(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Raj Thackeray: जातीपातीच्या राजकारणाला शरद पवार जबाबदार - राज ठाकरे
Raj Thackeray : राज्यातील जातीपातीच्या राजकारणाला शरद पवार जबाबदार असल्याचा आरोप मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला.
Raj Thackeray: राज्यातील जातीपातीच्या राजकारणाला शरद पवार जबाबदार असल्याचा आरोप मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला. शिवाजी पार्क येथे सुरू असलेल्या गुढीपाडवा मेळाव्यात कार्यकर्त्यांना संबोधित करताना ते असं म्हणाले आहेत. यावेळी राज ठाकरे यांनी शिवसेना, राष्ट्रवादींवर टीकास्त्र सोडलं. तसेच मुख्यमंत्रिपदावरुन उद्धव ठाकरे यांच्यावर टीकेचा बाण सोडला. आपण जर जातीपातीच्या राजकारणात अडकून पडलो असतील, तर कोणतं हिंदू आणि हिंदुत्व घेऊन बसता, असेही राज ठाकरे म्हणाले. आधी जात जातीचा अभिमान होता, राष्ट्रवादीने जातीय वाद पेटवला. जातींमधून बाहेर आले तर हिंदुत्वचा ध्वज हाती घेता येणार आहे, असे टीकास्त्र राज ठाकरेंनी सोडलं.
1999 ला जेव्हा राष्ट्रवादीचा जन्म झाला, त्यानंतर जातीपातीचं राजकारण वाढलं. त्यापूर्वी जात ही अभिमान होती. मात्र राष्ट्रवादीच्या जन्मानंतर यांनी दुसऱ्या जातीचा द्वेष करायला शिकवलं. आम्ही जातीतून बाहेर पडणार नाही, तर मग आम्ही हिंदू कधी होणार, असे राज ठाकरे म्हणाले. बाबासाहेब पुरंदरेंनी इतिहास लिहिला म्हणून त्यांना जातीवरून सॉफ्ट टार्गेट केलं गेलं. ते काही म्हणाले की ते ब्राम्हण आहेत, असं म्हणत त्यांच्यावर टीका व्हायची, असेही राज ठाकरे म्हणाले.
राऊतांवर नाव न घेता टीका -
यावेळी नागरिकांना उद्देशून राज ठाकरे म्हणाले, ''दोन-दोन तास रांगेत उभे राहून मतदान केलं. भाषणाला गेला. भाषणे ऐकली. विचार ऐकले. मतदान केलं. आणि मतदान केल्यानंतर महाराष्ट्रात चित्र वेगळंच दिसलं. यासाठी मतदान करता. गुलाम आहेत यांचे? कोणीही तुम्हाला कुठे ही फरफटत घेऊन जावे आणि तुम्ही जावं. तुम्ही हे सर्व विसरून जाताना, हेच हवं आहे यांना.'' शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांचं नाव न घेता राज ठाकरे म्हणाले की, रोज सकाळी मीडिया वाले आले की, नुसतं आपलं बडबडत करत सुटायचं.''
अजित पवार पळून कुणासोबत गेले? लग्न कुणासोबत केले? - राज ठाकरेंचं टीकास्त्र
विधानसभा निवडणूकीच्या निकालानंतर पहाटे जोडा वेगळाच पाहायला मिळाला. पळून कुणाबरोबर गेले अन् लग्न कुणाबरोबर केले, काही कळेनाच, असे म्हणत राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीकास्त्र सोडले. पहाटेचा शपथविधी झाल्यानंतर तेवढ्यात आवाज आला हे लग्न नाही होणार... अन् फिस्कटलं. दोघेही हिरमसून घरी...हे सगळं सुरु असताना वेगळेच सुरु होते. कुणीतरी मला कडेवर घ्या ना... असे म्हणतेय. तीन नंबरचा पक्ष एक नंबरला आणि दोन नंबरला फिरवतोय... महाराष्ट्राच्या काय देशाच्या राजकारणामध्ये असा प्रकार पाहिला नाही. महाराष्ट्राच्या जनतेला काय सांगता? एकमेंकाना शिव्या घालता अन् पुन्हा मांडीला मांडी लावून बसता? असे म्हणत अजित पवार यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीकास्त्र सोडलं.
आमदारांना फुकट घरे कशाला?
मुंबईतील झोपडपट्टयांमध्ये वाढ झाली आहे. आमदारांना फुकट घरे कशाला दिली पाहिजे. त्यापेक्षा पोलिसांना घरे दिली पाहिजे. आमदार, खासदारांची पेन्शन बंद केली पाहिजे. मनसेच्या आमदाराने या गोष्टीला पहिला विरोध केला
ज्या मशिदीवर भोंगे लागतील, त्यासमोर हनुमान चालीसा लावू -
प्रार्थनेला माझा विरोध नाही. मशिदीवर लागलेले भोंगे खाली उतरावावे, हा निर्णय सरकारने घ्यावा. निर्णय नाही घेतला तर मशिदीसमोर हनुमान चालीसाचे स्पीकर लावावे. मी धर्मांध नाही, तर धर्माभिमानी आहे.