अकोला : तुमची एखादी वस्तू रस्त्यावर किंवा गर्दीत हरवली तर ती मिळण्याची शाश्वती जवळपास नसल्यासारखीच. मात्र, अकोलेकरांना आलेला अनुभव काहीसा सुखावणारा आहे. कारण, गेल्या वर्षभरात त्यांच्या हरवलेल्या अनेक वस्तू वाहतूक पोलिसांनी त्यांना प्रामाणिकपणे परत केल्या आहेत. तेही अगदी जशाच्या तशा. अकोला वाहतूक पोलिसांच्या या सकारात्मक पायंड्यामूळे आता अकोल्यातील ऑटोचालकही त्याचंच अनुकरण करीत या सकारात्मक चळवळीचे घटक होऊ पाहत आहेत. 'वस्तू हरवली, प्रामाणिकपणा गवसला' याच्या प्रत्यय आणणारा हा अनोखा 'अकोला पॅटर्न' पाहूयात.
काय आहे अकोला शहर वाहतूक पोलिसांचा हा पॅटर्न?
तुमची एखादी वस्तू किंवा पैसे हरविल्याचा अनुभव तूम्ही कधी तरी घेतला असेलच. त्यावेळी होणारं दु:ख, चिडचिड अन त्रागाही तुम्हाला आठवत असेलच. कारण, हरविलेली वस्तू, पैसे परत मिळण्याची शक्यता जवळपास नाहीच्या बरोबरच. परंतू, अकोल्यात अकोलेकरांचा गेल्या वर्षभरातील अनुभव काहीसा सुखद आहे. अन् हा आनंद अनेकांच्या नशिबी आला तो अकोल्यातील वाहतूक पोलीस आणि काही प्रामाणिक ऑटोचालकांमूळे. अकोला पोलिसांच्या शहर वाहतूक शाखेच्या एका अनोख्या प्रामाणिकपणाचा अनुभव गेल्या वर्षभरातील जवळपास वीसपेक्षा अधिक प्रसंगांतून दिसून आला आहे. शहर वाहतूक विभागात जवळपास 80 कर्मचारी आहेत. रस्त्यावरून जातांना नागरिकांचे पर्स, पैसे, मोबाईल, कागदपत्रे हरवलीत. हे हरवलेले सामान आणि वस्तू शहर वाहतूक विभागात काम करणाऱ्या शिपायांना सापडल्यात. या पोलिसांनी त्याची शहानिशा करून या वस्तू त्यांच्या मूळ मालकाला जशाच्या तशा स्वरूपात परत केल्यात.
आरती मोरेंना तर त्यांच्यात जणू 'देवदूत'च दिसला
अकोल्यातील पंचशीलनगरमध्ये राहणाऱ्या आरतीताईंवर गेल्या सहा महिन्यांत एकामागून एक संकटं आलीत. जानेवारीत त्यांच्या पतीचं अपघाती निधन झालं. मे महिन्यात त्या बँकेच्या कामानं बाहेर निघाल्या होत्या. यावेळी हनीफभाईंच्या ऑटोने त्या बँकेत गेल्यात. बँकेत त्यांचा मोबाईल चोरीला गेला. अन बँकेजवळ उतरतांना त्यांची पतीची महत्वाची कागदपत्रे, सोनं अन पैसे असलेली बॅग ऑटोतच राहिली. दुहेरी संकटानं आरती भांबावून रडायला लागल्यात. तेथून दुसरे प्रवाशी घेऊन गेलेल्या ऑटोचालक हनीफभाईंना त्यांची बॅग ऑटोत राहिल्याचे नंतर लक्षात आले. त्यांनी ती बॅग अगदी जशीच्या तशी वाहतूक पोलिसांच्या स्वाधीन केलीय. अन वाहतूक पोलिसांनी ती आरतीताईंना परत केली. आता हरवलेली बॅग, त्यातील कागदपत्रं, मंगळसुत्र असं सारं कधीच मिळणार नाही, असं समजून त्या दु:खात होत्या. मात्र, त्यांना वाहतूक शाखेतून बॅग मिळाल्याचा फोन गेला. अन काही वेळ हे ऐकून त्या स्तब्ध झाल्यात. त्यांनी वाहतूक पोलीस कार्यालयात जावून जेंव्हा बॅग हाती घेतली तेंव्हा त्यांच्या डोळ्यातील अश्रू थांबता थांबत नव्हते. आरती यांच्याकडे आजही पोलीस अन ऑटोचालकाचे आभार मानायला शब्दही नाहीत. वाहतूक पोलीस अन ऑटोचालक हनिफभाई यांच्या रूपाने जणू 'देवदूत'च भेटल्याची भावना झाली. गेल्या वर्षभरात हरविलेल्या वस्तू वाहतूक पोलीस अन ऑटोचालकांनी परत केल्यामुळे आरती यांच्यासारखाच आनंद प्रत्येकाच्या चेहऱ्यावर पहायला मिळाला आहे.
या अनोख्या चळवळीत आता ऑटोचालकांचंही योगदान
अकोला शहरात जवळपास साडेसहा हजार ऑटोचालक आहेत. या प्रामाणिकपणाच्या कक्षा अकोल्यात आता हळूहळू रुंदावत आहेत. यासाठी वाहतूक शाखेचे पोलीस निरिक्षक गजानन शेळके यांनी यासंदर्भात ऑटोचालकांमध्ये यासंदर्भात जनजागृती करण्यासाठी दोनदा त्यांची बैठक घेतली. त्यांना यामागचा उदात्त हेतू समजून सांगितला. आता हळूहळू ऑटोचालक यासंदर्भात जागृत झाले आहेत. अलिकडच्या तीन महिन्यात पाच ऑटोचालकांनी त्यांच्या ऑटोत राहिलेल्या किंमती वस्तू, पैसे प्रवाशांना पोलिसांच्या माध्यमातून परत केले आहेत.
पोलीस आणि ऑटोचालकांनी नम्रपणे नाकारलं 'बक्षीस'
लोकांना आपली वस्तू सापडल्यानंतर होणारा आनंद हा शब्दांच्या पलीकडचा असतो. या वस्तू परत मिळाल्यानंतर अनेकांनी वाहतूक पोलीस आणि ऑटोचालकांना आनंदाने 'बक्षीस' देऊ केलं. मात्र, वस्तूच्या मालकाने आनंदानं देऊ केलेलं बक्षीस वाहतूक पोलीस आणि ऑटोचालकांनी विनम्रपणे नाकारलं. हे आपलं कर्तव्यच असल्याची भावना या लोकांनी व्यक्त करीत बक्षीस नाकारलं.
वाहतूक पोलिसांचा 'रिवार्ड' देऊन होतो 'सत्कार'
नागरिकांच्या वस्तू, पर्स, बॅग प्रामाणिकपणे परत करणाऱ्या पोलिसांचा अकोला पोलीस प्रशासनाच्या वतीने हजार रुपयांचा 'रिवार्ड' देऊन सत्कार केला जातो. पोलीस निरीक्षक गजानन शेळके पुष्पगुच्छ देत या कर्मचाऱ्यांचा आणि ऑटोचालकांचा सत्कार करतात. अकोला शहर वाहतूक पोलिसांच्या या प्रामाणिपणाचं राज्याच्या गृहमंत्र्यांनी अनेकदा 'ट्वीट' करीत कौतुकही केलं आहे.
आतापर्यंत काय-काय सापडलं?
ह्या मोहिमेत गेल्या वर्षभरात आतापर्यंत अनेकांना त्यांच्या वस्तू परत मिळाल्याचा आनंद साजरा करता आलाय. शहर वाहतूक पोलिसांनी गेल्या वर्षभरात 12 मोबाईल, 2 पर्स, 3 पाकिटे, 3 महत्वाचे कागदपत्रे असलेल्या पिशव्या मूळ मालकांचा शोध घेऊन परत केल्या आहेत. तर पाच घटनेत ऑटोचालकांनीही महत्वाच्या कागदपत्रं, वस्तूंसह लाखो रूपयांची रक्कम पोलिसांच्या सहकार्याने मूळ मालकाकडे स्वाधीन केली आहे.
अकोला शहर वाहतूक पोलिसांच्या 'उपक्रमशीलते'चं राज्यभरात कौतूक. अनेक उपक्रम राज्यात झालेत 'पॅटर्न'
अकोला शहर वाहतूक पोलीस शाखेच्या अनेक मोहिमांचे थेट राज्याच्या मुख्यमंत्र्यांपासून तर गृहमंत्र्यांनी भरभरून कौतुक केलं आहे. कोरोना काळात 'नो मास्क, नो सवारी' 'सारखी मोहिम तर राज्य स्तरावर 'अकोला पॅटर्न' म्हणून राबविली गेली आहे. आपल्या प्रत्येक मोहिमेतून अकोला पोलिसांनी सर्वसामान्य जनतेच्या मनात आपुलकी आणि आदर निर्माण होईल यासाठी सकारात्मक प्रयत्न केलेत. कोरोना काळात रक्ताचा तुटवडा असतांना वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांनी रक्तदान शिबीर आयोजित केले होते. कोरोना काळात नियम मोडणाऱ्या 1 लाख 60 हजार वाहनांवर दंडात्मक कारवाई केली. यात दिड कोटींच्या वर दंड सहकारी तिजोरीत जमा झाला. कोरोना काळात जेष्ठ नागरिकांना मदत करण्यासाठी एक कॉल करा, मदत मिळवा ही मोहीम राबविण्यात आली, त्या अंतर्गत वैद्यकीय मदत, वाहन उपलब्ध करून देणे, गरीब जेष्ठांना घरपोच राशन पोहचविणे ही कामे करण्यात आली. लॉकडाऊन मुळे ऑटो बंद असल्याने गरीब व आजारी ऑटो चालकांची उपासमार होऊ नये म्हणून राशन वाटप करण्यात आले होते. अशा अनेक सामाजिक उपक्रमातून अकोला शहर वाहतूक शाखेनं पोलीसांना अधिकाधिक लोकाभिमुख करण्याचा प्रयत्न केला आहे.
अलिकडच्या काळात महाराष्ट्र पोलीस अनेक कारणांनी बदनाम झालेले पहायला मिळालेत. अशा वातावरणात अकोल्यातील वाहतूक पोलिसांनी प्रामाणिकपणाचा पाडलेला हा पायंडा सुखावणारा आहे. या प्रामाणिकपणाची क्षितीजं त्यांच्या इतर कामांपर्यंतही रूंदावली जावीत, हिच सदिच्छा.
महत्वाच्या बातम्या :