मुंबई  : पेट्रोल डिझेलसह इंधनाच्या(Petrol Diesel Rate) दरवाढीमुळं आता इलेक्ट्रिक वाहनं (electric vehicle) वापरण्याकडे कल वाढत आहे. मात्र इलेक्ट्रिक गाड्या चार्ज करण्यासाठी चार्जिंग केंद्रांचं हवं तसं जाळं अद्याप बनलेलं नाही. सरकारनं आता यासाठी पुढाकार घेतला आहे.  महात्मा फुले नविनीकरणीय ऊर्जा व पायाभूत प्रौद्योगिकी मर्यादित (महाप्रित) च्या वतीने मुंबई शहरात 134 इलेक्ट्रिक चार्जिंग केंद्रे उभारण्यात येणार आहेत. 



यामुळे भविष्यात मुंबईसह महाराष्ट्रात इलेक्ट्रिक चार्जिंग केंद्रांचे मोठ्या प्रमाणात जाळे निर्माण होणार आहे. याव्दारे अनुसूचित जातीच्या घटकांना मोठ्या प्रमाणात रोजगार मिळणार आहे, अशी माहिती महात्मा फुले नविनीकरणीय ऊर्जा व पायाभूत प्रौद्योगिकी मर्यादित (महाप्रित) चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक बिपीन श्रीमाळी यांनी दिली आहे.



यासाठी CESL (कॉर्न्व्हजन्स इनर्जी सर्व्हिसेस) या केंद्र सरकारच्या कंपनीसोबत सामंजस्य करार करण्यात आला आहे. CESL ही केंद्र सरकारच्या EESL (इनर्जी इफिसियन्सी सर्व्हिसेस लिमिटेड) कंपनीची उपकंपनी आहे. त्यासाठी नुकतीच स्वारस्याची अभियोक्ती (EOI) प्रसिध्द करण्यात आली. यामध्ये विविध संस्थांना बोलावून त्यांचे म्हणणे जाणून घेण्यासाठी पूर्वनिविदा बैठक घेण्यात आली. यासाठी प्रस्ताव सादर करण्याची अंतिम मुदत 30 नोव्हेंबर 2021 पर्यंत आहे. तसेच कंपनीच्या वतीने महाराष्ट्रात मुंबई-नागपूर व मुंबई-पुणे महामार्गावर इलेक्ट्रिक चार्जिंग केंद्रे उभारण्याची योजना आहे.



या योजनेअंतर्गत अनुसूचित जातीतील उद्योजक, व्यक्ती यांनी काही प्रमाणात भागभांडवल गुंतवून इलेक्ट्रिक चार्जिंग केंद्रे सुरू करण्यासाठी त्यांना चांगली संधी आहे. या संधींचा समाजातील सर्व घटकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन `महाप्रित`च्या वतीने करण्यात आले आहे.


Car loan Information:

Calculate Car Loan EMI