(Source: ECI/ABP News/ABP Majha)
आंतरजातीय विवाह केला म्हणून तब्बल 150 जोडप्यांना वाळीत टाकलं! जातपंचांविरोधात सांगलीत गुन्हा दाखल
अंदाजे 150 जोडप्यांना नंदीवाले जातपंचांनी समाजातून बहिष्कृत केले आहे. त्यांना समाजातील कोणत्याही सुखदु:खाच्या कार्यक्रमात बोलावले जात नाही किंवा कोणीही त्यांच्याशी संबंध ठेवत नाहीत.
सांगली : आंतरजातीय विवाह केल्यामुळे 150 दाम्पत्यांना बहिष्कृत केल्याप्रकरणी नंदीवाले समाजाच्या सहा जात पंचांविरुद्ध पलूस पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी आग्रही होऊन समाजातून बहिष्कृत करणाऱ्यांवर कारवाई करण्यासासाठी प्रयत्न केले. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या अथक प्रयत्नांमुळे महाराष्ट्रात सामाजिक बहिष्कारविरोधी कायदा 2016 पासून अंमलात आला आहे. या कायद्यानुसार कोणत्याही व्यक्तीला, कुटुंबाला समाजातून बहिष्कृत करणे हा गुन्हा आहे.
महाराष्ट्रातील नंदीवाले काशी कापडी या समाजातील काही तरुणांनी आंतरजातीय विवाह केले आहेत. अशा अंदाजे 150 जोडप्यांना नंदीवाले जातपंचांनी समाजातून बहिष्कृत केले आहे. त्यांना समाजातील कोणत्याही सुखदु:खाच्या कार्यक्रमात बोलावले जात नाही किंवा कोणीही त्यांच्याशी संबंध ठेवत नाहीत.
अशा आंतरजातीय विवाह केलेल्या तीस जोडप्यांनी एकत्रितपणे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती शाखा सातारा यांच्याकडे तक्रार अर्ज दिला आणि त्यांच्यावरील सामाजिक बहिष्कार उठवण्याची मागणी केली. त्यानुसार अंनिसच्या कार्यकर्त्यांनी व पोलिसांनी नंदीवाले समाजातील जातपंचांशी संपर्क करून त्यांची मेढा (जि. सातारा) पोलीस स्टेशनला जून 2021 मध्ये बैठक बोलावली.
या बैठकीमध्ये अंनिस कार्यकर्त्यांनी सामाजिक बहिष्कार विरोधी कायद्यानुसार आता कोणालाही समाजातील वाळीत टाकता येत नाही. याची जाणीव करून दिली. तसेच पोलिसांनी पंचांना सामाजिक बहिष्कार मागे घेण्याची विनंती केली. तेव्हा पंचांनी सामाजिक बहिष्कार मागे घेत असल्याचे कबूल केले.
त्यानुसार पंचांची पुढील बैठक 26 डिसेंबर 2021 रोजी कराड येथे होऊन या बैठकीतही राज्यातील आंतरजातीय विवाह केलेल्या कुटुंबांवरील सामाजिक बहिष्कार मागे घेत असल्याचे जाहीर केले.परंतु नंदीवाले समाजातील काही जातपंचांनी सांडगेवाडी (ता. पलूस) येथे पुन्हा जातपंचायत 9 जानेवारी रोजी बसविली.
या जातपंचायतमध्ये त्यांनी कराड येथे जातपंचायतींनी घेतलेला निर्णय अमान्य करून या आंतरजातीय विवाह केलेल्या जोडप्यांवरील सामाजिक बहिष्कार सुरू ठेवणार असल्याचे जाहीर केले. पलूस येथील झालेला हा जातपंचायतीचा निर्णय ‘सामाजिक बहिष्कारविरोधी कायद्या’नुसार गुन्हा आहे. म्हणून इस्लामपूर येथील आंतरजातीय विवाह केलेले प्रकाश शंकर भोसले यांनी या कायद्यानुसार पलूस पोलीस स्टेशनल 14 जानेवारी रोजी गुन्हा दाखल केला.
यामध्ये जातपंचायतीचे पंच विलास शंकर भिंगार्डे (इस्लामपूर) चंद्रकांत बापू पवार (इस्लामपूर) शामराव श्रीरंग देशमुख (दुधोंडी), अशोक शंकर भोसले (दुधोंडी), किसन रामा इंगवले (जुळेवाडी, ता. कराड), विलास बापू मोकाशी (नेहरूनगर, निमणी) या पंचांवर सामाजिक बहिष्कारविरोधी कायद्यानुसार पलूस पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद झाला आहे. सदर गुन्हा नोंद करताना आंतरजातीय विवाह केलेले काही पीडित तरुण उपस्थित होते.
आधी संवाद.. आणि मग कायद्याचा बडगा
नंदीवाले काशी कापडी आणि तीरमल समाजातील आंतरजातीय विवाह केलेल्या अडीचशे जोडप्यांवर टाकलेला बहिष्कार मागे घेतल्याचे त्या समाजातील बहुसंख्य पंचांनी जाहीर केले असले तरी त्यामधील काही पंचांनी नुकतीच पलूस येथे जातपंचायत भरवून काही जोडप्यांच्या वर बहिष्कार चालू ठेवण्याचा निर्णय घेतला होता. या जोडप्यांनी सातारा अंनिसकडे तक्रार दिली होती. अंनिसने त्याची तातडीने दखल घेऊन त्यांना घेऊन पलूस पोलीस स्टेशनला सामाजिक बहिष्कार विरोधी कायदयानुसार गुन्हा दाखल केला. इस्लामपूर येथील पीडित प्रकाश भोसले यांनी 6 जातपंचायतींवर फिर्याद दाखल केली.