भिवंडीत एकाच दिवसात 33 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू ; तर 65 नवे रुग्ण
वाढत्या नव्या रुग्णांमुळे भिवंडीतील कोरोनाबाधितांच्या आकड्याने एक हजारांचा टप्पा ओलांडला (1048 रुग्ण ) असल्याने भिवंडीकरांच्या चिंतेत वाढ झाली आहे. वाढती रुग्णसंख्या रोखण्यासाठी मनपाने पंधरा दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला आहे.
मुंबई : भिवंडीत कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत असून शहरात एकाच दिवसात कोरोनाने तब्बल 33 रुग्णांचा मृत्यू झाला आहे तर 40 नवे रुग्ण आढळले आहेत. तर ग्रामीण भागात 25 नवे रुग्ण आढळले असून शहर व ग्रामीण भागात एकूण 65 नवे रुग्ण आज आढळले आहेत. वाढत्या नव्या रुग्णांमुळे भिवंडीतील कोरोनाबाधितांच्या आकड्याने एक हजारांचा टप्पा ओलांडला (1048 रुग्ण ) असल्याने भिवंडीकरांच्या चिंतेत वाढ झाली आहे. तर वाढती रुग्णसंख्या रोखण्यासाठी गुरुवार पासून मनपाने पंधरा दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला आहे. मात्र लॉकडाऊन बरोबरच रुग्णांना योग्य त्या सुविधा मिळत नसल्याने शहरात रुग्णांच्या मृत्यू संख्येत वाढ होत असल्याचा आरोप मनपा प्रशासनावर करण्यात येत आहे.
भिवंडी शहरात आतापर्यंत 727 रुग्ण आढळले असून त्यापैकी 272 रुग्ण बरे झाले आहेत. तर 58 रुग्णांचा आतापर्यंत मृत्यू झाला असून 397 रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत. तर ग्रामीण भागात आतापर्यंत 321 रुग्ण आढळले असून त्यापैकी 116 रुग्ण बरे झाले आहेत तर 5 रुग्णांचा मृत्यू झाला असून 200 रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत. दरम्यान गुरुवारी आढळलेल्या 65 नव्या रुग्णांमुळे भिवंडीतील शहर व ग्रामीण भागातील कोरोनाबाधित रुग्णांचा एकूण आकडा 1048 वर पोहचला असून त्यापैकी 388 रुग्ण बरे झाले आहेत तर 63 रुग्णांचा मृत्यू झाला असून 597 रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत.
शहरातील वाढत्या कोरोनाबाधितांचा आकडा नियंत्रणात आणण्यात मनपा प्रशासनाला अपयश आले असून गुरुवार पासून पंधरा दिवसांचा लॉकडाऊन मनपाने घोषीत केला आहे. मात्र मनपाच्या अखत्यारीत्या असलेल्या कोविड रुग्णालयात रुग्णांवर योग्य उपचार होत नसल्याने कोरोनाबाधीत रुग्णाचा मोठ्या प्रमाणात मृत्यू होत असल्याचा आरोप स्थानिक करीत आहेत.
राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढली राज्यात आज 3752 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. राज्याचा रुग्ण बरे होण्याचा दर 50.49 टक्के एवढा आहे. राज्यात आज 1672 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. तर आतापर्यंत एकूण 60 हजार 838 रुग्णांनी यशस्वीपणे कोरोनावर मात केली आहे. सध्या राज्यात 53 हजार 901 रुग्णांवर (ॲक्टीव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली. राज्यात 100 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद आज झाली आहे. यासह आतापर्यंत 5751 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज नोंद झालेल्या मृत्यूंपैकी मुंबईत 67, भिवंडी 27, ठाणे 4, वसई विरार 1, नागपूर मनपा येथील एकाचा मृत्यू झाला आहे.
संबंधित बातम्या :