनला निरोप धाडला गेला. पक्षाचं पत्रक निघालं आणि एकनाथ शिंदे विरोधीपक्ष नेते झाले. ऑक्टोबर 2019 ते डिसेंबर 2019 ते राज्यात विरोधीपक्ष तर तत्कालीन भाजप सरकारची त्यांनी पळता भुई थोडी अशी हालत करून ठेवली होती. पण नंतर मात्र शिवसेनेचा मनसुबा बदलला आणि सेनेनं भाजपसोबत थेट सत्तेत जाऊन बसली.
2014 ते 2019 दरम्यान शिवसेना भाजपमध्ये अनेक वेळा खटके उडाले, तेव्हा ही ते सगळे वार झेलायला एकनाथ शिंदे पुढे असायचे.
2019 साली राज्यात सत्तांतर झालं. भाजप काही शिवसेनेला मुख्यमंत्री पद देत नव्हतं. त्यामुळे युती पुन्हा फिस्कटली आणि भलतंच समीकरण देशानं पाहिलं. शिवसेना चक्क राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत आघाडी स्थानप करत सत्तेत बसली. बरं मुख्यमंत्री पदाचा पेच कायम होताच. मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार, पण कोण? या शर्यतीत दोन नावं आघाडीवर होती. एक म्हणजे, शिवसेना नेते सुभाष देसाई आणि दुसरं नाव म्हणजे एकनाथ शिंदे. पण शरद पवारांनी आग्रह धरला आणि अखेर स्वतः शिवसेना पक्षप्रमुख असलेले उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले.
एकनाथ शिंदेंचं मुख्यमंत्री पद हुकलं. पण सत्ता स्थापन झाल्यावर सत्तेत कॅबिनेट मंत्री झाले. शिवाजीपार्कवर झालेल्या ठाकरे सरकारच्या शपथविधी सोहळ्यात 7 ते 8 नेत्यांनी मंत्रिपदाची शपथा घेतली. त्यात एकनाथ शिंदेंचाही समावेश होता. त्यांना नगरविकास मंत्री हे खातं देण्यात आलं. सरकार स्थापन झाल्यापासूनच महाविकास आघाडीत अनेक खटके उडाले. त्यावेळी पक्षाच्या निष्ठावंत नेत्यांपैकी एकनाथ शिंदेंनी पक्षासाठी अनेक महत्त्वाच्या भूमिका बजावल्या. भाजपकडून वारंवार होणारे आरोप-प्रत्यारोप, घोडेबाजार रोखण्यासाठी एकनाथ शिंदे पक्षाकडून अगदी ठामपणे उभे राहिले. पण आता पक्षाशी एकनिष्ठ असलेला खंदा कार्यकर्ता आणि बाळासाहेबांचा कडवट शिवसैनिक पक्षावर आणि पक्षश्रेष्ठींवर नाराज आहेत.
दरम्यान, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या गटातील काही आमदारांसह नॉट रिचेबल आहेत. ते सूरतमध्ये असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. अशातच एकनाथ शिंदेंनी पुकारलेल्या बंडामुळं महाविकास आघाडी सरकार म्हणजेच, ठाकरे सरकार अडचणीत सापडलं आहे. शिवसेनेतील भूकंपामुळं राज्यातील राजकारणाला काय कलाटणी मिळणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.