Amravati News : अबब! एकाच घरातून निघाले तब्बल 10 अजगर, उत्तमसरा येथील घटना
Amravati Rain Update : अमरावतीत मात्र एका घरात एक किंवा दोन नव्हे तर, तब्बल 10 अजगर आढळले आहेत. घरातील गादीत, चुलीत, गोठ्यात अजगराचे 10 पिल्लू आढळले असून त्यांना रेस्क्यू करण्यात आलं आहे.
Amravati News : अमरावती शहरासह जिल्ह्यात सर्वत्र सतत पाऊस सुरू आहे. पावसाळ्याला सुरुवात होताच मानव वस्तीत सरपटणाऱ्या प्राण्यांच्या आढळण्याच्या घटनांमध्ये वाढ होते. अमरावतीत मात्र एका घरात एक किंवा दोन नव्हे तर, तब्बल 10 अजगर आढळले आहेत. ही घटना आहे भातकुली तालुक्यातील उत्तमसरा या गावात समोर आली आहे. घरातील गादीत, चुलीत, गोठ्यात अजगराचे 10 पिल्लू आढळले असून त्यांना रेस्क्यू करण्यात आलं आहे.
उत्तमसरा गावातील बंडू मतालाने यांच्या घराजवळ एक साप आढळल्याची माहिती वसा संस्थेला मिळाली. वसा अनिमल्स रेस्क्यू टीमचे सर्पमित्र ओम यावले आणि मुकेश मालवे यांनी तो साप अजगराचे पिल्लू असल्याची पुष्टी केली. त्यानंतर सुनीता यावले यांच्या घरात झोपण्याच्या गादीत, चुलीमध्ये, टिनाच्या कप्प्यात, अंगणात अशी 6 अजगराची पिल्ले सर्पमित्रांनी रेस्क्यू केली.
एकाच घरातून निघाले चक्क 10 अजगर
दुसऱ्या दिवशी बाजूच्या घरात सुद्धा अजगराचे पिल्लू आढळून आले. त्यांनी ते स्वतः प्लास्टिक डब्यात बंद करून नदीवर नेऊन सोडलं. त्यानंतर शेजारी बकऱ्यांच्या गोठ्यात गेले असता त्यांना गोठ्याच्या टिनात अजगराचं पिल्लू दिसून आले. ते पिल्लू सुद्धा वसा संस्थेच्या सर्पमित्रांनी रेस्क्यू केलं. दिवस भर पावसाने उघडीप दिल्यानंतर गावात कुठे अजगराचे पिल्ले आढळून आले नाहीत. मात्र रात्री पावसाला सुरू होताच तब्बल आठ फूट लांबीची अजगराची मादी कुलपत शेंडे यांच्या गोठ्याजवळ आढळून आली. सर्पमित्र मुकेश मालवे यांनी मोठ्या शिताफीने तिला रेस्क्यू केलं.
पाहा व्हिडीओ :
जिल्हाधिकारी कार्यालय आवारात 7 फुटी धामण
अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात 7 फुटी धामण जातीचा साप आढळला. मंगळवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात अचानक साप दिसल्याने लोकांची एकच तारांबळ उडाली होती. साप पाहूनच अनेकांनी तिथून पळ काढला. थोड्यावेळाने सर्पमित्राला पाचारण करण्यात आले. सर्पमित्राने सापाला पकडून जंगलात सोडलं. सध्या पावसाळा सुरू झाल्याने अनेक ठिकाणी साप दिसून येत आहेत, त्यामुळे लोकांनी काळजी घेणे आवश्यक आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :