Maharashtra Rain Forecast: विदर्भातील अनेक जिल्ह्यांना आज पावसाचा ऑरेंज अलर्ट; हवामान खात्याचा नेमका अंदाज काय?
Maharashtra Rain Forecast: भारतीय हवामान विभागाने महाराष्ट्रासह विदर्भात पावसाचा अलर्ट जारी केला आहे. विदर्भात आज अनेक जिल्ह्यांसाठी हवामान विभागाकडून (IMD) ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

Vidarbha Rain : महाराष्ट्रातील काही भागात मान्सूनचे आगमन मे महिन्याच्या शेवटी झाले असले तरी विदर्भात (Vidarbha) गडचिरोली जिल्ह्यातील दोन तालुके वगळता अद्याप मान्सून सक्रिय झाला नाही. त्यामुळे विदर्भात नेमका दमदार पाऊस (Maharashtra Rain Forecast) कधी पडणार याची प्रतीक्षा शेतकर्यांसह सर्वसामान्यांना लागली आहे. असे असतानाच भारतीय हवामान विभागाने (IMD Forecast) महाराष्ट्रासह विदर्भात पावसाचा अलर्ट जारी केला आहे. विदर्भात आज अनेक जिल्ह्यांसाठी हवामान विभागाकडून (IMD) ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. विदर्भातील नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया अमरावती, आणि अकोला या जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, वर्धा या जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट देण्यात आला आहे.
मराठवाड्यात मोसमी पाऊस जोरदार हजेरी लावणार
राज्यात बहुतांश भागात गेल्या काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली होती. दरम्यान आता पुन्हा पाऊस सक्रिय होऊन पावसाचा जोर पुन्हा वाढणार असल्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे. किंबहुना आगामी चार दिवसासाठी महाराष्ट्रात पावसाचे तीव्र अलर्ट दिले आहेत. प्रादेशिक हवामान अंदाजानुसार, राज्याच्या अंतर्गत भागात कमाल तापमानात 2-3 अंशांची घट होणार असून येत्या तीन ते चार दिवसात कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात मोसमी पाऊस जोरदार हजेरी लावणार आहे. (IMD Forecast)
दर्यापूर तालुक्यात ढगफुटी सदृश पाऊस
अमरावतीच्या दर्यापूर तालुक्यामध्ये काल(11 जून) बुधवार रोजी दुपारच्या सुमारास अचानक आलेल्या वादळीवारासह मुसळधार पाऊस झाला. नांदरुण या भागामध्ये अचानक ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने मोठ्या प्रमाणात शेतांमध्ये पाणी साचलेले होते. तर रामतीर्थ येथे वादळी वाऱ्यामुळे झाडे कोसळली आणि अनेकांच्या घराचे सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे शासनाने तात्काळ आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी आता करण्यात येत आहे.
वाशिम जिल्ह्यात काल(11 जून) सायंकाळच्या सुमारास झालेल्या वादळी वाऱ्यासह विजेच्या कडकडाटात जोरदारपणे पाऊस बरसल्याने जनजीवन विस्कळीत झाल्याच पाहायला मिळालं. यात अनेकांच्या घरावरील छत टिनपत्रे वादळी वाऱ्याने उडाल्याने नागरिकांना उघड्यावर झोपण्याची वेळ आली. तर अनेकांच्या जीवन उपयोगी साहित्य भिजल्याचं पाहायला मिळालं. यात रिसोड तालुक्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय.
इतर महत्वाच्या बातम्या
























