Ajit Pawar : दंगली घडतात तेव्हा 'या' गोष्टींची जाणीव ठेवा; अजित पवारांची कळकळीची विनंती
Ajit Pawar : शिवजन्मभूमी शिवनेरीच्या पायथ्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ स्मारकाच्या अनावरण सोहळ्यानिमित्ताने अजित पवारांनी सध्याच्या परिस्थितीकडे लक्ष वेधलं.
Ajit Pawar in Pimpari Chinchwad : दंगली घडतात तेंव्हा हातावरच पोट असणाऱ्यांना मोठी किंमत मोजावी लागते. त्यांच्या चुली बंद पडतात. तेव्हा राजकीय फायद्यासाठी समाजात तेढ निर्माण करणाऱ्यांनी याची जाणीव ठेवावी, असं म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचे कान टोचले. शिवजन्मभूमी शिवनेरीच्या पायथ्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ स्मारकाच्या अनावरण सोहळ्यानिमित्ताने अजित पवारांनी सध्य परिस्थितीकडे लक्ष वेधलं. मोघलांचं राज्य, निजामशहाचं राज्य, आदिलशहाचं राज्य असं म्हटलं जातं पण शिवाजी महाराजांच्या राज्याला हे रयतेचे राज्य, हे हिंदवी स्वराज्य म्हणून संबोधले जाते. पण कधी कधी राजकीय फायद्यासाठी प्रक्षोभक भाषणं केली जातात. यातून राज्याचं काहीच भलं होणार नाही, याकडे ही पवारांनी लक्ष वेधलं.
अजित पवारांनी याकडे लक्ष वेधलं
बाकीच्या राज्यांना मोगलांच्या राज्य, आदिलशहाचं,निजामशाहींचं, कुतुबशाहींचं राज्य संबोधले जाते. तसं छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याला भोसलेंचं राज्य म्हटलं नाही. रयतेचं राज्य, हिंदवी स्वराज्य असं महाराजांनी शिकवलं आहे. परंतु, काही माणसं राजकीय फायद्यांकरिता, समाजा समाजात तेढ निर्माण करण्याच काम करतात. अंतर पाडण्याचं काम करतात. काही निमित्तानं प्रक्षोभक भाषणं करतात. काही गजर नाही, काही गोष्टी वर्षानुवर्षे चालत आल्यात त्यावेळी कोणी बोललं नाही. आता कायदा सुव्यवस्था व्यवस्थित नांदत असताना, वेगळं कस घडेल याबद्दलचा जो प्रयत्न चालला आहे. तो तुम्हाला आम्हाला हाणून पडावा लागेल. यातून तुमचं माझं, राज्याचं भल होणार नाही. ज्या वेळेस दंगली होतात त्यावेळी गोर-गरिबाला किंमत मोजावी लागते. अनेकांच्या चुली बंद पडतील. ज्याची चांगली परिस्थिती आहे तो आठ दहा दिवस घरात राहू शकतो. याची जाणीव आपण सर्वांनी ठेवायला हवी. आपण सर्व गुण्या गोविंदाने राहतो, त्याला कुठंही डाग लागू देऊ नका, दृष्ट लागू देऊ नका, अशी विनंती अजित पवारांनी केली.
ओबीसी आरक्षणासाठी निवडणुका पुढे ढकलल्या
ओबीसी समाजाला प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे म्हणून निवडणुका पुढं ढकलल्या, पुणे जिल्ह्यातील आठ मार्केट कमिटी येथे प्रशासक नेमले जातील. त्या ही निवडणूक उद्याच्या काळात घ्यायच्या आहेत. आज निवडणुका झाल्या तर ओबीसींना त्यांच्या संख्येच्या प्रमाणात प्रतिनिधित्व मिळणार नाही. हे बरोबर नाही, हे आम्हाला पटलं नाही. म्हणून, आम्ही सभागृहात एकमताने ठराव केला आणि निवडणुका पुढे ढकलल्या, असं पवारांनी सांगितलं
गरज पडली तर महाराष्ट्र दिल्लीत कोणालाही टक्कर देईल, केंद्राला इशारा
अजित पवारांनी म्हटलं की, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने प्रेरणा मिळते, त्यांचा आदर्श ठेवूनच आपल्याला पुढे जायचं आहे. देशावर दिल्लीवर संकट आलं, त्या त्या वेळेस महाराष्ट्र देशाच्या रक्षणासाठी धावून गेलेला इतिहास आहे. यापुढं देखील, आपल्या देशावर जेव्हा, जेव्हा संकट येईल, देश वाचवण्यासाठी वेळ येईल तेव्हा महाराष्ट्र नक्की मदतीला धावून जाईल असा विश्वास आहे. गरज पडली तर महाराष्ट्र दिल्लीत कोणालाही टक्कर देईल. ही धमक महाराष्ट्रात असा इतिहास छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे. तो विसरता येणार नाही. शरद पवार नेहमी सांगतात, महाराष्ट्र कधी कोणासमोर झुकलेला नाही. यापुढं झुकणार देखील नाही. छत्रपती शिवाजी महाराज यांचा विचार घेऊन पुढं जायचं आहे.