Aryan Khan Case : कॉर्डेलिया क्रूझ प्रकरणी एनसीबीनं (NCB) स्थापन केलेल्या विशेष चौकशी समितीच्या तपासात धक्कादायक निष्कर्ष समोर आले आहेत. शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) मुलगा आर्यन खान याच्याकडे कोणतेही अंमली पदार्थ नव्हते, असा निष्कर्ष या समितीनं तपासाअंती दिला आहे. तसंच आर्यन खानचे कोणत्याही ड्रग रॅकेटशी संबंध असल्याचे कोणतेही पुरावे नसल्याचंही एनसीबीच्या एसआयटीचं (NCB SIT) म्हणणं आहे.
कॉर्डेलिया क्रूझवरील पार्टीप्रकरणी एनसीबीनं टाकलेल्या छाप्यात अंमली पदार्थ सापडल्यानं आर्यनखानसह इतर अनेक जणांना एनसीबीनं अटक केली होती. न्यायालयीन लढाईनंतर आर्यनला जामीन मिळाला आहेच, मात्र एनसीबीच्या एसआयटीचा अहवाल येणं हा अधिक मोठा दिलासा असल्याचं बोलंलं जात आहे. अशातच एसआयटीच्या अहवालानंतर एनसीबीचे तत्कालीन विभागीय संचालक समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्या अडचणी वाढू शकतात अशी चर्चा सुरू आहे.
NCB SIT चे अधिकारी संजय सिंह यांनी ABP माझाशी बोलताना सांगितलं की, "सध्या एनसीबी एसआयटीची चौकशी प्राथमित स्तरावर सुरु आहे. त्यामुळे आम्ही आताच असं सांगू शकत नाही की, आमच्याकडे आर्यन खानविरोधात कोणतेही पुरावे नाहीत. चौकशी अद्याप सुरु असल्यामुळं आता कोणालाही क्लिन चिट देऊ शकत नाही. अद्याप आमची चौकशी अंतिम टप्प्यात आलेली नाही. संपूर्ण चौकशी होऊन कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला आणखी काही वेळ लागणार आहे."
दरम्यान, आर्यन खान, मुनमुन धमेचा आणि अरबाज मर्चंट यांना एनसीबीनं 3 ऑक्टोबर रोजी गोव्याला जाणाऱ्या क्रूझवर छापेमारीदरम्यान अटक केली होती. तर उर्वरित पाच इतर आरोपींना दुसऱ्या दिवशी अटक करण्यात आली होती. त्यानंतर आर्यनला बरेच दिवस तुरुंगात राहावं लागलं होतं. हे प्रकरण देशभरात गाजलं होतं.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Sanjay Raut Press Confarnce : बाप-बेटे जेलमध्ये जाणारच, संजय राऊतांचा सोमय्यांवर हल्लाबोल
- Disha Salian Case : राणे पिता-पुत्र हाजीर हो; दिशा सालियन प्रकरणी मालवणी पोलिसांची नोटीस
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह | ABP Majha