(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Ajit Pawar: अजित पवारांचा ब्रॉन्कायटिसच्या दुखण्याने डोकं वर काढलं, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंच्या कार्यक्रमाला दांडी
Ajit Pawar: आज लातूर जिल्ह्यातील उदगीर येथे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या उपस्थितीत बुद्ध विहाराचे उद्घाटन होणार आहे. विविध शासकीय योजनेतील महिला लाभार्थ्यांचाही कार्यक्रम होणार आहेत मात्र यासाठी अजित पवार गैरहजर राहणार आहे.
मुंबई - आज लातूर जिल्ह्यातील उदगीर येथे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु (President Draupadi Murmu) यांच्या उपस्थितीत बुद्ध विहाराचे उद्घाटन होणार आहे. शिवाय विविध शासकीय योजनेतील महिला लाभार्थ्यांचाही कार्यक्रम होणार आहे. मात्र या कार्यक्रमासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) गैरहजर राहणार असल्याची माहिती समोर आली आहे. अजित पवार (Ajit Pawar) या कार्यक्रमाला अनुपस्थित राहण्याचं कारण देखील समोर आलेलं आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना ‘ब्रॉन्कायटीस’चा त्रास होत असून डॉक्टरांनी त्यांना विश्रांतीचा सल्ला दिला आहे. यामुळे लातूर जिल्ह्यातील उदगीर येथे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु (President Draupadi Murmu) यांच्या उपस्थितीत होणाऱ्या कार्यक्रमांना उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित राहू शकणार नाहीत. याबाबत राष्ट्रपती महोदयांच्या कार्यालयाला अवगत करण्यात आले आहे, असे उपमुख्यमंत्री कार्यालयाच्या वतीने कळवण्यात आले आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) हे मागील काही महिन्यांपासून जनसन्मान यात्रा, ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या लाभार्थ्यांची भेट, शासकीय बैठका, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यक्रमांच्या निमित्ताने सातत्याने राज्यातील विविध भागांचा दौरा करत आहेत. आज त्यांचा राष्ट्रपती महोदयांसोबत उदगीरचा दौरा होता. परंतु ‘ब्रॉन्कायटीस’चे निदान झाल्याने उपमुख्यमंत्र्यांना त्यांचा उदगीर दौरा रद्द करावा लागत आहे. प्रकृतीत सुधारणा होताच ते लवकरच पुन्हा दौरे सुरु करतील. दरम्यानच्या काळात मुंबईतील शासकीय निवासस्थान येथून शासकीय कामकाज पाहणार आहेत, असेही उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाने कळवले आहे.
राष्ट्रपतींच्या दौऱ्यासाठी 600 बसचं नियोजन, पण ST कामगारांचा संप
लातूर जिल्ह्यातील उदगीर येथे बुधवारी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (President Draupadi Murmu)यांच्या उपस्थितीत बुद्ध विहाराचे उद्घाटन होणार आहे. शिवाय विविध शासकीय योजनेतील महिला लाभार्थ्यांचाही कार्यक्रम होणार आहे. याकरिता तब्बल 600 बसेसचे नियोजन करण्यात आले आहे. बुद्ध विहार उद्घाटनानंतर उदगीर येथील उदयगिरी हायस्कूलच्या मैदानावर महिला सक्षमीकरणाचा कार्यक्रम होणार आहे. याकरिता जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून महिला दाखल होणार असल्याने बसेसचे नियोजन करण्यात आले आहे.
संपामुळे लातूर प्रशासनाची धांदल
लातूर विभागातील 130, नांदेडमधील 270, परभणी येथील 150 तर यवतमाळ येथील 50 बसेस लातूर विभागात आज संध्याकाळी दाखल होणार आहे. त्या-त्या डेपोतून या बसेस मुक्कामी संबंधित गावात जाणार आहेत. उद्या सकाळी 7 वाजता गावातील महिलांना घेऊन सकाळी 9 पर्यंत त्या बसेस कार्यक्रम ठिकाणी येणार आहेत. मात्र एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे लातूर प्रशासनाची चांगलीच धांदल उडाल्याचे चित्र आहे.