(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Samruddhi Mahamarg: नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून समृद्धी महामार्गाची पाहणी
Wardha: हिंन्दुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गामुळे नागपूर ते मुंबई अंतर केवळ सहा ते सात तासांवर येणार आहे.
Wardha: हिंन्दुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गामुळे नागपूर ते मुंबई अंतर केवळ सहा ते सात तासांवर येणार आहे. विदर्भातील उद्योग धंद्यांसह विकासाच्या विविध बाबींना चालना मिळणार असल्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. वर्धा जिल्ह्यातील आर्वी टोल प्लाझा येथे समृद्धी महामार्ग तसेच पुलगाव जवळ वन्यप्राण्यांच्या आवागमणासाठी बांधण्यात आलेल्या उड्डाणपूलाची पाहणी श्री.शिंदे यांनी आज केली.यावेळी ते बोलत होते.
यावेळी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार, सहव्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार गायकवाड, जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार, मुख्य अभियंता सुधाकर मुरादे, अधीक्षक अभियंता अश्विनी घुगे, कार्यकारी अभियंता हेमंत जगताप, भुषण मालखंडारे, उपविभागीय अधिकारी हरिष धार्मीक, तहसिलदार श्री.चव्हाण आदी उपस्थित होते.
समृध्दी महामार्गासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचे तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे. मार्गाचे काम उत्तम दर्जाचे झाले आहे. पर्यावरणाचा समतोल राखून ईको फ्रेंडली काम करण्यात आले असून या संपूर्ण महामार्गावर 11 लाख 50 हजार झाडे लावण्यात येत आहे. वनसंपदेचे रक्षण होणे आवश्यक आहे. त्यासाठी वन्य प्राण्यांना ये जा करता यावी यासाठी रस्त्यावर केवळ प्राण्यासाठी खास उड्डाणपुल बांधण्यात आले आहे. या पुलांमुळे प्राण्यांना जंगलाचा अनुभव येतील, अशी व्यवस्था या पुलांवर करण्यात आली असल्याचे नगरविकास मंत्री श्री.शिंदे यांनी सांगितले.
मार्गाचे पहिल्या टप्प्यातील काम पूर्ण झाले आहे. नागपुर ते शिर्डी या टप्प्याचे उद्घाटन मे महिन्यात करण्याचे प्रस्तावित आहे. मार्गामुळे केवळ सहा ते सात तासात मुंबई पोहोचता येईल. यामुळे वेळ, इंधन व पर्यावरणाची बचत होणार आहे. महामार्गावर कुठेही टोल भरावा लागणार नाही. वाहन जेथे महामार्गावरून बाहेर पडेल तेथेच केवळ टोल लागतील. विदर्भातील उद्योग वाढीसह शेतकऱ्यांच्या मालाची वाहतुक करण्यासाठी हा मार्ग अतिशय महत्वाचा ठरणार असल्याचे श्री.शिंदे म्हणाले. यावेळी श्री.शिंदे यांनी आर्वी टोल प्लाझा जवळील मार्गावर स्वत: कार चालवत मार्गाची पाहणी केली. त्यानंतर वन्य प्राण्यांच्या आवागमनासाठी बांधण्यात आलेल्या उड्डाणपुलाची देखील त्यांनी पाहणी केली.
जिल्ह्यात 58 किमीचा महामार्ग पूर्ण
समृध्दी महामार्गाची जिल्ह्यातील लांबी 58 किलोमिटर इतकी आहे. जिल्ह्यातील मार्ग पूर्णपणे बांधून झाला आहे. रस्त्याची रुंदी 120 मीटर असून तो सहापदरी आहे. वर्धा, सेलु व आर्वी या तीन तालुक्यातील 34 गावांमधून एकून 782 हेक्टर इतकी जमीन महामार्गासाठी संपादीत करण्यात आली आहे. जिल्ह्यात या मार्गावर 2 हजार 762 कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. जिल्ह्यात या मार्गावर विनाअडथडा वाहतुक होण्यासाठी 5 मोठे, 27 लहान पुलांसह 9 उड्डाणपुल बांधण्यात आले आहे. येळाकेळी व विरूळ येथे इंटरचेंजेस देण्यात आले आहे. वन्यप्राण्यांच्या आवागमणासाठी दोन विशेष उड्डानपुले बांधण्यात आले आहे.
हे देखील वाचा-
- महागाईपासून लपण्यासाठी केंद्र सरकार आणि राज्यातील विरोधी पक्षाकडून आरोप-प्रत्यारोप : सुप्रिया सुळे
- Sharad Pawar : भाजपच्या सत्ता काळात काश्मिरी पंडित बाहेर गेले : शरद पवार
- Maharashtra Corona Update : राज्यात रविवारी 140 नव्या रुग्णांची भर, एकूण सक्रीय रुग्ण 926
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
https://www.youtube.com/watch?v=Rs3GfkHRwXA