Manoj Jarange Patil : आम्ही आझाद मैदानात जाऊन बसणार, आरक्षण मिळाल्याशिवाय माघार नाही; मनोज जरांगेंचा निर्धार कायम
मुंबई पोलिसांकडून परवानगी नाकारण्यात आल्यानंतर जरांगे पाटील काय भूमिका घेणार? अशी चर्चा असतानाच त्यांनी आझाद मैदानात व्यासपीठ तयार असल्याचे सांगत त्याठिकाणीच आंदोलन करणार असल्याचे जाहीर केले.
लोणावळा : आम्ही आता आरक्षण घेतल्याशिवाय माघार हटणार नाही, आम्ही आझाद मैदानात जाऊन बसणार आहोत, असा ठाम पवित्रा मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी घेतला आहे. मुंबई पोलिसांकडून परवानगी नाकारण्यात आल्यानंतर जरांगे पाटील काय भूमिका घेणार? अशी चर्चा असतानाच त्यांनी आझाद मैदानात व्यासपीठ तयार असल्याचे सांगत त्याठिकाणीच आंदोलन करणार असल्याचे जाहीर केले. मनोज जरांगे पाटील यांनी एबीपी माझाशी बोलताना आझाद मैदानातच आंदोलन करणार असल्याचा निर्धार बोलून दाखवला.
आरक्षणावर मालकांनीच तोडगा काढावा
मनोज जरांगे यांनी सांगितले की, जनतेला त्रास नको, ते काम करत आहेत. मात्र आरक्षणावर मालकांनीच (मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री) तोडगा काढावा अशी आमची मागणी आहे. आम्ही सरकारला सहकार्य करण्यास तयार आहोत. आम्ही तोडगा काढण्यास तयार असल्याचे जरांगे यांनी सांगितले.
सगसोयऱ्यांचा आदेश काढला आहे का?
मालक आल्यास आम्ही चर्चा करु, पण ते नाही आल्यास चर्चा कशी करणार? सगसोयऱ्यांचा आदेश काढला आहे का? असे सांगत त्यांनी मागण्यांवर सरकारकडून निर्णय झाला नसल्याचे सांगितले. आम्हाला परवानगी नाकारलेली नाही. कोर्टाची नोटीस आहे म्हणून सही केली. मात्र, आरक्षण मिळाल्याशिवाय माघार घेणार नाही. आम्ही मुंबईला जाणारच आहोत. दगाफटका होऊ नये सावध राहिलेलं बरं. त्यामुळे कोणी उपद्रव केल्यास पोलिसांच्या ताब्यात द्या म्हणून सांगितलं असल्याचे त्यांनी सांगितले. फक्त मालकांनी यावं एवढंच म्हणणं असल्याचे त्यांनी सांगितले.
मनोज जरांगे यांना नोटीस
दुसरीकडे, मुंबई पोलिसांनी मनोज जरांगे पाटील यांना नोटीस पाठवली आहे. मुंबईत होणाऱ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ही नोटीस देण्यात आली आहे. तसेच, मराठा आंदोलनामुळे विपरित परिणाम होऊन मुंबईची दैनंदिन वाहतूक व्यवस्था कोलमडेल असं नोटीसमध्ये म्हटलं आहे. आंदोलकांची संख्या लक्षात घेता मुंबईत आंदोलकांना जागा पुरेल एवढे मोठे एकही मैदान नाही, त्यामुळे आंदोलन करण्यासाठी खारघरमधील इंटरनॅशनल कॉर्पोरेशन पार्क मैदान संयुक्तिक राहील असे पोलिसांकडून नोटीसमध्ये सांगण्यात आले आहेत.
आझाद मैदानात नारळ फुटला
एकीकडे आझाद मैदान पोलिसांनी परवानगी नाकारली असली तरी दुसरीकडे मराठा आंदोलकांनी आझाद मैदानात तयारी सुरु केली आहे. मनोज जरांगे हे उद्या 26 जानेवारीला आझाद मैदानात दाखल होत आहेत. "आम्ही यापूर्वीच पत्रव्यवहार केला होता. आझाद मैदानाची परवानगी आधीच मागितली होती.आम्ही स्टेज बांधण्याचं काम सुरु केलं आहे. उद्या प्रजासत्ताक दिनानिमित्त झेंडावंदनही याच मैदानात करु" असं वीरेंद्र पवार यांनी एबीपी माझाला सांगितलं.
इतर महत्वाच्या बातम्या