मुंबई : राज्यामध्ये यापुढे इलेक्ट्रिक वाहनांना  चालना देण्यात येणार असून 2024 पर्यंत मुंबईतील 50 टक्के बसेस या इलेक्ट्रिक असतील असं राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी सांगितलं. तसेच मुंबईमध्ये एक हजार 900 नव्या इलेक्ट्रिक बसेस सुरु करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. ई-वाहनं क्रांती घडवणार? या एबीपी माझाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. 


राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे म्हणाले की, "पुढील पाच वर्षात ग्रीन इंडस्ट्रीचा विकास होणं आवश्यक आहे. इलेक्ट्रिक वाहनांमुळे प्रदूषणाची समस्या कमी होणार आहे. तसेच यामुळे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होणार आहे. ई वाहनांचा खर्च हा 9 रुपये प्रति किमी इतका कमी आहे. त्यामुळे राज्यात ई वाहनांना चालना देण्यात येणार असून चार्जिंग स्टेशन्स वाढवण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे."


ई-वाहनं क्रांती घडवणार? हा प्रश्न काही दशकांपूर्वी केवळ एक संकल्पना वाटणाऱ्या इलेक्ट्रिक गाड्या आता बऱ्यापैकी सर्वसामान्य झाल्या आहेत. सध्याच्या काळात इलेक्ट्रिफाइड वाहतूकीकडे वाटचाल ही जास्तीत जास्त अपरिहार्य होत चालली आहे. इलेक्ट्रिक वाहनं ही खूप उत्तम निवड आहे. विशेषत: आपण ज्या वातावरणात राहतो त्यासाठी आणि सभोवतालच्या लोकांसाठी ती महत्त्वाची आहे. येणाऱ्या काळात वाहतूक हे एक मोठे शाश्वत आव्हान आहे. 


सध्या भारतीय बाजारात ई-वाहनांचा बोलबाला आहे. तसेच ई वाहनांबद्दल खूप चर्चा ऐकायला मिळत आहे. अनेक मोठ्या दुचाकी आणि चारचाकी निर्मिती करणाऱ्या कंपन्यांनी त्यांची ई वाहनं बाजारातही आणली आहेत. पर्यावरणाच्या दृष्टीने या वाहनांना भविष्यात खूप महत्त्व येणार आहे. त्यासाठी राज्य सरकारने ईव्हीची पॉलिसी देखील तयार केली आहे.


कसं आहे महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहन धोरण?  



  • 2025 पर्यंत नवीन वाहन नोंदणीत 10 टक्के वाटा बॅटरी इलेक्ट्रिक वाहनाचा असेल.

  • मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, अमरावती आणि नाशिक शहरांमध्ये 2025 पर्यंत सार्वजनिक वाहतुकीचे 25 टक्के विद्युतीकरण करणार.

  • 2025 पर्यंत मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, नाशिक, अमरावती आणि सोलापूर या 7 शहरांत सार्वजनिक आणि निम सार्वजनिक चार्जिंग सुविधा उभारणार.

  • मुंबई ते पुणे, मुंबई ते नाशिक, पुणे ते नाशिक, मुंबई ते नागपूर या महामार्गांवर चार्जिंग सुविधा उभारणार.

  • एप्रिल 2022 पासून मुख्य शहरांतील परिचालित होणारी सर्व नवीन सरकारी वाहनं ( मालकी / भाडे तत्वावरील ) ही इलेक्ट्रिक वाहने असतील.


संबंधित बातम्या :