Sharad Pawar NCP : शरद पवारांच्या राष्ट्रवादीमधील मोठा गट काँगेसमध्ये जाण्याच्या तयारीत; लोकसभा निकालापूर्वीच बड्या नेत्याने बाॅम्ब टाकला!
मागील काही दिवसांपासून आमदारांकडून सोनिया गांधी यांची भेट घेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. ही भेट कोणत्याही क्षणी होऊ शकते, असेही बोलले जात असल्याचा दावा करण्यात येत आहे.
Sharad Pawar NCP : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या काँग्रेसमध्ये विलीनीकरणाची चर्चा थेट लोकसभा निवडणुकीत रंगली असतानाच आता अजित पवार गटाने मोठा दावा केला आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीमधील मोठा गट काँगेसमध्ये जाण्याच्या तयारीत असल्याचा दावा अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केला आहे. तटकरे यांनी पत्रकारांच्या अनौपचारिक चर्चेत हा मोठा दावा केल्याने राजकीय भूवया उंचावल्या गेल्या आहेत. तटकरे यांनी पक्षांतर्गत नाराजीतून पक्षाला राम राम ठोकण्याच्या तयारीत आमदार असल्याचा दावा केला आहे.
सोनिया गांधी यांची भेट घेण्यासाठी प्रयत्न सुरू
अनौपचारिक चर्चेत बोलताना सुनील तटकरे यांनी सांगितले की, मागील काही दिवसांपासून आमदारांकडून सोनिया गांधी यांची भेट घेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. ही भेट कोणत्याही क्षणी होऊ शकते, असेही बोलले जात असल्याचा दावा करण्यात येत आहे. त्यामुळे सुनील तटकरे यांच्या या दाव्यानंतर राजकीय चर्चा रंगली आहे. यामध्ये काही महत्त्वाचे पदाधिकारी असल्याचे बोलले जात आहे. यामध्ये सोनिया दुहान, धीरज शर्मा आदी नाराजांचा गट सोनिया गांधींसोबत जाऊ शकतो, असे बोलले जात आहे. मात्र, नेमके कोण आमदार जाणार हे तटकरे यांनी सांगितलं नाही. अंतर्गत नाराजीने पाच ते सहा आमदार दिल्लीमध्ये सातत्याने जातात, असेही त्यांनी म्हटले आहे.
शरद पवारांकडून लोकसभा निवडणुकीत सुतोवाच
दरम्यान, लोकसभेच्या प्रचारात शरद पवार यांनी भविष्यात अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होऊ शकतात, असे वक्तव्य केल्याने भूवया उंचावल्या होत्या. पवार यांनी 1999 मध्ये काँग्रेसमधून बाहेर पडून राष्ट्रवादीची स्थापना केली होती, त्यांनी पुढील दोन वर्षांत अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेसशी कसे जवळीक साधतील किंवा पर्यायाचा विचार कसा करतील याबद्दल सांगितले. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (एसपी) यांच्यात वैचारिकदृष्ट्या समानता असल्याने त्यांना कोणताही फरक दिसत नसल्याचे पवार म्हणाले होते.
काँग्रेसमध्ये विलीनीकरणाच्या चर्चा
गेल्यावर्षी जुलैमध्ये अजित पवार यांनी राष्ट्रवादी फोडली होती. तेव्हापासून राष्ट्रवादी (SP) काँग्रेसमध्ये विलीनीकरणाच्या अफवा पसरल्या आहेत. निवडणूक आयोगाने अजित पवार यांच्या गटाला पक्ष आणि चिन्ह दिल्यानंतर शरद पवार यांनीही त्यांचा पक्ष आणि राष्ट्रवादीचे प्रतिष्ठित ‘घड्याळ’ चिन्ह गमावले होते. राज्यसभा निवडणुकीपूर्वी पर्याय म्हणून निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या गटासाठी ‘राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार’ या नवीन नावाला मान्यता दिली.
पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विलीन होण्याची अटकळ नवीन नाही. 2019 मध्ये, महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या अगदी आधी, काँग्रेसचे दिग्गज नेते सुशीलकुमार शिंदे यांनी संभाव्य विलीनीकरणाचे संकेत दिले होते, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही पक्ष एकाच वैचारिक झाडाचे असल्याचे सांगत भविष्यात दोन्ही काँग्रेस एकत्र येतील अशी आशा व्यक्त केली होती.
इतर महत्वाच्या बातम्या