मुंबई:  मुंबई महानगरपालिकेच्या कोहिनूर वाहनतळातील इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशनचे (Maharashtra Environment Minister Aaditya Thackeray inaugurated the first electric vehicle charging station in Mumbai)  उद्घाटन पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते काल करण्यात आले. इलेक्ट्रिक वाहन धोरण जाहीर झाल्यानंतर या धोरणास उत्तम प्रतिसाद मिळत असून चार्जिंग स्टेशन आणखी वाढविण्याची सूचना ठाकरे यांनी केली. यावेळी आमदार सदा सरवणकर, मुंबई महानगरपालिकेच्या जी/उत्तर विभागाचे सहायक आयुक्त किरण दिघावकर यावेळी उपस्थित होते.




यावेळी आदित्य ठाकरे म्हणाले, वातावरणीय बदलाच्या आणि वाढत्या नैसर्गिक आपत्तींच्या पार्श्वभूमीवर प्रदूषण कमी करण्याच्या उद्देशाने मागील महिन्यात शासनाचे इलेक्ट्रिक वाहन धोरण जाहीर झाले. या धोरणास उत्तम प्रतिसाद मिळत असून शासनामार्फत पर्यावरण पूरक विविध धोरणे आणण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.  




मुंबईचे पहिले एकात्मिक सार्वजनिक वाहनतळ असलेल्या दादरमधील कोहिनूर वाहनतळात विविध सुविधांसह आशुतोष एन्टरप्राइजेसच्या माध्यमातून इलेक्ट्रिक वाहन चार्जिंगची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. महानगरपालिकेच्या जी/उत्तर विभागामार्फत सुरू करण्यात आलेल्या या वाहनतळात चार डीसी आणि तीन एसी अशा दोन प्रकारचे सात चार्जर बसविण्यात आले आहेत. याद्वारे 24 तासात सुमारे 72 वाहने चार्ज होऊ शकतील. यामध्ये दोन चाकी, तीन चाकी आणि चार चाकी वाहनांचा समावेश असेल. नागरिक ऑटोपार्क मोबाईल अँपद्वारे ऑनलाइन पार्किंग बुक आणि आरक्षित करू शकतात.