(Source: ECI/ABP News/ABP Majha)
न्यायालयावर दबाव असल्याने त्यांच्याकडून न्यायाची अपेक्षा नाही, उद्धव ठाकरेंच्या मेव्हण्यावरील कारवाईवर संजय राऊत यांची प्रतिक्रिया
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांचे भाऊ असलेल्या श्रीधर पाटणकर यांच्यावर नुकतीच ईडीने कारवाई केली आहे. ईडीच्या या कारवाईमुळे थेट ठाकरे परिवार ईडीच्या रडारवर आल्याचं मानलं जात आहे.
Sanjay Raut : अंमलबजावणी संचालनालय म्हणजेच ई़डीने (ED) नुकतीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेव्हणे श्रीधर पाटणकर यांच्या संपत्तीवर कारवाई केली आहे. पुष्पक बुलियन या कंपनीशी संबंधित एका प्रकरणी ही कारवाई करण्यात आली असून यानंतर राज्यातील राजकारण चांगलच तापलं आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी या कारवाईबाबत प्रतिक्रिया देताना भाजप सरकार सूडबुद्धीने ही कारवाई करत असल्याचा आरोप केला आहे. तसाच न्यायालयावरही सध्या दबाव असल्याने त्यांच्याकडून न्यायाची अपेक्षा नाही असंही राऊत म्हणाले आहेत.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांचे भाऊ श्रीधर पाटणकर हे आहेत. दरम्यान ईडीने जप्त केलेल्या मालमत्तेमध्ये नीलांबरी प्रोजेक्ट्समधील 11 सदनिकांचा समावेश आहे. या सदनिका साईबाबा गृहनिर्मिती कंपनीच्या नावावर आहेत. साईबाबा गृहनिर्मिती ही कंपनी श्रीधर माधव पाटणकर यांच्या मालकीची असल्याने ही कारवाई थेट ठाकरे सरकारशी संबधित असल्यानं राजकीय वातावरण तापलं आहे. दरम्यान याबाबत बोलताना राऊत यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे ते म्हणाले आहेत की, ''ही कारवाई सूडबुद्धीने केली असून कोणतीही बाजू मांडण्याची संधी न देता केली आहे.'' दरम्यान बंगालमध्ये देखील ममता बॅनर्जींच्या स्वकीयांची ईडीकडून चौकशी करण्यात आली असून या सर्वानंतरही ना बंगाल झुकेगा, ना महाराष्ट्र झुकेगा! असंही राऊत म्हणाले आहेत.
'सत्तेसाठी कारवाई'
या कारवाईबाबत बोलताना राऊत म्हणाले, ''देशात ज्या ज्या ठिकाणी भाजपची सत्ता नाही त्या राज्यात अशी कारवाई भाजप करत आहे. यामध्ये महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, तामिळनाडू, झारखंड अशा राज्यांचा समावेश आहे. गुजरातमध्ये तर ईडीची ब्रांच बंदच आहे'' असं बोलताना ही संपूर्ण कारवाई सत्तेसाठी होत असल्याचं यातून राऊत म्हणाले आहेत.
'सध्या न्यायालाकडून न्यायाची अपेक्षा नाही'
ही कारवाई म्हणजे राक्षसी हुकूमशीहीची नांदी असून युपीए सरकारच्या काळात 23 ते 24 ईडीच्या कारवायांची संख्या आता तब्बल अडीच हजारांच्या घरात गेल्याचं राऊत म्हणाले. यात अनेक कारवाया चूकीच्या पद्धतीने होत असून या वातावरणात न्यायालयाकडून न्यायाची अपेक्षा नाही. कारण ते देखील दबाखाली आहे. पण जनतेचं न्यायालय सर्वात मोठं तिथे भाजपला उत्तर द्याव लागेल. असंही राऊत म्हणाले.
काय आहे ईडीची कारवाई?
ईडीने आज प्रसिद्धीपत्रक काढून या कारवाईची माहिती दिलीय. 6 मार्च 2017 मध्ये नोंदवलेल्या मनी लाँडरिंग प्रकरणी ही कारवाई असल्याचंही स्पष्ट करण्यात आलंय. 2017 मध्ये मेसर्स पुष्पक बुलियन्स या पुष्पक ग्रुपच्या एका कंपनीविरोधात ही कारवाई होती. मात्र आज झालेली जप्तीची कारवाई ही उद्धव ठाकरे यांच्या मेव्हण्याच्या म्हणजेच श्रीधर माधव पाटणकर यांच्या मालकीच्या श्री साईबाबा गृहनिर्मिती प्रा. लि. च्या रहिवासी सदनिका आहेत. या सदनिका ठाण्यातील निलांबरी गृहप्रकल्पातील आहेत. महेश आणि चंद्रकांत पटेल यांच्या मालकीच्या पुष्पक ग्रुपमधील पुष्पक बुलियन्सच्या मनी लाँडरिंगबाबत ही कारवाई आहे. या प्रकरणी तब्बल 21.46 कोटी रुपयांची मालमत्ता यापूर्वीच जप्त करण्यात आली आहे. नंदकिशोर चतुर्वेदी आणि महेश पटेल यांनी संगनमताने पुष्पक रिएलिटी या पुष्पक ग्रुपमधील कंपनीमधील तब्बल 20 कोटी रुपयांची रक्कम नंदकिशोर चतुर्वेदी यांच्यामार्फत वेगवेगळ्या बोगस कंपन्यांमध्ये गुंतवले. नंदकिशोर चतुर्वेदी यांच्या मालकीच्या हमसफर डीलर प्रा. लि. या केवळ कागदोपत्री असलेल्या कंपनीमार्फत श्रीधर पाटणकर यांच्या श्री साईबाबा गृहनिर्मिती या कंपनीला 30 कोटी रुपये बिगर तारण कर्ज दिल्याचं दाखवलं. पुष्पक ग्रुपच्या महेश पटेल यांनी नंदकिशोर चतुर्वेदी यांच्या मदतीने साईबाबा गृहनिर्मिती प्रकल्पात अवैध रक्कम गुंतवल्याचा आरोप ईडीच्या प्रसिद्धीपत्रकात करण्यात आला आहे.
हे ही वाचा
- Uddhav Thackeray : ईडीची थेट उद्धव ठाकरेंच्या मेव्हण्यावर कारवाई; 6.45 कोटी रुपयांच्या संपत्तीवर टाच
- Maharashtra: घोटाळेबाजांना सोडणार नाही! उद्धव ठाकरेंच्या मेव्हण्यावर झालेल्या ईडी कारवाईनंतर किरीट सोमय्या आक्रमक
- ST Strike : एसटी विलीनीकरणावर निर्णय घेण्यासाठी सरकारला 15 दिवसांची मुदतवाढ, उच्च न्यायालयाचा निर्णय
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
[yt][/yt]