घरात वडिलांचा मृतदेह असतानाही 'तो' रुग्णसेवा करत होता
अकोल्यातील जावेदनं आपल्या कृतीतून समाजासमोर 'कृतीशील आदर्शा'चा खरा वस्तुपाठच घालून दिला आहे. कोरोनामुळे समाजानं खुप सारं काही गमावलं आहे. अशा या वाळवंटातही जावेदसारखी माणसं आपल्या कृतीतून माणुसकीची हिरवळ पेरण्याचा प्रयत्न करीत आहेत.
अकोला : सकाळी 10 वाजताच्या दरम्यान जावेदचा फोन वाजला. समोरून त्याला सांगण्यात आलं की, बुलडाण्याच्या एका कोरोना रुग्णाचा मृतदेह पोहोचवायचा आहे. जावेदनं अगदी शांततेनं समोरच्या व्यक्तीला उत्तर दिलं. "काही काळजी करू नकोस, मी जातो बुलडाण्याला... लगेच येतो" असं म्हणत जावेदनं फोन ठेवला. एरवी जावेद कुठे बाहेर गाडी घेवून निघाले की, वडील त्याला हळूच म्हणायचे, "बेटा!, खैरियत से जाना. आराम से गाडी चलाना" आजही जावेद बाहेर निघाला होता. परंतु, आज त्याचे वडील घरात शांतपणे झोपलेले होते. अन् ते आता कधी उठणारही नव्हते. कारण, 'अल्ला'नं त्यांना 'जन्नत'मध्ये बोलवून घेतलं होतं. त्यांनी या जगाचा निरोप घेतलेला होता. जावेदनं निघतांना वडिलांच्या पार्थिवाला नमस्कार केला. अन् तो अकोल्याच्या जिल्हा रूग्णालयाकडे निघाला. त्याला तिथून अँबूलन्स घेऊन बुलडाणा येथे एका कोरोना मृताचा मृतदेह घेऊन जायचं होतं.
हा प्रसंग घडला आहे अकोल्यातील जावेद खान यांच्यासोबत... जावेद खान हे अकोल्यातील मोहम्मद अली रोड भागात राहतात. जावेद गेल्या पाच महिन्यांपासून कोरोनाच्या संकटात 'कोरोनादुत' म्हणून काम करतो आहे. कोरोना काळात अकोल्यात आभाळभर सामाजिक काम उभं करणाऱ्या कच्छी-मेमन जमात ट्रस्ट'सोबत तो काम करतो आहे. ते ही अगदी कोणताही मोबदला न घेता. मात्र, आज त्यांची कसोटी पाहणारा प्रसंग त्यांच्यासमोर उभा राहिला. आज सकाळी त्यांचे वडील शाहबाज खान यांचं आकस्मिक निधन झालं. जावेद यांची एक बहीण हैद्राबाद येथे राहते. त्यामुळे बहीण संध्याकाळपर्यंत पोहोचल्यानंतर वडीलांचे अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय जावेद यांच्या कुटुंबियांनी घेतला. त्यामुळे सोमवारी दिवसभर जावेद यांच्या वडिलांचा मृतदेह शितपेटीत ठेवत त्यांच्या बहिणीची वाट पाहणं सुरु होतं.
दु:खाच्या क्षणीही जावेदचं सेवेला प्राधान्य
घरात वडिलांचं पार्थिव पडलेलं असतांनाही जावेद आपल्या सेवाकार्यापासून थोडाही विचलित झाला नाही. या दु:खाच्या प्रसंगातही त्याच्यातील संवेदनशील रूग्णसेवक तसाच अविचल होता. त्याने कोरोनानं मृत्यू झालेल्या बुलडाणा येथील व्यक्तीचा मृतदेह गावी पोहोचवायला होकार दिला. त्याच्या या निर्णयाला त्याचा निग्रह पाहून घरच्यांनीही होकार दिला. तो 14 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता मृतदेह अॅम्बुलन्समध्ये घेवून बुलडाण्याकडे निघाला. हैद्राबादवरून येणारी बहीण रात्री 8 वाजता अकोल्याला पोहोचणार होती. त्यामुळे रात्री 9 वाजता त्याच्या वडिलांचा दफनविधी ठरवण्यात आला. जावेद संध्याकाळी 4 वाजेपर्यंत घरी पोहोचला. अखेर रात्री 8 वाजता त्याची हैद्राबादची बहीण अकोल्यात पोहोचली. अन् रात्री 9 वाजता त्याच्या वडीलांचा दफनविधी कब्रस्तानात पार पडला. दफनविधीला आलेल्या नातेवाईकांनाही जावेदच्या कार्याचा अभिमान वाटला. या दु:खाच्या प्रसंगातही अनेकांनी त्याला 'दुवा' देत त्याच्या पाठीवर कौतुकाची थाप ठेवली.
जावेदचं कोरोना काळात आभाळभर काम
जावेद कोरोनाच्या आधी ट्रॅव्हल एजन्सीच्या कार्यालयात काम करीत होता. मात्र, कोरोनामुळे हा व्यवसाय डबघाईस आला अन् जावेद यांची नोकरी गेली. जावेद यांच्या घरची परिस्थिती साधारणच. मात्र, बालपणापासून त्याला सामाजिक कार्याची आवड आहे. त्यातूनच कोरोना काळात रूग्णसेवेचं उदात्त काम करणाऱ्या 'कच्छी-मेमन जमात ट्रस्ट' या सेवाभावी तरूणांच्या समूहासोबत ते जुळले गेले. अकोल्यातील कच्छी-मेमन जमात ही मुस्लिम संघटना सदैव राष्ट्रीय आणि सामाजिक एकात्मतेसाठी काम करीत आहे. कोरोना संकटात अकोल्यात प्रशासनाच्या खांद्याला खांदा लावत कोरोनाबाधित रूग्णांवर अंत्यसंस्कार, त्यांच्या आरोग्यासाठी ही संघटना झटत आहे.
या तरूणांसोबत जावेद गेल्या पाच महिन्यांपासून अॅम्बुलन्सवर चालकाची जबाबदारी पार पाडतो आहे. ती ही अगदी सेवाभावी वृत्तीनं.... मागच्या पाच महिन्यांत त्यांनी आजूबाजूच्या तीन-चार जिल्ह्यातील अनेक मृतांचे मृतदेह नेणे, आणणे असं काम केलं. या पाच महिन्यांत कोरोनाबाधित आणि कोरोना संशयितांचे जवळपास 275 मृतदेह जावेदनं आपल्या गाडीतून स्मशानभूमी, कब्रस्तानपर्यंत पोहोचविले. विशेष म्हणजे त्यांनी कधी आपलं काम समाजासमोर मिरवलंही नाही. किंवा समाजासमोर त्यांनी स्वत:ला 'कोरोनायोद्धा' म्हणून मिरवूनही घेतलं नाही. तो या सर्व संकटकाळात निस्पृह आणि धीरोदात्तपणे आपलं काम अगदी निष्ठेनं करीत होता.
'घर से मस्जिद है बहूत दूर, कही यू करले... किसी रोते हूए बच्चे को हँसाया जाये'... काही वर्षांपुर्वी आलेल्या 'तमन्ना' या हिंदी चित्रपटातलं हे एक सुंदर गीत. गीतकार आणि शायर निदा फाजली यांचं हे गीत प्रत्येक धर्मग्रथांचं 'सार' अन् 'सरनामा'चं म्हणायला हवं. अकोल्यातील जावेदनं आपल्या कृतीतून समाजासमोर 'कृतीशील आदर्शा'चा खरा वस्तुपाठच घालून दिला आहे. कोरोनामुळे समाजानं खुप सारं काही गमावलं आहे. अशा या वाळवंटातही जावेदसारखी माणसं आपल्या कृतीतून माणुसकीची हिरवळ पेरण्याचा प्रयत्न करीत आहेत. जावेदच्या या सेवा अन् माणूसकीच्या 'जज्ब्या'ला 'एबीपी माझा'चा सलाम!
महत्त्वाच्या बातम्या :
सांगलीत "त्या" कोरोना योध्याच्या चितेला आयुक्तांनी दिला अग्नी
गॅसने भरलेल्या टँकरचा ड्रायव्हर चालत्या गाडीत बेशुद्ध; पोलिसाच्या धाडसामुळे अनर्थ टळला
लॉकडाऊनमुळे नोकरी गेलेल्या तरुणाने स्वत:चा उद्योग सुरु केला, इतरांनाही रोजगार दिला!