8th September Headlines : उद्धव ठाकरेंचा दुष्काळ दौरा, तर जी -20 परिषदेसाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन भारतात येणार; आज दिवसभरात
8th September Headlines : आंतरवाली सराटी गावात मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठी हल्ल्याविरोधात आज अकोला शहर आणि जिल्हा बंदची हाक पुकारण्यात आली आहे. तर उद्धव ठाकरे हे दुष्काळ दौरा करणार आहेत.
मुंबई : जी - 20 परिषदेसाठी अनेक देशांचे प्रमुख नेते भारतात पोहचणार आहेत.दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या नेत्यांसोबत द्विपक्षीय बैठक देखील करतील. भाजपकडून सर्व लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यात येणार आहे. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष बावनकुळे हे यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतील. जम्बो कोविड घोटाळा प्रकरणात अटकेत असलेल्या सुजित पाटकर यांनी मुंबई सत्र न्यायालयात केला आहे. या अर्जावर आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी पार पडणार आहे.
जी - 20 परिषदेसाठी दिल्ली सज्ज
दिल्ली- G-20 बैठकीसाठी दिल्ली सज्ज झालीये.जी 20 साठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्यासह अनेक राष्ट्रप्रमुख दिल्लीत पोहोचणार आहेत. त्यांच्या स्वागतासाठी केंद्र सरकारच्या मंत्र्यांना जबाबदारी सोपवण्यात आली आहे. दिल्ली येथे 9 आणि 10 सप्टेंबर रोजी होणा-या G-20 बैठकीला उपस्थित राहणाऱ्या जगातील बलाढ्य राष्ट्रप्रमुखांच्या स्वागतासाठी राजधानी दिल्ली पूर्णपणे सज्ज आहे. आज हे नेते G-20 बैठकीसाठी पालम एअरफोर्स स्टेशनवर पोहोचतील. ब्रिटेनचे पंतप्रधान ऋषि सुनक यांचे दुपारी 1.40 वाजता केंद्रीय मंत्री अश्विनी चौबे स्वागत करतील. तर अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचे संध्याकाळी 6.55 वाजता वीके सिंह हे स्वागत करतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज राष्ट्राध्यक्ष बिडेन यांच्या भेटीसह तीन देशांसोबत महत्त्वाच्या द्विपक्षीय बैठका घेणार आहेत.पंतप्रधान ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्याशीही चर्चा करणार आहेत.
उद्धव ठाकरे करणार दुष्काळ दौरा
उद्धव ठाकरेंच्या दुष्काळ दौऱ्याला आजपासून सुरुवात होणार आहे. 8 सप्टेंबर रोजी उद्धव ठाकरे हे नगर जिल्ह्यातील दुष्काळाची पाहणी करणार आहेत. यावेळी संगमनेर व पुणतांबा येथील शेतकऱ्यांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधतील. मागील काही दिवसांपासून पावसाने उसंत घेतल्याने शेतकरी वर्ग चिंतेत सापडला आहे. त्यामुळे या भागातील दुष्काळाच्या परिस्थतीची पाहणी उद्धव ठाकरे हे करणार आहेत.
नागपुरात कुणबी समाजाची बैठक
नागपुरात सर्व शाखीय कुणबी समाजाची तातडीची बैठक आज बोलवण्यात आलीये. दुपारी 12 वाजता या बैठकीचे आयोजन करण्यात आलं आहे. तर या बैठकीमध्ये आंदोलनाची पुढची दिशा निश्चित केली जाणार आहे.
मुंबई भाजपाची बैठक
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपची मुंबईत महत्वाची बैठक होणार आहे. यावेळी भाजपाचे सर्व आमदार आणि खासदार उपस्थित राहतील. दरम्यान सर्व लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघाचा आढावा या बैठकीमध्ये घेण्यात येणार आहे. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत.
अकोला बंदची हाक
जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी गावात मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठी हल्ल्याविरोधात संपूर्ण महाराष्ट्रातून निषेध नोंदवण्यात आला. तर याचवेळी संपूर्ण अकोला जिल्हा आणि शहर बंदची हाक पुकारण्यात आलीये.
सांगलीत काँग्रेसकडून महाराष्ट्र जनसंवाद यात्रेचं आयोजन
सांगलीत काँग्रेसकडून महाराष्ट्र जनसंवाद यात्रेचं आयोजन करण्यात आलं आहे. सांगली जिल्ह्यातील जनसंवाद पदयात्राला आज्यापासून सुरुवात होणार आहे. 8 ते 14 सप्टेंबर याकालावधीत विविध तालुक्यात ही यात्रा जाणार असून ठीकठिकाणी सभेचे देखील नियोजन करण्यात आलं आहे.
मुंबई उच्च न्यायालयातील सुनावणी
जम्बो कोविड घोटाळा प्रकरणात अटकेत असलेल्या सुजित पाटकर यांनी मुंबई सत्र न्यायालयात अर्ज केला आहे. या अर्जावर आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी पार पडणार आहे.
मुंबईच्या आरे कॉलनीतील तलावांमध्ये गणपती विसर्जनावर बंदी घाला अशी याचिका वनशक्ती संस्थेने दाखल केली आहे. त्यावर सुनावणी पार पडणार आहे.