24th August Headlines : पंतप्रधान मोदी यांचा दक्षिण आफ्रिका दौरा, बारामतीमध्ये अजित पवार यांचा सत्कार होणार; आज दिवसभरात...
24th August Headlines : ब्रिक्स देशांच्या परिषदेच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर आहेत. राज्यात राष्ट्रवादीमधील बंडानंतर आज उपमुख्यमंत्री अजित पवार बारामती असणार असून त्यांचा सत्कार आयोजित करण्यात आला आहे.
24th August Headlines : ब्रिक्स देशांच्या परिषदेच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर आहेत. आज त्यांच्या दौऱ्याचा तिसरा दिवस आहे. झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन ईडीसमोर चौकशीला हजर राहणार आहेत. तर, राज्यात राष्ट्रवादीमधील बंडानंतर आज उपमुख्यमंत्री अजित पवार बारामती असणार असून त्यांचा सत्कार आयोजित करण्यात आला आहे.
पंतप्रधान मोदी यांचा दक्षिण आफ्रिका दौरा
जोहान्सबर्ग - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्याचा आज तिसरा दिवस आहे. आज जोहान्सबर्ग येथे ब्रिक्स-आफ्रिका आउटरीच आणि ब्रिक्स प्लस संवाद कार्यक्रमाला ते उपस्थित राहतील. जोहान्सबर्गमध्ये उपस्थित असलेल्या काही नेत्यांसोबत पंतप्रधान आज द्विपक्षीय चर्चा करणार आहेत.
झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन ईडीसमोर चौकशीला हजर राहणार
रांची - झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन आज जमीन घोटाळ्याप्रकरणी ईडीसमोर हजर राहणार आहेत. यापूर्वी ईडीने 14 ऑगस्ट रोजी चौकशीसाठी बोलावले होते. तातडीच्या कामाचे कारण देत हेमंत सोरेन ईडीसमोर हजर झाले नाहीत.
बारामतीमध्ये अजित पवार यांचा सत्कार होणार
पुणे - अजित पवारांचा शनिवारी बारामतीत नागरी सत्कार होणार आहे. उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर अजित पवार पहिल्यांदा बारामतीत येणार आहेत. शारदा प्रांगणात हा कार्यक्रम होणार आहे. त्याआधी अजित पवार गणपतीला अभिषेक करून शक्तिप्रदर्शन करणार आहेत.
उद्धव ठाकरेंकडून लोकसभा आढावा बैठक
मुंबई – आज शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून वर्धा, यवतमाळ-वाशीम, रामटेक या तीन लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला जाणार आहे.
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यवतमाळ, वाशिम दौऱ्यावर
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आज यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदार संघात घर चलो अभियानासाठी जिल्ह्यात दौऱ्यावर येत आहे. 'घर चलो अभियान' दरम्यान प्रमुख व्यापाऱ्यांची घेणार आहेत. त्याशिवाय, पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या भेटी ते घेणार आहेत.
स्टील कंपनीबाबत आज जनसुनावणी
चंद्रपूर – मूल एमआयडीसी मधील प्रस्तावित भाग्यलक्ष्मी मेटल्स प्रा.लि. या स्टील कंपनीची आज पर्यावरण जनसुनावणी होणार आहे. 7 लाख टन प्रतिवर्ष इतकी या प्रकल्पाची क्षमता असणार आहे. या प्रकल्पाचा मूल, चिखली, मोरवाही, टेकाडी, कोसंबी, राजगड, चिमढा, आकापूर, मारेगाव या गावांवर पर्यावरणीय परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही जनसुनावणी घेण्यात येणार आहे.
कांद्याचे लिलाव आजपासून सुरू
नाशिक – कांद्यावर केंद्राने 40 टक्के निर्यातकर लागू केल्याच्या निषेधार्थ नाशिक जिल्ह्यात साधारण तीन दिवसांपासून अनेक बाजार समित्यांमध्ये कांद्याचे लिलाव ठप्प झाले होते. मात्र बुधवारी केंद्रीय मंत्री आणि दिंडोरीच्या खासदार भारती पवारांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत यावर तोडगा निघाला असून जिल्ह्यातील सर्व बाजार समित्यांमध्ये गुरुवार पासून व्यवहार सुरळीत सुरू होणार आहेत.