Sameer Wankhede : NCB चे माजी अधिकारी समीर वानखेडे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. कोपरी पोलीस ठाण्यात समीर वानखेडे यांच्याविरोधात शनिवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आल आहे. खोट्या माहितीच्या आधारे मद्यविक्री परवाना मिळवला असल्याचा आरोप समीर वानखेडे यांच्यावर लावण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वीच ठाणे जिल्हाधिकाऱ्यांनी वानखेडे यांच्या बारचा परवाना रद्द केला होता. 


उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी शंकर गोगावले यांनी समीर वानखेडे यांच्याविरोधात तक्रार दाखल केली. शनिवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास कोपरी पोलीस ठाण्यात ही तक्रार दाखल करण्यात आली. समीर वानखेडे यांनी खोटी माहिती देऊन मद्य विक्रीचा परवाना मिळवला असल्याची तक्रार पोलिसांना देण्यात आली आहे. 


नवी मुंबईतील वाशी येथे समीर वानखेडे यांच्या नावावर एक बार आहे. उत्पादन शुल्क विभागाच्या माहितीनुसार, या बारसाठीचा परवाना 27 ऑक्टोबर 1997 मध्ये देण्यात आला होता. या बारचे लायसन 31 मार्च 2022 पर्यंत वैध आहे. यावरूनच नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्यावर निशाणा साधला होता. 


बार आणि रेस्टॉरंट असल्याने या ठिकाणी परदेशी बनावटीची तसेच IMFL (भारतीय बनावटीची विदेशी मद्य) विक्री करण्याची परवानगी देण्यात आली आहे. हॉटेलचा परवाना आपल्या नावे असला तरी 2006 मध्ये भारतीय महसूल सेवेत दाखल होताच पॉवर ऑफ अॅटर्नी वडील ज्ञानदेव वानखेडे यांच्या नावे केल्याचं समीर वानखेडेंनी एका इंग्रजी वृत्तपत्राला माहिती देताना म्हटलं होतं. 


काही दिवसांपूर्वीच रद्द झाला होता परवाना 


या प्रकरणात राज्य उत्पादन शुल्काच्या ठाणे विभागाने समीर वानखेडे यांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती. या प्रकरणाची सुनावणी ठाणे जिल्हाधिकाऱ्यांसमोर सुरू होती. दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी बारचा परवाना रद्द केला. 


नवाब मलिक यांनी केला होता आरोप


क्रूझ ड्रग्ज प्रकरणानंतर समीर वानखेडे यांच्या कारवाईवर प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. समीर वानखेडे यांच्याविरोधात राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेत त्यांनी केलेल्या कारवाईवर प्रश्न उपस्थित केले होते. एका पत्रकार परिषदेत मलिक यांनी  समीर वानखेडेंवर निशाणा साधला होता. अवघ्या 17व्या वर्षी समीर वानखेडेंना बारचा परवाना मिळाल्याचं त्यांनी म्हटलं होतं. ज्यावेळी परवाना मिळाला त्यावेळी वानखेडेंचं वय हे अवघं 17 वर्षांचं होतं. त्यामुळे 17व्या वर्षी वानखेडेंना बारचा परवाना कसा मिळाला? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला होता.