कांदा निर्यातबंदीवर हुडी घालून रात्रभर फिरणारे नेते बोलणार का? रोहित पवारांचा बाण एक, वार मात्र तीन
सरकारनं कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातल्यामुळं कांद्याचे दर घसरलेत. याच मुद्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे नेते आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी राज्य सरकारवर टीका केलीय.
Rohit Pawar on Govt : सध्या राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी (Onion Farmers) संकटात सापडला आहे. कारण, कांद्याच्या दरात (Onion Price) मोठी घसरण होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. केंद्र सरकारनं कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातल्यामुळं कांद्याचे दर घसरले आहेत. दरम्यान, याच मुद्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे नेते आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी राज्य सरकारवर टीका केलीय. निर्यातबंदीच्या निर्णयानं महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना वायदा, पण गुजरातच्या शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. त्यामुळं कांदा निर्यातबंदीवर हुडी घालून रात्रभर फिरणारे नेते बोलणार का? असा सवाल करत रोहित पवारांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी टोला लगावलाय.
नेमकं काय म्हणाले रोहित पवार?
सहसा गुजरातमधील शेतकऱ्यांचा कांदा मार्च महिन्यानंतर बाजारात येत असतो. त्यामुळं 31 मार्चपर्यंत कायम असलेली कांदा निर्यातबंदी म्हणजे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना वायदा देऊन गुजरातमधील शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी घेतलेला निर्णय आहे, असं राज्यातील शेतकऱ्यांचं म्हणणं असल्याचे रोहित पवार म्हणालेत.
कांदा निर्यातबंदीमुळं राज्यातील शेतकऱ्यांचं सुमारे 5 हजार कोटी रुपयांचं नुकसान झाल्याचे रोहित पवार म्हणाले. या शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी पहाटेपर्यंत काम करणारे, पहाटेपासून काम करणारे आणि हुडी घालून रात्रभर काम करणारे नेते यावर काही बोलणार का? की दिल्लीपुढे असेच गुडघे टेकवणार? असे म्हणत रोहित पवारांनी एकाचा बाणात तिघांना घायाळ केलं आहे. यातून रोहित पवारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केलीय.
31 मार्चपर्यंत कांदा निर्यातबंदी कायम
कांद्याचे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी सरकार सातत्यानं प्रयत्न करत आहे. कांद्याचे दर वाढू नयेत म्हणून सरकारनं 8 डिसेंबरला कांदा निर्यातबंदीचा निर्णय लागू केला होता. यामुळं कांद्याच्या दरात घसरण झाली आहे. याचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. दरम्यान, मागील दोन ते तीन दिवसांपासून कांद्यावरील निर्यातबंदी उटवल्याच्या चर्चा सुरु होत्या. मात्र, कांद्यावरील निर्यातबंदी उठवली नसल्याचं स्पष्टीकरण सरकारकडून देण्यात आलं आहे. 31 मार्चपर्यंत कांदा निर्यातबंदी कायम राहणार असल्याची भूमिका सरकानं घेतली आहे. त्यामुळं कांद्याचे दर वाढण्याची शक्यचा कमीच असल्याचं बोललं जात आहे. दरम्यान, कांदा निर्यातबंदी केल्यामुळं शेतकरी मात्र अडचणीत सापडलेत. कांद्याला कमी दर मिळत असल्यानं शेतकऱ्यांमा आर्थिक फटका बसतोय.
महत्वाच्या बातम्या:
कांद्याच्या दरात घसरण, बळीराजाला फटका; तर लसणाचा ठसका वाढला