मुंबई : अभिनेते सयाजी शिंदे सह्याद्री देवराई यांच्याकडून जाहीर करण्यात आलेल्या उपक्रमाला राज्यातून नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून जवळपास राज्यातील 100 पेक्षा जास्त जुन्या झाडांची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे या फोटोंमध्ये 150 वर्षांपासून ते जवळपास 350 वर्षापर्यंतच्या जुन्या झाडांचे फोटो अभिनेते सयाजी शिंदे सह्याद्री देवराईकडे आले आहेत. आता या माहितीचा वापर करून या झाडांची काळजी कशी घेता येईल याबाबत विचारविनिमय सुरू आहे.


याबाबत बोलताना अभिनेते सयाजी शिंदे म्हणाले की, सह्याद्री देवराईकडून आवाहन करण्यात आल्यानंतर अनेक नागरिकांनी, पर्यावरणप्रेमींनी आपले जुन्या झाडांसोबतचे फोटो ठिकाणासह सह्याद्री देवराईकडून देण्यात आलेल्या नंबरवर पाठवले आहेत. अभिनेते सयाजी शिंदे सह्याद्री देवराईकडून 7972395655,  9096644671 हे दोन नंबर देण्यात आले आहेत. तेव्हा इतर लोकांना देखील जुन्या झाडांसोबतचे आपले फोटो काढा आणि वरील नंबरला व्हाट्सअप करा. या उपक्रमाचा उद्देश हाच आहे की, आपल्या गावातील, तालुक्यातील, जिल्ह्यातील आणि राज्यातील सर्वात जुन्या झाडांची माहिती आपल्याला मिळावी.



या माहितीच्या माध्यमातून सर्वात जुन्या 10 झाडांचे सेलिब्रेशन यंदाच्या आषाढी वारीला करण्यात येणार आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून बीडजवळच्या शिदोड गावातील स्थानिकांच्या माहितीनुसार 350 वर्षे जुने सिद्धवड नावाचे वडाचे झाड, ब्रिटिश काळात इंग्रजांनी सातारा जिल्ह्यातील वाठार स्टेशन ते पाचगणी दरम्यान रस्त्याच्या कडेला लावलेली वडाची झाडे आणि झाडांची नयनरम्य दृश्य दर्शवणारे फोटो प्राप्त झाले आहेत. यासोबतच 125 ते 150 वर्ष जुने गोरख चिंच, जुने पिंपळाचे झाड, मेनवली येथील नाना फडणवीस यांच्या वाड्यासमोरील 150 वर्षांपूर्वीचे गोरख चिंचेचं झाड यांचे फोटो प्राप्त झाले आहेत.



खरंतर या उपक्रमाच्या माध्यमातून आपणाला झाडांना सेलिब्रेटी बनवायचं आहे. कारण झाडांइतकी आपली सेवा कुणीच करत नाही. माणसाला जगण्यासाठी आवश्यक असणारा ऑक्सिजन वायू तब्बल 200-300 वर्षे देण्याचं काम झाडंच करत असतात. यासाठी आपणाला त्यांना सेलिब्रेटी बनवायचं आहे.  या उपक्रमासोबतच सावलीतील वारी नावाचा एक उपक्रम देखील यंदा सह्याद्री देवराईच्या वतीने राबवण्यात आला आहे. यंदा कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे महाराष्ट्र शासनाने शेकडो वर्षांची परंपरा लाभलेली पंढरीची वारी रद्द केली. गेली अनेक वर्ष वारकरी उन्हात पंढरपूरला चालत जात असतात.


हीच बाब लक्षात घेतं यंदा सह्याद्री देवराईकडून 'सावलीत वारी' उपक्रमाला सुरुवात करण्यात आली आहे. यंदा वारीच्या मार्गांवर शेकडो वेगवेगळ्या प्रकारची झाडे लावण्यात आली आहेत. यासोबतचं नागरिकांना आपल्या घरासमोर, रानात, बांधावर झाडे लावण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. या झाडांना ज्ञानोबा, तुकोबा, मुक्ताई, पंढरीचा विठोबाराया समजून आपल्याला वाढवायचं आहे. भविष्यात याच झाडांच्या रूपात भगवंत आपल्या डोक्यावर छाया धरणार आहेत. यंदा कोकण विभागातील शिगवण महाराजांच्या दिंडी क्रमांक 35 ने देखील या उपक्रमात आपला सहभाग नोंदवत दिंडीमार्गावर आत्तापर्यंत 363 झाडे लावली आहेत.