(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Shiv Sena MLA Disqualification Case : ठाकरे गटाचा व्हीप, हजेरीपट बोगस; आमदार अपात्रता सुनावणीत अॅड. जेठमलानींचा दावा
Shiv Sena MLA Disqualification : अॅड. जेठमलानी यांनी ठाकरे गटाच्या व्हीप, ठरावावर प्रश्न उपस्थित केले. अॅड. जेठमलानी यांचा उर्वरित युक्तिवाद आता बुधवारी 20 डिसेंबर रोजी होणार आहे
Shiv Sena MLA Disqualification : शिवसेना ठाकरे गटाने (Shiv Sena UBT) बजावलेला व्हीप, ठराव हे सगळंच बोगस असल्याचा दावा आज शिंदे गटाच्यावतीने (Shiv Sena Shinde Group) करण्यात आला. शिवसेना आमदार अपात्रता सुनावणीत (Shiv Sena MLA Disqualification Case ) आजपासून शिंदे गटाचे वकील अॅड. महेश जेठमलानी (Mahesh Jethmalani) यांचा युक्तिवाद सुरू झाला. अॅड. जेठमलानी यांनी ठाकरे गटाच्या व्हीप, ठरावावर प्रश्न उपस्थित केले. अॅड. जेठमलानी यांचा उर्वरित युक्तिवाद आता बुधवारी 20 डिसेंबर रोजी होणार आहे.
अॅड. महेश जेठमलानी यांनी संध्याकाळी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) यांच्या समोरील युक्तिवादात ठाकरे गटावर गंभीर आरोप केले. अॅड. जेठमलानी यांनी आपल्या युक्तिवादात म्हटले की, 21 जून 2022 च्या हजेरीपटाची जी प्रत सर्वोच्च न्यायालयात दिली आहे आणि येथे सादर केली आहे, त्यात तफावत आहे. सर्वोच्च न्यायालयात जो हजेरीपट सादर करण्यात आला. त्यावर उदय सामंत, वैभव नाईकांच्या सह्या नाहीत. तर, अध्यक्षांसमोरील सुनावणीत जो हजेरीपट सादर करण्यात आला त्यावर या दोघांच्या सह्या आहेत. 21 जून जारी करण्यात आलेला व्हीप, हजेरीपट आणि ठराव तिन्ही बोगस आहेत असा दावा जेठमलानी यांनी केला. त्यानंतर जेठमलानी यांनी 22 जून रोजी पाठवलेल्या ई-मेलचा हवाला देत म्हटले की 22 तारखेची बैठक हा केवळ अपात्रता याचिकेसाठी केलेला बनाव होता. अनेक आमदार आसाममध्ये होते याची कल्पना प्रभू यांना होती. तर काही धमकाविल्यामुळे बैठकीला जायला तयार नव्हते.
नोटीस पाठवायची, गैरहजर राहिले म्हणून अपात्रतेची याचिका करायची यासाठीच या बैठकीचा बनाव रचला गेला असल्याचा आरोप शिंदे गटाच्यावतीने अॅड. जेठमलानी यांनी केला.
22 जून रोजीच्या बैठकीत गटनेते अजय चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली अपात्रता निलंबनाचा ठराव झाला. शिवसेनेची रचना असल्याचा मोठा दावा केला जातो. पण या अत्यंत महत्चाव्या घटना घडताना ती रचना कुठेही दिसली नाही. आताही अल्पमतात असलेल्या छोट्या विधिमंडळ पक्षाच्या बैठका घेऊन निर्णय घेतल्या जात असल्याचा दावाही अॅड. जेठमलानी यांनी केला. अजय चौधरी यांना गटनेता करण्यासाठी असलेला 21 जून रोजीचा ठराव बोगस असल्याचे त्यांनी म्हटले.
सुनील प्रभू यांनी उत्तरे बदलली
सुनील प्रभू यांनी बैठकीसाठी नोटीस पाठवण्यात आली तर ती कशी आमदारांना पाठवली यावर रेकॉर्डवर उत्तर देताना तीन वेळेस उत्तरं बदलली असल्याचे अॅड. जेठमलानी यांनी सांगितले. एकदा प्रभू म्हणाले की मी मोबाइलवर नोटीस पाठवली. नंतर सांगितलं की ई-मेल केला. त्यानंतर म्हणे मी ई-मेल नाही केला विजय जोशी यांनी ई-मेल केला. आता विजय जोशी म्हणतात की कॉम्प्युटर ऑपरेटरने ई-मेल केला. ते म्हणतात कोणी ई-मेल पाठवला त्याचे नाव आठवत नाही. कारण तीन कॉम्प्युटर ऑपरेटर होते. यामध्ये कुठलेही पुरावे नाहीत की इमेल सर्व आमदारांना गेला की नाही? या मुद्याकडेही अॅड. जेठमलानी यांनी लक्ष वेधले.