जळगावात नववधूच्या संशयास्पद मृत्यूनंतर तिच्या पतीचाही मृत्यू
प्रशांत आणि आरती यांचा गेल्या आठवड्यात प्रेम विवाह केला होता. दोघेही सज्ञान असलायने दोघांनी पोलिसांना आपण विवाह करून परत आल्याचं सांगून आपला संसार पाळधी गावात सुरू केला होता.
जळगाव : प्रेम विवाहानंतर चौथ्याच दिवशी नववधूचा संशयस्पद मृत्यू झाल्याची घटना काल जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यातील पाळधी या गावात उघडकीस आली होती. या घटनेत मयत तरुणीचा पतीही बेशुद्ध अवस्थेत या ठिकाणी आढळून आला होता. त्याच्यावर उपचार सुरू असताना त्याचाही मृत्यू झाल्याने या घटनेचे गूढ आणखी वाढले आहे.
जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यातील पाळधी गावातील तरुणी आरती भोसले आणि प्रशांत पाटील या दोघांमध्ये प्रेम संबध होते. या प्रेम संबंधातून या दोघांनी गेल्या आठवड्यात प्रेम विवाह केला होता. दोघेही सज्ञान असलायने दोघांनी पोलिसांना आपण विवाह करून परत आल्याचं सांगून आपला संसार पाळधी गावात सुरू केला होता. 31 डिसेंबरची रात्र मात्र या दाम्पत्यासाठी काळ रात्र ठरली आहे. कारण काल सकाळी नववधू ही तिच्या राहत्या घरात नग्न अवस्थेत मृत आढळून आली होती. तर तिचा पतीही दुसऱ्या खोलीत बेशुद्ध अवस्थेत आढळून आल्याने त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारा दरम्यान त्याचाही आज मृत्यू झाला आहे.
प्रेम विवाह करून आलेल्या विवाहितेचा संशयास्पद मृत्यू
31 डिसेंबर रोजी मयत दाम्पत्य हे त्यांच्या तीन मित्रासह रात्री उशिरापर्यंत एकत्र होते. त्यात सकाळी नग्न अवस्थेत ही तरुणी आढळून आल्याने सामूहिक अत्याचार केल्याच संशय मुलीच्या नातेवाईकांनी व्यक्त केला होता. शिवाय सासरच्या लोकांचाही यात समावेश असल्याचा आरोप त्यांनी करत या सर्वांच्या विरोधात पोलिसात गुन्हा दाखल केला होता. या घटनेचे गांभीर्य पाहून पोलिसांनी तिच्या सासऱ्यासह अन्य तीन मित्रांना संशयावरून अटक केली आहे.
या घटनेत आरतीचा नवरा प्रशांत याचाही मृत्यू झाल्याने या घटनेच्या दिवशी नक्की काय घडलं, याचं गूढ वाढलं आहे. पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतलं असलं तरी त्यांनी अद्यापपर्यंत कोणताही कबुली जबाब दिलेला नसल्याने खरे आरोपी कोण? या दाम्पत्याचा मृत्यू हत्या की आत्महत्या असा प्रश्न आता निर्माण होऊ लागला आहे. एकंदरीत सर्व घटना क्रम पाहता पोलिसांच्या दृष्टीने याचा तपास लावणे मोठे आव्हान असणार आहे.