भारतीय संस्कृतीनुसार स्त्रीच्या कमरेखाली हात लावणं म्हणजे तिच्या शालीनतेला हात घालणं : मुंबई सत्र न्यायालय
10 वर्षीय मुलीच्या पार्श्वभागाला स्पर्श केल्याच्या आरोपाखाली एका 22 वर्षीय आरोपीला पाच वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली आहे.
मुंबई : भारतीय संस्कृतीमध्ये एका स्त्रीच्या कमरेखाली हात लावणं म्हणजे तिच्या शालिनतेला हात घालणंच. गुगलमध्ये जरी त्याचा खाजगी भाग असा उल्लेख नसला तरी इथं तो गुन्हाच आहे, असं महत्त्वपूर्ण निरीक्षण मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पोक्सो कोर्टानं नोंदवलं आहे. न्यायधीश अभिजीत नांदगावकर यांनी एका प्रकरणात 10 वर्षीय मुलीच्या पार्श्वभागाला स्पर्श केल्याच्या आरोपाखाली एका 22 वर्षीय आरोपीला पाच वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली आहे. आरोपीनं लैंगिक भावना मनात ठेवूनच या मुलीच्या पार्श्वभागाला हात लावल्याचं इथं सिद्ध होत आहे, असंही न्यायालयानं आपल्या निकालात नमूद केलं आहे.
या प्रकरणात तक्रारदार मुलीनं आरोपीनं तिच्या खासगी भागाला हात लावल्याचा आरोप केला आहे़. मात्र तिचा पार्श्वभाग हा खासगी भागाच्या कक्षेत मोडत नाही. कारण गुगलवरही पार्श्वभागाचा 'खासगी भाग' असा अर्थ काढण्यात आलेला नाही. असा युक्तीवाद आरोपीच्या वकिलांनी कोर्टात केला होता. त्यावर न्यायालयाने पोक्सो कायद्यातील कलम 7 चा संदर्भ दिला. या कलमातील लैंगिक शोषणासंबंधातील तरतुदीनुसार, जर महिलेच्या कोणत्याही अवयवाला स्पर्श केला गेला असेल तर तो लैंगिक हेतूनेच असला पाहिजे. त्यामुळे मुलीच्या पार्श्वभागाला केलेल्या स्पर्शामागे आरोपीची लैंगिक भावना नव्हती असा दावा करता येणार नाही. तसेच गुगलमध्ये जरी हा भाग खाजगी म्हटला नसला तरी, भारतीय संस्कृतीनुसार स्त्रीच्या कमरेखाली हात लावणे म्हणजे तिच्या शालीनतेला हात घालणचं आहे, असे मत न्यायालयानं व्यक्त केलं.
नेमकी काय घडली होती घटना
17 सप्टेंबर 2017 रोजी मुंबईत ही घटना घडली होती. यादिवशी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास एक 10 वर्षीय मुलगी ही ब्रेड आणण्यासाठी घराजवळच्या दुकानात चालली होती. त्यावेळी चार मुलांच्या एका घोळक्याने तिला चिडवण्यास सुरुवात केली. ते तिच्याकडे बघून हसू लागले, त्यानंतर ती मुलगी मैत्रीणीसोबत मंदिरात चालली होती, त्यावेळी त्या चौघा मुलांपैकी एकाने तिच्या पार्श्वभागावर चापटी मारली. मुलीनं ही घटना घरी सांगताच पोलिसांत त्याची तक्रार देण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी यात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला होता.