(Source: ECI/ABP News/ABP Majha)
मी आत्याला मस्करीत म्हणायचे, एन डी मामांबरोबर संसार करतेस, तुला अॅवॉर्डच द्यायला हवा : सुप्रिया सुळे
एन.डी.पाटील यांच्या निधनावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी शोक व्यक्त केला आहे. सुप्रिया सुळे यांनी एन डी पाटील यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे.
N. D. Patil Passed Away : ज्येष्ठ नेते प्राध्यापक एन.डी.पाटील यांचं आज निधन झालं आहे. वयाच्या 93 वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. यानंतर विविध स्तरातून शोक व्यक्त होताना दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील शोक व्यक्त केला आहे. सुप्रिया सुळे यांनी एन डी पाटील यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. त्यांचे संपूर्ण आयुष्य हे लढण्यात, संघर्ष करण्यातच गेले. त्यांना मणक्याचा त्रास होता तरी ते काठी घेऊन आंदोलनाला जायचे. शिक्षण आणि सामाजिक प्रश्नावर लढण्यात त्यांनी संपूर्ण आयुष्य खर्ची केल्याचे सुळे यावेळी म्हणाल्या. त्यांच्या या कामात आत्यांनी खूप कष्ट घेतले. मी आत्याला मस्करीत म्हणायचे, एन डी मामांबरोबर संसार करतेस, तुला अॅवॉर्डच द्यायला हवा, असे म्हणत सुप्रिया सुळे यांनी एन डी पाटील यांच्या आठवणींना उजाळा दिला.
महाराष्ट्राच्या गेल्या सत्तर वर्षाच्या सामाजिक, राजकीय जीवनातील अत्यंत धडाडीचे आणि लढाऊ नेते प्राध्यापक एन.डी.पाटील यांचं निधन झालं आहे. ते 93 वर्षांचे होते. कोल्हापुरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरु असताना त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय. ब्रेन स्ट्रोक आल्यानं गेल्या चार दिवसांपासून कोल्हापूरमधील खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते.
वातावरणात बदल झाल्याने त्यांना थोडी कणकण वाटत होती. त्यामुळे एन.डी. पाटील यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत त्यांना कोरोनाची लागण झाली होती. मात्र या वयातही एन. डी. पाटील यांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली होती. मात्र यावेळी त्यांची मृत्यूची झुंज अपयशी ठरली. एक झुंजार नेतृत्व अशी त्यांची ओळख होती. कामगार, शेतकरी यांचे अनेक प्रश्न त्यांनी सातत्यानं मांडले होते. तसेच अनेक प्रश्न त्यांनी मार्गीही लावले होते.
महत्त्वाच्या बातम्या: