Ahmednagar : आमदार बाथरूममध्ये अडकले, विधिमंडळाच्या विमुक्त जाती आणि भटक्या जमाती कल्याण समितीचा दौरा चर्चेत
विधिमंडळाची व्हीजेएनटी समिती अहमदनगर जिल्ह्याच्या तीन दिवसांच्या दौऱ्यावर होती.
Ahmednagar : विधिमंडळाच्या विमुक्त जाती आणि भटक्या जमाती कल्याण (व्हीजेएनटी) समितीचा अहमदनगर दौरा चांगलाच चर्चेत राहिला. विधिमंडळाची व्हीजेएनटी समिती अहमदनगर जिल्ह्याच्या तीन दिवसांच्या दौऱ्यावर होती, या दौर्यादरम्यान समितीने 21 आणि 22 एप्रिल रोजी पाथर्डी,राहुरी, जामखेड, कर्जत , पारनेर या तालुक्यातील विविध गावांना भेटी दिल्या. गावांतील कामांचा आढावा घेतला.
दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयात समितीने अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. मात्र या बैठकीत जिल्ह्यातील अधिकाऱ्यांना समितीच्या प्रश्नांना उत्तरे देता आली नाहीत, तसेच अधिकाऱ्यांनी चुकीची माहिती दिली असं म्हणत समितीने बैठकीवर ती बहिष्कार टाकला. मागील दहा वर्षांत विमुक्त जाती आणि भटक्या जमातीसाठी किती निधी खर्च झाला? याची माहिती अधिकाऱ्यांना नाही असं म्हणत समितीच्या सदस्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. या बैठकीला समितीचे अध्यक्ष आमदार शांताराम मोरे सदस्य आमदार गोपीचंद पडळकर, आमदार बळवंत वानखेडे , आमदार राजेश राठोड, आमदार रत्नाकर गुट्टे , आमदार इंद्रनील नाईक, जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भोसले, पोलीस अधीक्षक मनोज पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजी लांगोरे, विधीमंडळाचे कक्ष अधिकारी विनोद राठोड यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.
आमदार रत्नाकर गुट्टे अडकले बाथरूममध्ये
समितीचे सदस्य असलेले आमदार रत्नाकर गुट्टे हे ज्या हॉटेलमध्ये मुक्कामी होते, त्या हॉटेलमधील बाथरूमचा दरवाजा उघडत नव्हता. ते सकाळी आंघोळीसाठी गेले असता तब्बल अर्धा तास बाथरूममध्येच अडकून पडले. एवढा प्रचंड गाफीलपणा अधिकाऱ्यांकडून समितीबाबत झाल्याने आमदार गोपीचंद पडळकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
तहसीलदार प्रांताधिकारी यांचे बैठकीला अनुपस्थिती
समितीच्या बैठकीला आलेल्या अधिकाऱ्यांकडे कोणत्याही प्रकारची माहिती नसल्याचा आरोप समितीच्या सदस्यांनी केला. तपासणीची माहिती नाही , बिंदुनामावलीबाबत माहिती विचारली तर अधिकाऱ्यांकडे माहिती नाही, महानगरपालिकेने सादर केलेल्या माहितीमध्ये गंभीर चुका आढळून आल्याचे समितीने म्हटले, तर तहसीलदार, प्रांताधिकारी हे बैठकीला आलेच नाहीत. यावरून अधिकाऱ्यांना समितीच्या दौर्याबाबत गांभीर्य नसल्याचं आमदार गोपीचंद पडळकर यांनी म्हटलं आहे. तसेच समितीसाठी पोलिसांकडून देखील व्यवस्था करण्यात आली नसल्याचा आरोप पडळकर यांनी केला आणि त्यावरून नाराजी देखील व्यक्त केली.
हेही वाचा :
'रिपाइं कार्यकर्ते मशिदीवरच्या भोंग्यांना संरक्षण देतील', रामदास आठवलेंचं राज ठाकरेंना आव्हान