Snake Bite : चावा घेणाऱ्या सापाला पकडून त्याने गाठले रुग्णालय; नागपुरातील मेयो रुग्णालयातील प्रकार
सापांच्या विविध प्रजातींची ओळख, त्याचे संपूर्ण ज्ञान असल्याशिवाय साप दिसल्यास त्याच्या जवळही जाऊ नये. तसेच प्रशिक्षण नसताना साप पकडण्याचे धाडस जीवावर बेतू शकते असा इशारा सर्प तज्ज्ञांनी दिली.
Nagpur News : सापाने चावा घेतल्यानंतर तरुणाने चक्क सापाच्या तोंडाला हातात पकडून नागपूरच्या इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय रुग्णालयात (Indira Gandhi Government Medical College & Hospital ) पोहोचल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. तरुण रुग्णालयात पोहोचताच त्याच्या हातात साप पाहून सगळेच घाबरले होते. त्यामुळे एकच खळबळ उडाली. नंतर सर्पमित्रांनी साप पकडून पेटीत बंद केले आणि त्याला सुरक्षित सोडले.
शनिवारी सायंकाळी औष्णिक विद्युत केंद्राच्या वसाहतीत लहान मुलं खेळत असलेल्या मैदानाजवळ पंकज सपाटे (वय 37 वर्ष) याला साप दिसला होता. सापांबद्दल थोडीशी माहिती पंकजला होती. मुलं खेळत असल्याने एखाद्याला सापाने चावा घेतला तर अनर्थ होईल हे टाळण्यासाठी त्याने सापाला पकडले. मात्र सापाने पंकजच्या हातावर चावा घेतला. त्यानंतर पंकजने सापाला पकडून वसाहतीतील आरोग्य केंद्र गाठले. त्याठिकाणी उपचार उपलब्ध नसल्याने त्याला रुग्णवाहिकेतून नागपूरच्या मेयो (IGMC Nagpur) रुग्णालयात पाठविण्यात आले.
चावा घेतलेला साप विषारी आहे का याबद्दल माहिती नसल्याने डॉक्टरांना उपचारासाठी सोयीचे व्हावे या उद्देशाने त्याने सापाला पकडून रुग्णालयात आणल्याचं स्पष्टीकरण दिले. तसेच रुग्णालयातून सर्पमित्रांनी साप पकडून पेटीत बंद केले आणि त्याला सुरक्षित सोडले. त्यानंतर रुग्णालयातील उपस्थितांनी सुटकेचा श्वास सोडला. साप रुग्णालयात असताना सर्वांची तारांबळ उडाली होती. या घटनेचा व्हिडीओ सोमवारी चांगलाच व्हायरल झाला होता.
धाडस करणे चुकीचेच!
सापांच्या विविध प्रजातींची ओळख, त्याचे संपूर्ण ज्ञान असल्याशिवाय साप दिसल्यास त्याच्या जवळही जाऊ नये. तसेच साप पकडण्याचे प्रशिक्षण नसताना साप पकडण्याचे धाडस जीवावर बेतू शकते, असा इशारा सर्प तज्ज्ञांनी दिला. अन्यथा केलेलं धाडस जीवावावर बेतू शकते असा इशाराही सर्प तज्ज्ञांनी दिला आहे.
मनपा रुग्णालयातही उपलब्ध नाहीत उपचार
काही महिन्यांपूर्वी सापाने चावा घेतल्यानंतर एका रुग्णाला जवळच्या नागपूर महानगरपालिकेच्या आरोग्य केंद्रात घेऊन गेले असता त्याठिकाणी उपचारच उपलब्ध नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले. तसेच त्यांना जीएमसी किंवा आयजीएमसी येथे घेऊन जाण्याचा सल्ला देण्यात आला होता. मात्र चावणारा साप विषारी नसल्याने या घटनेतही रुग्णाचे जीव वाचले होते.
हेही वाचा