Konkan Marathon : 21 ऑगस्ट रोजी कोकण मॅरेथॉन स्पर्धा, 8 हजार 500 स्पर्धक धावणार
Konkan Marathon : महाराष्ट्राच्या क्रीडा नकाशावर पालघर जिल्ह्याला गाजवत ठेवणाऱ्या कोकण मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन 21 ऑगस्ट रोजी करण्यात आलं आहे.
मुंबई : यंदाची कोकण वर्षा मॅरेथॉन पालघरमधील जिजाऊ नगरी झडपोली येथे 21 ऑगस्ट रोजी होणार आहे. राज्यभरातील 8 हजार 500 स्पर्धक या स्पर्धेत धावणार आहेत. यावेळी खासदार श्रीकांत शिंदे, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण विक्रमगडमध्ये असणार आहेत.
महाराष्ट्राच्या क्रीडा नकाशावर पालघर जिल्ह्याला गाजवत ठेवणाऱ्या कोकण मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन 21 ऑगस्ट रोजी करण्यात आलं आहे. जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष निलेश सांबरे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या मॅरेथॉनला मिळणारा प्रतिसाद वाढताच आहे. स्पर्धेच्या पुरस्कार वितरणासाठी खासदार श्रीकांत शिंदे, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, आमदार रवींद्र फाटक, श्रीनिवास वणगा, शांताराम मोरे हे सर्व मान्यवर विक्रमगडमध्ये एकत्र येणार आहेत. त्यामुळे स्पर्धकांचा आणि आयोजनात गुंतलेल्या कार्यकर्त्यांचा विश्वास अधिकच वाढता आहे. याच दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रयत्नांनी मिळालेल्या निधीतून विक्रमगड नगरपंचायचतीनो साकारलेल्या विकासकार्यांचं उद्घाटनही खासदार श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते होणार आहे.
कोकणातील सर्वात मोठी स्पर्धा म्हणून ओळखली जाणारी ही स्पर्धा सात वर्षांपूर्वी सुरु झाली. स्थानिक क्रीडा प्रतिभेला वाव मिळावा, यासाठी जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्था नेहमीच प्रयत्नरत असते. त्या प्रयत्नांच एक भाग म्हणून राज्यभरातून धावपटूंना निमंत्रित केले जाते. त्यांच्या क्रीडा प्रतिभेतून स्थानिकांमधील मॅरेथॉन सहभागाचा उत्साह वाढत चालला आहे. 21 ऑगस्ट रोजी आयोजित स्पर्धेत 8 हजार 500 स्पर्धक सहभागी होणार आहेत.
जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष निलेश सांबरे यांच्या विनंतीवरून सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विक्रमगडसाठी खास निधी मिळवून दिला. डहाणू तालुक्यांसाठी जिजाऊ संस्थेतर्फे दिलेल्या दोन रुग्णवाहिकांचा उद्घाटन सोहळाही खासदार श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. त्यामुळे मुख्यमंत्री वडिलांच्या प्रयत्नांनी साकारलेल्या विकासकार्यांचं खासदार सुपुत्रांच्या हस्ते उद्घाटन, असा अभूतपूर्व योग जुळून येणार आहे.
महत्वाच्या बातम्या