शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करणाऱ्यांना आमची मदत कमीच वाटणार : सदाभाऊ खोत
"आम्हाला शेतकऱ्यांची आणि शेतकऱ्यांच्या शेतमालाची काळजी आहे. आम्ही बोलण्यापेक्षा शेतकऱ्यांच्या काय मिळेल याकडे जास्त लक्ष देतो", असं म्हणत सदाभाऊ खोत यांनी मंत्र्यांना कांदे फेकून मारा या राज ठाकरेच्या टीकेला उत्तर दिलं.
सांगली : शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरुन मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केलेल्या सरकारवर टीकेला सदाभाऊ खोत यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. आम्ही बोलण्यापेक्षा शेतकऱ्यांच्या पदरात काय पडेल याकडे जास्त लक्ष देतो. शेतकऱ्यांना काहीच मदत न करणाऱ्यांना आमची मदत कमीच वाटणार, असा टोलाही सदाभाऊ खोतांना राज ठाकरे आणि जयंत पाटलांना लगावला.
कांद्याच्या दरावरुन राज ठाकरे आणि जयंत पाटलांनी सरकारवर टीका केली होती. या टीकेला प्रत्युत्तर देताना कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत म्हणाले की, "कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी काय केले पाहिजे एवढे समजण्याएवढे सरकार शहाणे आहे. शेतात काम करून आलेली आणि शेतकऱ्यांच्या आंदोलनाचे नेतृत्व केलेली आमच्यासारखी माणसे या सरकारमध्ये काम करत आहेत."
"आम्हाला शेतकऱ्यांची आणि शेतकऱ्यांच्या शेतमालाची काळजी आहे. आम्ही बोलण्यापेक्षा शेतकऱ्यांच्या काय मिळेल याकडे जास्त लक्ष देतो", असं म्हणत सदाभाऊ खोत यांनी मंत्र्यांना कांदे फेकून मारा या राज ठाकरेच्या टीकेला उत्तर दिलं.
"काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सत्ताकाळमध्ये 50 पैशांपासून एक रुपयापर्यंत मदत दिली गेली होती. आमच्या सरकारने किलोला दोन रुपये मदत दिली आहे. म्हणजे आघाडी सरकारपेक्षा आम्ही दुप्पट मदत केली आहे, तसेच गरज भासली तर आणखी मदत देण्याची तयारी राज्य सरकारची आहे. ज्यांनी शेतकऱ्यांना मदतच दिली नव्हती त्यांना आमच्या सरकारने दिलेली मदत तोकडीच वाटणार," असा टोला सदाभाऊ खोत यांनी जयंत पाटलांना लगावला.