अमरावती : विदर्भाचे काश्मीर म्हणून ओळख असलेल्या अमरावतीच्या चिखलदरा येथे स्कायवॉक सुविधा पर्यटकांसाठी उपलब्ध होणार आहे. भारतातील आणि जगातील पहिला सर्वाधिक लांबीचा स्कायवॉक असणार आहे. त्यामुळे आता अमरावतीच्या चिखलदऱ्याचं सौंदर्य आता जगाच्या नकाशावर आणण्याच्या हालचाली सुरु आहेत.
मेळघाटच्या चिखलदरातील गोराघाट पॉईंटपासून ते हरीकेन पॉईंटपर्यंत स्कायवॉक 407 मीटरचा हा प्रकल्प 2018 मध्ये प्रस्तावित करण्यात आला आहे. यासाठी 34.34 कोटी रुपये खर्च होणार आहे. याचे जलद गतीने काम देखील सुरू आहे. दोन मोठ्या टेकड्यांना स्काय वॉकने जोडण्यात येईल.
पर्यटकांसाठी चिखलदरातील स्कायवॉक एक नवे आकर्षण ठरणार आहे. स्कायवॉकच्या माध्यमातून या भागात पर्यटकांची संख्याही वाढेल. मेळघाटातील चिखलदरा हा भाग सिडकोद्वारा विकसित करण्यात येत आहे. त्यामुळे आता अमरावतीच्या चिखलदरामध्ये देशातूनच नव्हे तर परदेशातून पर्यटकांची गर्दी वाढेल. जगात स्वित्झर्लंड आणि चायना या ठिकाणी स्कायवॉक आहे. स्वित्झर्लंडचा स्कायवॉक हा 397 मीटरचा आहे. तर चायनाचा स्कायवॉक 360 मीटरचा आहे. त्यामुळे चिखलदरा येथे होत असलेला स्कायवॉक हा जगातील सर्वाधिक लांबीचा स्कायवॉक ठरणार आहे.
चिखलदरा पर्यटन विकासाच्या आराखड्यात स्कायवॉकचा समावेश करण्यात आला आहे. पर्यटनाच्या दृष्टीने चिखलदरा येथे दोन टेकड्यांना जोडणारा हा भारतातील पहिला स्काय वॉक राहणार आहे. गोरा घाट पॉईंटपासून तर हरिकेन पॉईंटपर्यंत पाचशे मीटरचा हा स्कायवॉक असणार आहे. पुढील वर्षात स्कायवॉक पर्यटनासाठी तयार असणार आहे.
मन मोहून टाकणारं चिखलदराचं सौंदर्य
दूरवर पसरलेली धुक्याची चादर, श्वास रोखून धरायला लावणाऱ्या पर्वत रांगा, हजारो फूट उंचीवरुन कोसळणारे धबधबे, नागमोडी रस्ता, वातावरणातील गारवा, हाड गोठवणारी थंडी, मेळघाटातील चिखलदऱ्याचं सौंदर्य पावसात आणखी फुलले असते. साधारणत: जून-जुलै महिन्यापासून चिखलदरामधील पर्यटन हे सुरू होत असते, मात्र यावेळी कोरोनामुळे येथील पर्यटन ठप्प झालं होतं, आता हळू हळू चिखलदरा पूर्वपदावर येत आहे. सध्यापावसाचा आनंद घेण्यासाठी राज्यभरातून पर्यटक दाखल झाले आहे. चिखलदरा मध्ये देवी पाईट, गाविडगड किल्ला तर अक्षरशः गर्दीने फुलून गेला आहे. उंच पहाडावर असलेली घोडा सवारी, उंट सवारी, सायकल सवारी यामुळें पर्यटकाची पसंती देवी पॉईंटला दिसून येत आहे. विदर्भाच्या या काश्मीरमध्ये विविध पाहण्याजोगे पॉईंट आहे. देवी पॉईंट लगत असलेल्या तलावावर बोटिंगचा आनंद घेता येतो. दैनंदिन कामात महिला वर्षभर व्यस्त असतात पण चिखलदरामध्ये आलो की वर्षभराचा ताण निघून जाऊन नवीन शक्ती या निसर्गातून मिळते अस पर्यटक सांगतात.
समुद्र सपाटी पासून हजारो किलोमीटरवर असलेल्या चिखलदरा हे पर्यटकांना भूरळ पाडणारे आहे. सोबतच जवळच असलेले सेमाङोह, आणि जंगलातील हत्ती सफारीसाठी प्रसिद्ध असलेले कोलकास येथे पर्यटक जाऊन निसर्गाचा मनमुराद आनंद घेतात. निसर्गाचा हा अदभूत नजारा साक्षात अनुभवायचा असेल आणि पावसाळ्याचा सेलिब्रेशनचा विचार तुमच्या मनात सुरू असेल तर तुम्ही चिखलदरा प्लॅन करायला हरकत नाही.