कोरोनामुळे मागच्या कित्येक वर्षात पहिल्यांदा आषाढी पायीवारी निघाली नाही. तुकोबांच्या पादुका या देहूत तर माऊलींच्या पादुका आळंदीतच आहेत. आपण केवळ प्रवासाचे टप्पे जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. प्रथेप्रमाणे जर वारी निघाली असती तर आज माऊलींचा पालखी सोहळा सोलापूर जिल्ह्याच्या हद्दीमध्ये पोहोचला असता आणि पालखी सोहळ्यातील पहिले गोल रिंगण पुरंदवडेमध्ये पार पडले असते.


प्रथेप्रमाणे आषाढी वारी निघाली असती तर आज लाखो वैष्णवांना सोबत घेऊन माऊलींचा पालखी सोहळा सोलापूर जिल्ह्याच्या हद्दीमध्ये पोहोचला असता. आळंदीहून निघालेले वारकरी पहिल्या आठवड्यामध्ये पुन्हा जिल्ह्यातील प्रवास आटोपून सातारा जिल्ह्यामध्ये पोहोचले असते आणि सातारा जिल्ह्यातून आज हा लाखो वैष्णवांचा मेळा सोलापूर जिल्ह्यामध्ये पोहोचला असता.



बरडहून माऊली महाराजांच्या पालखीने सकाळीच प्रस्थान ठेवले असते. बरड ते नातेपुते हा तसा अरुंद रस्ता पण रस्त्याच्या बाजूला हिरवीगार शेती आणि शेतातून वाहणारे पाण्याचे पाट यामुळे या वातावरणामध्ये वारकरी अधिकच मंत्रमुग्ध होताना पाहायला मिळायचे. आता विठ्ठल भेटीसाठी आतुर झालेल्या वारकऱ्यांना पंढरपूर टप्प्यात आले होते. कारण पंढरपूर ज्या सोलापूर जिल्ह्यामध्ये येते त्या सोलापूर जिल्ह्यामध्ये लाखो वैष्णवजन पोहोचले असते.


माळशिरस तालुक्यातील धर्मपुरी येथे सोलापूर जिल्हा प्रशासनाच्या वतीने माऊली महाराजांच्या पालखीचे जंगी स्वागत करण्याची मोठी परंपरा आहे. दुपारी अकरा वाजेपर्यंत माऊली महाराजांची पालखी ही धर्मपुरीमध्ये पोहोचताच जिल्हा प्रशासनाच्या वतीने स्वागत पार पडले असते. धर्मपुरीमध्ये पोहोचायला पालखी आधीपासूनच याठिकाणी आध्यात्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम सुरु झालेले असायचे.


लाखो वारकऱ्यांच्या स्वागतासाठी धर्मपुरी जणू नटूनथटून सजलेली असायची. रस्त्यावरती रांगोळ्या काढलेले असायच्या. शाळेतील मुलं वेगवेगळ्या वेशभूषेमध्ये पालखीची वाट बघत उभे असायचे. स्वच्छतेपासून समाजप्रबोधनापर्यंतचे अनेक कार्यक्रम या ठिकाणी सकाळपासूनच सुरु झालेले असायचे. धर्मपुरीच्या कॅनलवर वारकरी आंघोळी आणि कपडे धुण्यासाठी अक्षरशः तुटून पडायचे. जिथपर्यंत नजर जाईल तिथपर्यंत कॅनॉलवर रंगीबेरंगी कपडे आणि स्नान करणारे वारकरी पाहयला मिळाले असते.


माऊली महाराजांचा पालखी सोहळा एकूण तीन जिल्ह्यातून आपला प्रवास करत असे. इथून पुढचा टप्पा मात्र वारकऱ्यांसाठी महत्त्वाचा असायचा कारण आता अवघ्या काही अंतरावर ते त्यांना त्यांचा विठ्ठल भेटणार असायचा. बरडहून निघालेले वारकरी हे सकाळी साधू बुवाच्या ओढ्याजवळ न्याहारीसाठी थांबले असते. दुपारचा विसावा धर्मपुरी बंगला येथे झाला असता. सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रवेश ठेवल्यानंतर माऊली महाराजांची पालखी ही काहीकाळ याच ठिकाणी ठेवली जायची. माऊलींच्या पादुकांचे दर्शन घेण्यासाठी पंचक्रोशीतील आबालवृद्ध मोठ्या संख्येने गर्दी करायचे.




आजचा दिवस माऊली महाराजांच्या पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांसाठी महत्त्वाचा असायचा कारण याच प्रवासादरम्यान पहिले गोल रिंगण पुरंदावडे येथे झाले असते. सोलापूर जिल्ह्यातील भाविकांसाठी यापुढे तीन रिंगणाची मेजवानी मिळत असे. आजचे पुरंदवडेमधले पहिले गोल रिंगण झाल्यानंतर खुडूस फाटा आणि ठाकूर बुवाची समाधी इथे सुद्धा गोल रिंगण करण्याची मोठी परंपरा मागच्या कित्येक वर्षापासून चालू आहे.



माऊली महाराजांच्या पालखी सोहळ्यातील गोल रिंगण बघणे म्हणजे डोळ्याचे पारणे भेटण्याची अनुभूती असायची. रिंगण सोहळा पार पडल्यानंतर वारकऱ्यांचा उडी नावाचा जो खेळ सुरु व्हायचा त्यावेळी अंगावर शहारे आल्याशिवाय राहत नाहीत. हजारो वारकरी एकाच रंगाच्या कपड्यात.. एकाच ठोक्याला वाजणारे टाळ.. मृदुंगातून निघणारा ज्ञानोबा-तुकोबाचा जयघोष अवघा आसमंत व्यापून टाकत असे. प्रत्येकाने एकदा वारी अनुभवावी असे म्हणतात पण वारीमध्ये प्रत्येकाने एकदा तरी गोल रिंगण डोळे भरुन पाहावे असेच असते.


प्रथेप्रमाणे वारी निघाली असती तर संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा सोलापूर जिल्ह्यामध्ये पोहोचला असता आणि आजचा मुक्काम नातेपुतेमध्ये झाल आता..


जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचा आजचा दुसरा मुक्काम सुद्धा इंदापूर मध्येच राहिला असता. प्रथेप्रमाणे वारी निघाली असती तर पालखी तळावर जत्रा भरली असती. तुकोबांची पालखी इंदापूरमध्ये पोहोचल्यानंतर दर्शनासाठी जी रांग पाहायला मिळायची ती आजच्या दिवशी सुद्धा कायम राहिली असती.


क्रमशः


यापूर्वीच्या प्रवासाचे टप्पे