प्रथेप्रमाणे आषाढी वारी निघाली असती तर काल संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याने सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रवेश केला असता आणि आज जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याने अकलूज मार्गे सोलापूर जिल्ह्यात प्रवेश केला असता. माऊली महाराजांचा पालखी सोहळा पुणे सातारा आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये मार्गक्रमण करुन पंढरपूरला पोहचत असतो. तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा पुणे जिल्ह्यातून थेट सोलापूर जिल्ह्यामध्ये पोहोचला असता.

पंढरीसी जावे ऐसे माझे मनी।

विठाई जननी भेटे केव्हा॥

न लगे त्याविण सुखाचा सोहळा।

लागे मज ज्वाळा अग्निचिया॥

तुका म्हणे त्याचे पाहिलिया पाय।

मग दुख जाय सर्व माझे॥

प्रथेप्रमाणे वारी निघाली असती तर आज तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचे सोलापूर नगरीत मोठ्या थाटात स्वागत झाले असते. अकलूजमध्ये पोहोचल्यानंतर तिसरे गोल रिंगण पार पडले असते.

आज देहूतच पार पडले निरास्नान.

माऊली महाराजांचा पालखी सोहळा सातारा जिल्ह्याच्या हद्दीवर असतानाच नीरा नदीच्या पाण्यामध्ये नीरा स्नान घालण्याची जशी परंपरा आहे. तशीच परंपरा जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याची सुद्धा आहे. पुणे जिल्ह्याचा निरोप घेऊन सोलापूर जिल्ह्यामध्ये तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा पोहोचत असताना सराटीमध्ये नीरा नदीच्या पाण्यामध्ये नीरा स्नान घालण्याची मोठी परंपरा पालखी सोहळ्याला आहे.



सराटीमध्ये संस्थांच्या वतीने कोळी बांधवांचा सन्मान करण्याची परंपरा आहे.

खरतर अकलूज शहराच्या हद्दीवरती येऊन सराटी गावांमध्ये तुकाराम महाराजांचा पालखी सोहळ्यातील मुक्काम हा ठरलेला असतो. अनेकांना प्रश्न पडतो की अवघ्या चार किलोमीटर वरती येऊन हा पालखी सोहळा छोट्याश्या सराटी गावामध्ये का विसावत असे?

पण यामागे मोठी कृतज्ञता कहाणी आहे. ज्यावेळी जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा सुरू झाला त्यावेळेसपासून पुणे जिल्हा ओलांडून सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रवेश करत असताना ही नीरा नदी वाटेत आडवी यायची. त्या काळामध्ये नदीला पाणी खूप असायचे वेळ प्रसंगी पूर आलेल्या पाण्यातून सराटी मधले कोळी बांधव मोठ्या शिताफीने पालखी नदीच्या तीरावर नेऊन ठेवत असत.



केवळ पालखीच नाही तर पालखीसोबत आलेल्या वारकऱ्यांना होडीमधून कोळी बांधव नीरा नदीच्या तीरावर पोहोचायचे. त्यानंतर ब्रिटिशांच्या काळामध्ये नीरा नदीवर पूल उभा राहिला. मात्र, माऊली महाराजांच्या सोहळ्यातील कृतघ्नता कायम स्मरणात राहीली. त्या काळामध्ये कोळी बांधवांनी पालखी सोहळ्यासाठी दिलेले योगदान आणि केलेले सहकार्य याची उतराई म्हणून दरवर्षी तुकाराम महाराजांची पालखी सराटी गावांमध्ये मुक्कामाला थांबते.

सकाळची काकड आरती झाल्यानंतर विधिवत पूजा पार पडते आणि त्यानंतर नीरा स्नान झाल्यानंतर संस्थानच्या वतीने कोळी बांधवांचा यथोचित सन्मान करण्याची परंपरा आजही चालू आहे.

यावर्षी आषाढी वारी निघाली नसली तरी देहू मधेच नीरा नदीचे हंडाभर पाणी आणून इंद्रायणी नदीपात्रामध्ये माऊलींच्या पादुकांना नीरा स्नान घालण्यात आलं आहे. प्रथेप्रमाणे दरवर्षी येणारी वारी चुकली असली तरी तुकाराम महाराजांच्या पादुकांना नीरा स्नान यावर्षी चुकले नाही, याचा निश्चितच वारकऱ्यांमध्ये मोठं समाधान पाहायला मिळतेय.



मागच्या वर्षी संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा हा सराटीमध्ये मुक्कामाला पोहोचला. रात्रीच्या मुक्कामानंतर सकाळी काकड आरती झाली त्यानंतर सकाळी सात ते साडे सातच्या दरम्यान नीरा नदीमध्ये तुकाराम महाराजांच्या पादुकांना टँकरद्वारे आणलेल्या पाण्यातून नीरा स्नान घालण्यात आले होते. मागच्या अकरा वर्षांमध्ये दोनवेळा दुष्काळाच्या सावटाखाली टँकरच्या पाण्यावरतीच तुकोबांचा पादुकांना स्नान घालावे लागले होते.

पुणे आणि सोलापूर जिल्ह्याच्या हद्दीवर ते सराटे नावाचे छोटेसे गाव आहे, याच गावांमध्ये तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचा मुक्काम ठरलेला असतो. सोलापूर आणि पुणे जिल्ह्यामध्ये केवळ नीरा नदी आहे, नदीचा पूल ओलांडला की अकलूज शहर सुरू होते.
सराटी गावाजवळून वाहणाऱ्या नीरा नदी वर वीर आणि देवघर हे दोन मोठे धरण आहेत. याशिवाय जवळपास 55 ते 60 लहान-मोठे बंधारे आहेत. जोपर्यंत पाणी या धरण आणि बंधाऱ्यांमध्ये भरत नाही तोपर्यंत ते नीरा नदीमध्ये येत नाही आणि मागच्या वर्षी पाऊसच या परिसरामध्ये झाला नव्हता म्हणून नीरा नदी कोरडी होती. कोरडा नदीपात्रामध्ये असेल टँकरचा नीरामध्ये भरून आलेल्या पाणी सोडण्यात आलं होतं आणि त्याच पाण्याने तुकाराम महाराजांच्या पादुकांना नीरा स्नान घालण्यात आले होते.

नीरास्नान पार पडल्यानंतर सराटी मधून पालखीचे अकलूजसाठी प्रस्थान होत असे. सकाळी साडेनऊ वाजेपर्यंत अकलूज शहरातील गांधी चौकापर्यंत पालखी पोहोचलेले असायची. तत्पूर्वी नीरा नदी ओलांडून आल्यानंतर अकलूज शहराच्या हद्दीत पालखीचं मोठ्या दिमाखात स्वागत करण्याची परंपरा आहे.

अकलूज शहरातील सदाशिवराव माने विद्यालयाच्या प्रांगणामध्ये सकाळपासूनच गर्दी व्हायला सुरुवात व्हायची कारण आज तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यातील तिसरे गोल रिंगण अकलूज शहरातील सदाशिवराव माने विद्यालयाच्या प्रांगणामध्ये पार पडत असे. इंदापूर मधल्या शाही गोल रिंगण झाल्यानंतर अकलूजमध्ये सुद्धा वारकऱ्यांना रिंगण करण्यासाठी मोठी जागा या ठिकाणी मिळत असे.

आता विठ्ठल भेटीसाठी आतुर असलेल्या वारकऱ्यांमध्ये आणखीनच उत्साह संचारलेला पाहायला मिळायचा. कारण दोन्ही मानाच्या म्हणजे संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आणि संत तुकाराम महाराजांची पालखी या दोन्ही पालखी आता सोलापूर जिल्ह्यामध्ये दाखल झाल्या असत्या. आता केवळ एक आठवडा बाकी आहे ज्या वेळी हे सगळे वारकरी हे पंढरपूरमध्ये पोहोचले असते.

प्रथे प्रमाणे वारी निघाली असती तर जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचा आजचा मुक्काम अकलूज मध्ये तर संत ज्ञानेश्वर महाराजांच्याया पालखी सोहळ्याने नातेपुते हुन प्रस्थान ठेवले असते आणि माळशिरसमध्ये आजचा मुक्काम केला असता.

क्रमशः

यापूर्वीच्या प्रवासाचे टप्पे

माझा विठ्ठल माझी वारी! काय आहे राजुरीच्या साधुबुवांचा इतिहास? कशी होते माऊली-साधुबुवांची भेट?