Ashadhi Wari 2022 : मानाची पहिली पालखी पंढरीत दाखल; 750 किलोमीटर पायी चालून मुक्ताबाईंची पालखी पंढरीत दाखल
Ashadhi Wari 2022 : आज तीनच्या सुमारास मुक्ताबाई यांची पालखी पंढरपूरामध्ये दाखल झाली.
Ashadhi Wari 2022 : कोरोनामुळे विठुरायाचा पालखी सोहळा गेली दोन वर्ष पार पडला नव्हता. पण आता उत्साहानं विठुरायाचे भक्त पुन्हा पालखी सोहळ्यात सामील झाले आहे. माऊली-माऊलीच्या जयघोषात वारकरी हे पंढरपूराकडे वाटचाल करत आहेत. आषाढी सोहळ्यासाठी राज्यभरातून शेकडो वारकरी पायी पंढरीची वारी करत आहेत. सात मानाच्या पालख्यांमधील एक असणारी संत मुक्ताबाई यांच्या पालखीनं पंढरीत दाखल झालेल्या पहिल्या पालखीचा मान मिळवला आहे. आज तीनच्या सुमारास मुक्ताबाई यांची पालखी पंढरपूरामध्ये दाखल झाली.
आदिशक्ती मुक्ताबाई यांच्या समाधीस्थळावरून आलेली ही मुक्ताबाईंच्या पालखीने गेल्या 34 दिवसात जवळपास 750 किलोमीटरचे अंतर पायी कापले आहे. संत मुक्ताबाई या संत ज्ञानेश्वरांच्या लहान भगिनी, संत मुक्ताबाई महिला संत असल्याने या पालखी सोहळ्यात 1500 महिला आणि 1000 पुरुष भाविक सामील झाले आहेत. मराठवाडा, विदर्भ , खानदेश आणि मध्यप्रदेशातून या सोहळ्यात मोठ्या प्रमाणात भाविक सामील झाले. पालखी मार्गात अनेक अडचणी आल्या तरी विठुरायाच्या ओढीने यावर मात करीत हे भाविक आज पंढरपूर मध्ये पोचले . संत मुक्ताबाई या संत नामदेवांचे आजेगुरु असल्याने या पालखी सोहळ्याच्या स्वागताला संत नामदेवांचे वंशज केशवदास महाराज पोचले होते. या स्वागत नंतर मुक्ताबाई यांच्या पादुकांना चंद्रभागेचे स्नान घालून ही पालखी दत्त घाटावरील मुक्ताबाई मठात विसावली.
मुक्ताबाईंच्या पालखीचे 3 जूनला झाले होते प्रस्थान
3 जूनला संत मुक्ताबाईंच्या आणि रूक्मिणी मातेच्या पालखी सोहळ्याला सुरुवात झाली होती. निवृत्तीनाथांच्या पालखीचा सोहळाही 13 जूनला सुरु झाला. जळगाव येथील कोथळी गावातील संत मुक्ताईंच्या समाधी स्थळापासून हा पालखी सोहळा मोठ्या उत्साहाने संत मुक्ताबाईच्या आणि विठुरायाच्या जयघोषात पंढरपूरला रवाना होण्यास सज्ज झाला होता. आज मुक्ताबाईंची पालखी पंठरपूरात दाखल झाली आहे.
हेही वाचा:
- Ashadhi Ekadashi 2022 : आषाढीसाठी 2 वर्षानंतर विठ्ठलाच्या लाडू प्रसादाची विक्री सुरु, लाडू बनविताना भाविकांच्या आरोग्याची ऐशीतैशी
- Ashadhi Ekadashi: वारकर्यांसाठी सातशे महिलांनी बनविले 65 हजार लाडू; अकरा वर्षांची परंपरा कायम