Liquor Sale in Maharashtra : कोरोना महासाथीच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेचा परिणाम देशातील अनेक राज्यांवर झाला. काही राज्यांची आरोग्य व्यवस्था पूर्णपणे कोलमडली असल्याचे वृत्त समोर आले होते. तर, महाराष्ट्र आणि केरळ सारख्या राज्यांनी सर्वाधिक बाधित असूनही योग्य नियोजनाच्या आधारे संसर्गाला अटकाव करण्याचा प्रयत्न केला. कोरोना लॉकडाउनच्या काळात मद्य प्रेमींनी मोठ्या प्रमाणावर दारू रिचवली असल्याचे समोर आले. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत महाराष्ट्रात पहिल्या लाटेच्या तुलनेत 2000 कोटींहून अधिक मद्याची विक्री झाली. कोरोनाची दुसरी लाट असलेल्या आर्थिक वर्ष 2021-22 दरम्यान राज्यात 17,177 कोटींहून अधिक मद्य विक्री करण्यात आली आहे. 


महाराष्ट्र उत्पादन शुल्क विभागाने दिलेल्या माहितीनुसार, वर्ष 2021-22 दरम्यान झालेली मद्य विक्री ही मागील तीन वर्षातील सर्वाधिक मद्य विक्री आहे. वर्ष 2020-21 च्या तुलनेत 17 टक्क्यांहून अधिक आहे. मात्र, तरीदेखील मागील आर्थिक वर्षाच्या दरम्यान उत्पादन शुल्क विभागाने आपले महसूल उद्दिष्ट साध्य केले नाही. उत्पादन शुल्क विभागाने आर्थिक वर्ष 2021-22 साठी 18 हजार कोटी रुपयांचे महसूल जमा करण्याचे उद्दिष्ट गाठले होते. मागील वर्षी 95 टक्क्यांपर्यंत हा महसूल जमा झाला. 
 
किती लाख लीटरची विक्री?


उत्पादन शुल्क विभागाच्या आकडेवारीनुसार, आर्थिक वर्ष 2019-20 मध्ये राज्यात जवळपास 2157 लाख बल्क लीटर 'आयएमएफएल'ची (भारतात तयार झालेले परदेशी मद्य) विक्री करण्यात आली. कोरोनाच्या पहिल्या लाटेच्या दरम्यान हा आकडा घसरून 1999 लाख बल्क लीटर इतका झाला होता. त्यानंतर वर्ष 2021-22 दरम्यान राज्यात 2358 लाख बल्क लीटर आयएमएफएलची विक्री झाली. 


बीअर आणि देशी दारूच्या विक्रीत वाढ


बीअर आणि देशी दारूच्या विक्रीत मोठी वाढ झाली आहे. महासाथीनंतर पहिल्यांदाच आयएमएफएलसह बीअर आणि देशी दारुच्या विक्रीत वाढ झाली आहे. आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये बीअर विक्रीत 22 टक्क्यांची घसरण झाली होती. तर, 2021-22 मध्ये बीअर विक्रीत 14 टक्क्यांनी वाढ झाली. 


एका अधिकाऱ्याने सांगितले की, एकूण मद्य विक्रीत 2021-22 या वर्षात 7 ते 12 टक्क्यांची वाढ दिसून आली. त्याआधी वर्ष 2020-21 मध्ये मद्य विक्रीत घट झाली होती. अनेक वर्षानंतर मद्य विक्रीत घट नोंदवण्यात आली. कोरोनाची पहिली लाट ओसरल्यानंतर सर्व व्यवहार, जनजीवन काही प्रमाणात पूर्वपदावर येऊ लागले होते. त्यानंतर लोकांची दारू खरेदी करण्याची क्षमतादेखील वाढली. शिवाय, लॉकडाउनचे निर्बंध शिथील झाल्याने मित्र परिवाराच्या गाठीभेटीदेखील वाढल्या. त्यामुळे मद्य विक्रीत वाढ झाली असल्याचे दिसून आले.