Aurangabad: अन् एका 'सॉरी' ने गेला जीव; औरंगाबादच्या जळीत प्रकरणात नवा खुलासा
Aurangabad : औरंगाबाद जळीत प्रकरणात शहर पोलिसांकडून विशेष तपास पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे.
Aurangabad Crime News: प्रेमप्रकरणात झालेल्या वादामुळे औरंगाबादच्या एका तरुणाने प्रेयसीसह स्वतःला पेटवून घेतल्याची घटना सोमवारी समोर आली होती. ज्यात तरुणाचा मृत्यू झाला असून, मुलीवर औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे. दरम्यान औरंगाबादच्या या जळीत प्रकरणात पोलिसांकडून सुरु असलेल्या तपासात नवनवीन माहिती समोर येत आहे. त्यातच आता यात आणखी एक नवा खुलासा झाला असून, स्वतःला पेटवून घेणाऱ्या गजानन मुंडे याने जखमी पीडित तरुणीला फक्त एकदा 'सॉरी' म्हणण्याची अट घातली होती. मात्र तरुणीने ती अट मान्य केली नव्हती.
औरंगाबाद जळीत प्रकरणात शहर पोलिसांकडून विशेष तपास पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे या पथकाकडून सर्व प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येत आहे. दरम्यान आता यात नवीन खुलासा झाला आहे. एका प्राध्यापकाच्या जबाबानुसार, मृत तरुणाने त्यांच्याकडे पीडित तरुणीने फसवणूक केल्याविषयी तक्रार केली होती. प्राध्यापकाने दोघांना 12 नोव्हेंबर रोजी समोरासमोर बसवून दोघांचे समुपदेशन केले. पीडित तरुणीने आपली फसवणूक केली असून तिने एकदा 'सॉरी' म्हणण्याची अट यावेळी गजाननने घातली. मात्र आपण कोणाचेही फसवणूक केली नसल्याचं म्हणत तरुणीने ती अट मान्य केली नाही. याविषयीचे व्हॉट्सअॅप मेसेजही तरुणाने संबंधित प्राध्यापकाला पाठविले होते. त्यानंतर 21 नोव्हेंबरला गजाननने पेटवून घेतले.
यापूर्वी देखील केला आत्महत्येचा प्रयत्न...
गजानन आणि पीडित तरुणी या दोघांमध्ये अनेक महिन्यांपासून वाद सुरू असल्याचे पोलिसांनी घेतलेल्या प्राध्यापकांच्या जबाबातूनही स्पष्ट झाले आहे. दरम्यान 15 सप्टेंबरला देखील गजाननने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. विद्यापीठ परिसरात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या परिसरात 15 सप्टेंबरला अंगावर पेट्रोल ओतून घेतले होते. त्यानंतर मला पेटवून दे म्हणत त्याने तरुणीच्या हातात काडीपेटी देखील दिली होती. पण पीडित तरुणी तेथून निघून गेली होती. विशेष म्हणजे या घटनेनंतर मुलीने मुलाच्या वडिलांना फोन करून गजाननला समजावून सांगण्याचे फोनवरून सांगितले होते. याची रेकॉर्डींग देखील पोलिसांना मिळाली आहे.
विद्यापीठ प्रशासनाबाबत प्रश्नचिन्ह?
या घटनेने विद्यापीठ प्रशासनाची अनास्था समोर आली आहे. विद्यापीठात असलेल्या वेगवेगळ्या वसतिगृहात मुलं-मुली राहतात. दरम्यान गजानन आणि पीडित तरुणीत सुरु असेललं प्रकरण आणि त्यांच्या प्रेमप्रकरणातील वादाची माहिती विद्यापीठ वसतिगृहात राहणारे संशोधक विध्यार्थी, विभागातील प्राध्यापक, मार्गदर्शकांसह इतरांना कल्पना होती. मात्र कोणीच त्यात हस्तक्षेप करत समुपदेशन केला नाही. तर घटना घडल्यावर देखील अनेकजण पोलिसांना मदत करत नसल्याचे समोर आले आहे.
Aurangabad: प्रेमप्रकरणातून प्रेयसीसह स्वतः पेटवून घेणाऱ्या तरुणाचा अखेर मृत्यू; मुलीवर उपचार सुरु