(Source: ECI/ABP News/ABP Majha)
21 December Headlines : हिवाळी अधिवेशनाचा तिसरा दिवस , अनिल देशमुखांच्या जामीनावर पुन्हा सुनावणी, आज दिवसभरात
21 December Headlines : हिवाळी अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी अकरा मोर्चे निघणार असून त्यामध्ये लव जिहाद विरोधी कायद्याच्या मागणीसाठी हिंदू जनजागृती समितीकडून मोर्चा काढला जाणार आहे. विधिमंडळ अधिवेशनाचा आज तिसरा दिवस आहे.
21 December Headlines : राज्याच्या हिवाळी अधिवेशनाचा आज तिसरा दिवस आहे. याबरोबरच माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुखांच्या जामीनावर आज हायकोर्टात पुन्हा सुनावणी होणार आहे. तर अहमदनगरमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं जलसमाधी आंदोलन होणार आहे. यासह आज दिवसभरात घडणाऱ्या महत्त्वाच्या बातम्या खालीलप्रमाणे.
हिवाळी अधिवेशनाचा तिसरा दिवस
हिवाळी अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी अकरा मोर्चे निघणार असून त्यामध्ये लव जिहाद विरोधी कायद्याच्या मागणीसाठी हिंदू जनजागृती समितीकडून मोर्चा काढला जाणार आहे. तर मुस्लिम आरक्षण व इतर मागण्यांसाठी एमआयएम पक्षाकडूनही मोर्चा काढला जाणार आहे. याशिवाय इतर नऊ छोटे मोर्चेही असणार आहेत
अहमदनगरमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं जलसमाधी आंदोलन
अहमदनगर जिल्ह्यातील अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना अद्यापही नुकसान भरपाई नाही. त्यामुळे, स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. राहुरी तालुक्यातील मुळा धरणात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते जलसमाधी घेऊन आंदोलन करणार आहेत. जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे यांच्यासह शिवसेना - ठाकरे गटही आंदोलन करणार आहे.
अनिल देशमुखांच्या जामीनावर आज हायकोर्टात पुन्हा सुनावणी
22 डिसेंबरपर्यंत जामीनाला दिलेली स्थगिती वाढवण्यासाठी सीबीआयची हायकोर्टात याचिका. सीबीआयनं या निकालाला सर्वोच्च न्यायालयात दिलेल्या आव्हानावर जानेवारीत सुनावणी होणं अपेक्षित आहे. सर्वोच्च न्यायालयात यंदा सुट्टीकालीन कोर्ट उपलब्ध नसल्यानं 3 जानेवारीपर्यंत स्थगिती वाढवण्याची सीबीआयकडून विनंती करण्यात आली आहे. त्यावर अनिल देशमुखांना जामीन देणा-या न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांच्यापुढे सकाळी सुनावणी होईल.
कोल्हापुरातील शिवसैनिक विशाळगड येथील अतिक्रमण काढण्यासाठी रवाना होणार
छत्रपती शिवाजी महाराज पुतळा कोल्हापूर येथे पूजन करून शिवसैनिक किल्ले विशाळगड येथील अतिक्रमण काढण्यासाठी रवाना होणार आहेत.
मुंबईत सिद्धीविनायक मंदीर येथे मनसे आंदोलन करणार
मनसे कडून सिद्धीविनायक मंदीर येथे आंदोलन करण्यात येणार आहे.. सिद्धीविनायक मंदिरातील आर्थिक गैरव्यवहार थांबविण्याकरीता समिती अध्यक्ष व इतर अधिकाऱ्यांना श्रींनी सद्बुद्धी द्यावे म्हणून आंदोलन करण्यात येईल. सकाळी ९:३० वाजता श्री सिद्धिविनायक येथे दर्शन घेवून हे आंदोलन सुरू केले जाईल.
मुंबईत टाटा मुंबई मॅरेथॉनच्या मर्चन्डाइसचं अनावरण
टाटा मुंबई मॅरेथॉनच्या मर्चन्डाइसचं अनावरण आज पार पडणार आहे. क्रिकेटपटू प्रसिदा क्रिष्णा आणि स्क्वॉश खेळाडू जोस्ना चिन्नप्पा यांच्या उपस्थिती अॅसिस इंडियाच्या स्टोअरमध्ये कार्यक्रम पार पडेल.
अर्बन आर्ट फेस्टिव्हलला आजपासून सुरुवात
मुंबई अर्बन आर्ट फेस्टिव्हलला आजपासून सुरुवात होते आहे. चित्रकला, भित्तीचित्रे आणि शिल्पेचे हे प्रदर्शन असेल. अनेक दिग्गज चित्रकार आणि कलाकारांची कला येथे बघायला मिळेल.
अदर पुनावाला यांच्यावर गुन्हा दाखल करत त्यांच्या अटकेची मागणी करणाऱ्या याचिकेवर सुनावणी
कोरोना लसीमुळे झालेल्या दुष्परिणामांमुळे देशातील जनतेला झालेल्या त्रासाबद्दल सिरम इन्स्टीट्युटचे अदर पुनावाला यांच्यावर गुन्हा दाखल करत त्यांच्या अटकेची मागणी करणा-या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी. सर्व लसबाधितांना नुकसान भरपाई देण्याचीही मागणी करणा-या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी.
कुपोषणाच्या गंभीर समस्येबाबत विविध जनहित याचिकांवर सुनावणी
राज्यातील कुपोषणाच्या गंभीर समस्येबाबत हायकोर्टात दाखल विविध जनहित याचिकांवर सुनावणी होणार आहे.
सोलापुरात ज्योती क्रांती संघटनेतर्फे आंदोलन
राज्यात अनेक ठिकाणी गर्भलिंग निदान होत आहे. त्यामुळे सामाजिक प्रश्न निर्माण झाले आहे. सोलापुरातील अनेक मुलांना लग्नासाठी मुलीच मिळत नाहीयेत. गर्भलिंग निदान कायद्याची प्रभावी अंमलबजावणी व्हावी या मागणीसाठी सोलापुरात ज्योती क्रांती संघटनेतर्फे अनोखे आंदोलन करण्यात येणार आहे. विवाह इच्छुक असलेल्या तरुणांना नवरदेवाच्या वेषात मोर्चा काढण्यात येनार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा जाणार आहे.