अजितदादा आणि शिंदेंमध्ये शीतयुद्ध? एकमेकांच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणं टाळलं
NCP Vs Shiv Sena Cold War : महाबळेश्वरच्या पर्यटन महोत्सवाला अजित पवारांच्या नेत्यांनी पाठ फिरवल्यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यक्रमाला एकनाथ शिंदे आणि त्यांच्या नेत्यांनी पाठ फिरवल्याचं दिसून आलं.

मुंबई : रखडलेल्या पालकमंत्रिपदाचा वाद... मंजूर न होणारा निधी... अडकवल्या जाणाऱ्या फाईल्स.. यावरून महायुतीतील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (Shiv Sena Vs NCP) अनेकदा खटके उडाले आहेत. अशातच महायुतीतल्या नाराजीनाट्याचा आणखी एक अंक समोर आला आहे. राष्ट्रवादीने शनिवारी मुंबईत आयोजित केलेल्या माजी मुख्यमंत्र्यांच्या सन्मान कार्यक्रमाला एकनाथ शिंदे (Eknath Shinde) न गेल्याने नाराजीच्या चर्चांना उधाण आलं होतं. पण त्याआधी शिवसेना नेते आणि पर्यटनमंत्री शंभुराज देसाईंनी आयोजित केलेल्या महाबळेश्वर पर्यटन महोत्सवाला उपमुख्यमंत्री अजित पवारांसह (Ajit Pawar) राष्ट्रवादीच्या सर्वच नेत्यांची गैरहजेरी लावली होती. त्यामुळेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेही राष्ट्रवादीच्या कार्यक्रमाला अनुपस्थित राहिल्याची चर्चा आहे.
महाबळेश्वर पर्यटन महोत्सवाकडे राष्ट्रवादीची पाठ
राज्याचे पर्यटनमंत्री शंभुराज देसाईंनी आयोजित केलल्या महाबळेश्वर पर्यटन महोत्सवाला उपमुख्यमंत्री अजित पवारांसह राष्ट्रवादीच्या सर्वच नेत्यांची गैरहजेरी लावल्याचं दिसून येतंय. या कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेत राष्ट्रवादीच्या नेत्यांची नावं असली तरी अद्याप कुणीही त्या कार्यक्रमाला गेलं नाही. साताऱ्यातील राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री मकरंद पाटील, राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी या कार्यक्रमाकडे पाठ फिरवली.
दुसरीकडे, राष्ट्रवादीने मुंबईत आयोजित केलेल्या माजी मुख्यमंत्र्यांच्या सत्कार सोहळ्याच्या कार्यक्रमाकडे एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पक्षाचा कोणताही नेता उपस्थित राहिला नाही. त्यामुळे या दोन्ही पक्षांमध्ये काही धूसफूस सुरू आहे का अशी चर्चा सुरू आहे.
राष्ट्रवादी-शिवसेनेमध्ये अंतर्गत धूसफूस?
एकनाथ शिंदे हे त्यांच्या मूळगावी, दरेगावात आहेत. त्यामुळे अजित पवारांनी आयोजिक केलेल्या कार्यक्रमाला ते उपस्थित राहू शकले नाहीत असं सांगण्यात आलं. पर्यटन विभागाच्या महोत्सवाचा रविवारी शेवटचा दिवस आहे. या कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे अजित पवार या कार्यक्रमाला उपस्थित राहतात का किंवा त्यांचे जिल्ह्यातील मंत्री मकरंद पाटील आणि इंद्रनील नाईक या कार्यक्रमाला उपस्थित राहणार का याकडे सर्वाचं लक्ष आहे.
रायगडच्या पालकमंत्रिपदावरून राष्ट्रवादी आणि शिवसेना या दोन्ही पक्षांमध्ये वाद सुरू आहे. त्यातच 1 मे रोजी राष्ट्रवादीच्या आदिती तटकरे यांच्या हस्ते रायगडमध्ये ध्वजवंदनाचा कार्यक्रम पार पडल्याने शिंदे गट नाराज असल्याची चर्चा आहे.
एकीकडे या दोन्ही पक्षांमध्ये धूसफूस सुरू असताना महायुतीतील सर्वात मोठा पक्ष भाजपकडून मात्र यामध्ये मध्यस्तीसाठी कोणतीही हालचाल होताना दिसत नाही. शिवसेनेच्या संजय शिरसाटांनी निधी वाटपावरून थेट अजित पवारांना लक्ष्य केल्यानंतर हा वाद आणखीनच वाढल्याचं दिसून येतंय.























