एबीपी माझा इम्पॅक्ट : 1949 नंतर प्रथमच राज्यातील फड मालक एकत्र; महाराष्ट्रातील तमाशा फड मालकांना प्रत्येकी 11 हजारांची मदत
एबीपी माझाच्या 'माझा कट्टा' या कार्यक्रमानंतर मिळालेल्या मदतीचे धनादेश आज राज्यातील फड मालकांना प्रातिनिधिक स्वरूपात देण्यात आले. 115 हून अधिक असलेल्या फड मालकांना ही आर्थिक मदत दिली जाणार आहे.
![एबीपी माझा इम्पॅक्ट : 1949 नंतर प्रथमच राज्यातील फड मालक एकत्र; महाराष्ट्रातील तमाशा फड मालकांना प्रत्येकी 11 हजारांची मदत ABP Majha Impact, For the first time since 1949 tamasha owners in the state came together एबीपी माझा इम्पॅक्ट : 1949 नंतर प्रथमच राज्यातील फड मालक एकत्र; महाराष्ट्रातील तमाशा फड मालकांना प्रत्येकी 11 हजारांची मदत](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/07/05/c7376ac603bf44859891df19f6796abe_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
संगमनेर : एबीपी माझाने काही दिवसांपूर्वी तमाशा कलावंतांची व्यथा महाराष्ट्र समोर मांडली होती. त्यानंतर आता महाराष्ट्रातील सर्व फड मालक एकत्र आले असून संगमनेर तालुक्यातील झोळे गावात आज महाराष्ट्रातील सर्व फड मालकांची बैठक पार पडली. या बैठकीत सर्व संघटनांचे विलगीकरण करून अखिल भारतीय मराठी तमाशा परिषद ही एकमेव संघटना स्थापन करण्यात आली आहे. ज्येष्ठ तमाशा कलावंत मंगलाताई बनसोडे यांची संस्थेच्या संस्थापक पदी निवड करण्यात आली आहे. तर राज्यातील 115 हून अधिक फडमालकांच्या संघटनेच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ तमाशा कलावंत रघुवीर खेडकर यांची निवड करण्यात आली आहे.
गेल्या दोन वर्षांपासून राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे सर्व ठिकाणच्या यात्रा-जत्रा रद्द करण्यात आल्या आहेत आणि याचा सर्वात मोठा फटका लोककला जगवणाऱ्या तमाशा कलावंतांना बसला आहे. राज्यातील यात्रा आणि जत्रा यावरच तमाशा कलावंतांच अर्थकारण अवलंबून असून त्याच बंद झाल्याने तमाशा कलावंतांवर उपासमारीची वेळ आली होती. एबीपी माझाच्या माध्यमातून माझा कट्टा या कार्यक्रमात तमाशा कलावंतांची व्यथा महाराष्ट्र समोर मांडण्यात आली होती. यानंतर महाराष्ट्रातील जनतेने तमाशा कलावंतांच्या पाठीशी उभे राहत त्यांना आर्थिक मदत देण्यास सुरुवात केली. एबीपी माझाच्या 'माझा कट्टा' या कार्यक्रमानंतर मिळालेल्या मदतीचे धनादेश आज राज्यातील फड मालकांना प्रातिनिधिक स्वरूपात देण्यात आले. 115 हून अधिक असलेल्या फड मालकांना ही आर्थिक मदत दिली जाणार असून कालच्या बैठकीत प्रत्येकी अकरा हजार रुपयांच्या चेकचे प्रातिनिधिक स्वरूपात वाटप करण्यात आले.
एबीपी माझा या वृत्तवाहिनीने तमाशा कलावंतांना न्याय दिला आणि एबीपी माझाचे संपादक राजीव खांडेकर यांनी तमाशा कलावंतांची व्यथा महाराष्ट्र समोर मांडली त्यामुळेच आम्हालाही आर्थिक मदत मिळू शकली, असं मत ज्येष्ठ कलावंत मंगलाताई बनसोडे रघुवीर खेडकर यांनी व्यक्त केलं.
तमाशा कलावंतांच्या व्यथा राज्य सरकारपर्यंत पोहोचवण्याचा निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आला. या बैठकीत वेगवेगळे ठराव संमत करण्यात आले असून आगामी काळात तमाशा कलावंतांचे अधिवेशन घेण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. आजच्या झालेल्या बैठकीत सर्वसमावेशक नवनिर्वाचित पदाधिकार्यांची निवड करण्यात आली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)