25 December Headlines: आज अटलबिहारी वाजपेयींची जयंती, पंतप्रधान मोदींची मन की बात, आज दिवसभरात
25 December Headlines: माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयींची आज जयंती आहे. त्यानिमित्तानं देशभर विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले आहे. यासह आज दिवसभरात घडणाऱ्या महत्त्वाच्या बातम्या खालीलप्रमाणे.
25 December Headlines : आज जगभरात नाताळ सण साजरा करण्यात येणार आहे. भारतामध्ये आजपासून नाताळाच्या सुट्टीला सुरुवात झाली आहे, त्यामुळे पर्यटनस्थळावर गर्दी झाली आहे. त्याशिवाय आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मन की बात हा रेडिओ कार्यक्रम आहे. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयींची आज जयंती आहे. त्यानिमित्तानं देशभर विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले आहे. यासह आज दिवसभरात घडणाऱ्या महत्त्वाच्या बातम्या खालीलप्रमाणे.
आजपासून ख्रिसमस सुट्ट्या सुरु...
जगभरात ख्रिसमस म्हणजेच नाताळ सण साजरा होत आहे. आजपासून ख्रिसमस सुट्ट्या सुरु...पर्यटनस्थळी गर्दी वाढणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पर्यटनस्थळी काही निर्बंध येण्याची शक्यता आहे. वर्षाअखेर आणि ख्रिसमस यामुळे पर्यटनस्थळावर गर्दी वाढण्याची शक्यता आहे. दापोलीत पर्यटकांची गर्दी वाढलेली आहे. किनाऱ्यावरील सर्व हॉटेल्स फुल झालेली आहेत. चंद्रपूर- ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या आलेल्या सलग सुट्ट्यांमुळे ताडोबा व्याघ्रप्रकल्प पर्यटकांनी हाऊस फुल्ल झालाय. नाशिक- नाताळ आणि विकेंडमुळे नाशिकमध्ये पर्यटक मोठ्या संख्येने दाखल झाले असून अंजनेरी जवळील फ्लॉवर पार्कला चांगलीच गर्दी होण्याची शक्यता आहे. त्याशिवाय राज्यातील इतर पर्यटन स्थळावरही गर्दी होण्याची शक्यता आहे.
आंतरराष्ट्रीय प्रवाशांची विमानतळावर तपासणी -
मुंबईत कोरोना संसर्ग नियंत्रित ठेवण्यासाठी मुंबई महापालिकेच्या विशेष सूचना आणि गाईडलाइन्स जारी करण्यात आल्या आहेत. गर्दीच्या ठिकाणी मास्क लावणे आणि सोशल डिस्टनसिंग पाळण्याचा नागरिकांना आवाहन करण्यात आलंय. तसेच, कोरोना टेस्टिंग ट्रेसिंग वाढवणार तर लसीकरणावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे. आंतरराष्ट्रीय प्रवाशांची मुंबई विमानतळावर तपासणी करण्यात येणार आहे.
अभिनेत्री तुनिषावर अंत्यसंस्कार -
नायगाव येथील अलिबाबा मालिकेच्या सेटवर अभिनेत्री तुनिषा शर्मानं आत्महत्या केली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार झीशानच्या मेकअपरुममध्ये तुनिषानं फाशी घेतली. तुनिषाचे तिचा सहकारी कलाकार झीशान खानसोबत प्रेमसंबंध होते. यातूनच तिनं आत्महत्या केल्याचा तिच्या आईचा आरोप आहे. तिच्या आईच्या तक्रारीवरुन झीशानवर गुन्हा दाखल झाला आहे. तुनिषावर जे.जे. रुग्णालयात शवविच्छेदन होणार आहे. त्यानंतर आज संध्याकाळी तिच्यावर अंतिम संस्कार करण्यात येतील.
आनंद परांजपेंना अटक होणार?-
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात अपशब्द वापरल्याने गुन्हा राष्ट्रवादीचे ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांच्या विरोधात चार पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत. त्यांना मुख्यालयाचे पोलीस अटक करणार अशी खात्रीलायक बातमी मला पोलिसांनीच दिली आहे असं ट्विट जितेंद्र आव्हाडांनी केलंय. त्यामुळे आनंद परांजपे यांना पोलीस अटक करणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलेय.
भाजपच्या विधिमंडळ पक्षाच्या नेत्याची आज निवड -
शिमला- हिमाचलमध्ये भाजपच्या विधिमंडळ पक्षाच्या नेत्याची आज निवड होणार आहे. निवडीसाठी केंद्राचे निरीक्षक म्हणून विनोद तावडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शिमल्यात होणाऱ्या बैठकीत नाव जाहीर होणार आहे.
आज अटलबिहारी वाजपेयींची जयंती.. देशभर विविध कार्यक्रमांचं आयोजन-
दिल्ली- अटलबिहारी वाजपेयींच्या समाधी स्थळी सदैव अटल येथे श्रद्धांजली वाहण्यासाठी राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, भाजप अध्यक्ष, लोकसभा अध्यक्ष, पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शाह उपस्थित राहणार आहेत.
नागपूर- प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर आज एक आगळावेगळा उपक्रम राबवत असून नागपूरच्या बी आर मुंडले शाळेच्या विद्यार्थ्यांच्या मदतीने ते आज ५ हजार किलो समरसता भाजी शिजवणार आहेत. देशाचे माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांचा आज वाढदिवस असून त्या निमित्त समरसता दिवसाचे औचित्य साधून हा उपक्रम राबवणार आहेत. या उपक्रमात शाळेतील विद्यार्थी त्यांच्या घरातून थोड्या थोड्या प्रमाणात भाज्या आणतील. त्या चिरुन मग एकत्रित शिजवल्या जातील. म्हणून त्या भाजीला समरसता भाजी अस नाव दिलं आहे.
अमरावती- भाजप नेते तुषार भारतीय यांच्या गुरुकुल बहुउद्देशीय शिक्षण संस्था आणि अमरावती जिल्हा अथेलिटिक संस्थेकडून अटल दौड हाफ मॅरेथॉन राज्यस्तरीय स्पर्धा आयोजित केली आहे. या स्पर्धेत विविध गटांसाठी एकूण ५ लाख रुपयांची बक्षिसं जाहीर करण्यात आली आहेत. स्पर्धेसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
पंतप्रधान मोदींची मन की बात -
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मन की बात या कार्यक्रमाचा 96 वा भाग आज प्रसारित होणार आहे. या कार्यक्रमाद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील जनतेशी संवाद साधतील. कोरोना पार्श्वभीवर, वर्षाअखेर आणि नवीन वर्षाची सुरुवात यावर पंतप्रधान मोदी बोलण्याची शक्यता आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा औरंगाबाद, सोलापूर दौरा-
औरंगाबाद- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे डॉ.श्री. नानासाहेब धर्मधिकारी प्रतिष्ठानच्या स्वच्छता जनजागृती मोहिमेत सकाळी अकरा वाजता सहभागी होणार आहेत.
करमाळा- मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते करमाळा येथे आदिनाथ सहकारी साखर कारखाना २७ वा गळीत हंगाम शुभारंभ होणार आहे.
राहुल शेवाळेंची पत्रकार परिषद-
राष्ट्रवादीचे नेते रूपाली ठोंबरे रिंकी बक्सला यांनी फेसबुक लाईव्ह च्या माध्यमातून राहुल शेवाळे यांच्या संदर्भात काही आरोप केले होते. त्याच आरोपाला उत्तर देण्यासाठी राहुल शेवाळे यांची पत्रकार परिषद होणार आहे, सी/२, बाळासाहेब भवन , मंत्रालयासमोर, दुपारी १२ वाजता- पत्रकार परिषद होणार आहे.
भाजपच्या ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार
औरंगाबाद- भाजपच्या नवनिर्वाचित सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार रावसाहेब दानवे, भागवत कराड, अतुल सावे यांच्या उपस्थितीत होणार आहे, दुपारी १२.३० वाजता.
दिल्ली- राहुल गांधी आज शक्ती स्थळ, राजघाट, अटलबिहारी वाजपेयींच्या समाधी स्थळांवर जाऊन श्रद्धांजली अर्पण करणार आहेत.
पुणे- संजय शहा हे त्यांच्या साठाव्या वाढदिवसानिमित्त आज ६० किलोमीटर धावणार. संजय शहा हे मॅरेथॉन रनर असून कारगिल मॅरेथॉन आयोजित करतात, पहाटे वाजता शाह धावायला सुरुवात करणार आहे.
अहमदनगर- नाताळ निमित्त हजारो ख्रिस्त बांधव अतिशय जुन्या आणि ऐतिहासिक ह्युम मेमोरिअल चर्च मध्ये प्रार्थना करणार आहेत. ह्यूम मेमोरियल चर्च हे 1833 साली स्थापन केलेल अतिशय जूनं चर्च आहे. अमेरिकेतून आणलेले बेंच हे या चर्चचे वैशिष्ट आहे. या बरोबरच अमेरिकेतून संपूर्ण भारतात केवळ 5 बेल पाठवण्यात आल्या होत्या
नांदेड- राज्याचे पर्यटन, कौशल्य विकास व उद्योजकता, महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते वीर बाल दिवस व नांदेड महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. यावेळी नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीष महाजन, अशोक चव्हाण, खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर, खासदार हेमंत पाटील उपस्थित राहणार आहेत.
माळेगाव यात्रेची सांगता -
नांदेड- सुप्रसिद्ध माळेगाव यात्रेनिमित्त आज लावणी महोत्सव. देशभरातील लावणी कालावंत, कलाकार मंडळी, राजकीय मंडळी, परंपरागत लावणी महोत्सवास लावणार हजेरी. दक्षिण भारतातील सुप्रसिद्ध माळेगाव यात्रेचा आज पाचवा दिवस आहे. लावणी महोत्सवा नंतर यात्रेची सांगता होणार आहे.
वाशिम- विविध हिंदुत्ववादी संघटच्यावतीने वाशिम येथे सकल हिंदू समाजातर्फे लव्ह जिहाद आणि धर्मांतर विरोधी भव्य मोर्चाचे आयोजन केले आहे.
भंडारा- माजी मंत्री महादेव जानकर जिल्ह्यात असणार आहेत. या वेळी पक्ष वाढीसाठी कार्यकर्त्यांसोबत बैठका घेणार आहेत.