Nagpur : जिल्ह्यात घडवणार 900 नवउद्योजक ; प्रत्येकी 50 लक्षपर्यंतचे कर्ज उपलब्ध
उत्पादन व्यवसायांसाठी दाल मिल, रेडीमेड गारमेंट्स, डेअरी प्रोडक्ट आदींसाठी कर्ज उपलब्ध आहे. तर सेवा व्यवसायासाठी रिपेरिंग सेंटर, सलून ब्युटी पार्लर, झेरॉक्स सेंटर आदींसाठी कर्ज देण्यात येत आहे.
नागपूर : राज्य शासनाच्या उद्योग संचालनालय अंतर्गत मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम अंतर्गत एकट्या नागपूर जिल्ह्यामध्ये 900 नवउद्योजक घडवायचे उद्दिष्ट जिल्हा उद्योग केंद्राला मिळाले आहे. सातवी पास पासून पीएचडी पर्यंत उद्योग व्यवसायाची आवड असणाऱ्या कोणालाही ही संधी मिळू शकते. 50 लाखाचे कर्ज व त्यातही 35 टक्क्यांपर्यंत सबसिडी शासन द्यायला तयार आहे. तरुणांनी या संधीचा फायदा घेण्याचे आवाहन जिल्हा उद्योग केंद्र मार्फत करण्यात आले आहे.
तुमच्या मनात उद्योगाची महत्वकांक्षा असेल, नवीन काहीतरी करून दाखवण्याची धडाडी असेल, आणि स्टार्टअप सुरु करून उद्योजक बनायचे असेल, तर ही सुवर्ण संधी आहे. सर्व जातीपातींसाठी ही संधी खुली असून कर्जाचा प्रस्ताव तयार करण्यासाठी फोटो, आधार कार्ड, जन्म दाखला, शैक्षणिक पात्रता, प्रकल्प अहवाल (तो वेबसाईट वर तयार करता येतो) मागासवर्गीय असल्यास जातीचे प्रमाणपत्र, विशेष प्रवर्ग असेल तर अपंग किंवा माजी सैनिक असेल तर प्रमाणपत्र, कौशल्य विकास प्रशिक्षण झाले असेल तर सर्टिफिकेट किंवा नंतरही प्रशिक्षण घेता येऊ शकते. पॅन कार्ड आणि लोकसंख्येचा दाखला देणे गरजेचे आहे. अठरा वर्षाच्या वय पूर्ण केलेल्या कोणत्याही नागरिकाला अशा प्रकारची संधी उपलब्ध आहे. मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत ही संधी दिली जात असल्यामुळे यापूर्वी प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत व अन्य विभागातील महामंडळाकडून अनुदान आधारित स्वयंरोजगार योजनेचा लाभ घेतलेला नसावा एवढी एकच अट यामध्ये ठेवण्यात आली आहे.
या योजनेसाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने अर्ज करता येतो. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी https://maha-cmegp.gov.in/onlineapplication ही वेबसाईट आहे तर ऑफलाईन अर्जासाठी जिल्हा उद्योग केंद्र नागपूर येथे भेट देऊन माहिती घ्यायची आहे.
या व्यवसायासाठी मिळेल कर्ज
राज्य शासन उद्योग व्यवसाय उभारणाऱ्या युवकांसाठी मदतीची रक्कम तयार आहे. योग्य उमेदवाराने तातडीने याचा लाभ घेण्याचे आवाहन देखील करण्यात आले आहे. उत्पादन व्यवसायांसाठी म्हणजे दाल मिल, रेडीमेड गारमेंट्स, राईसल मिल, डेअरी प्रोडक्ट, फॅब्रिकेशन, अन्न व फळ प्रक्रिया, बेकरी, मसाला उत्पादन, अगरबत्ती उत्पादन सोयामिल्क, गृहउद्योग, फर्निचर आदी व्यवसायासाठी पन्नास लाख रुपयांपर्यंत कर्ज मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत दिले जात आहे.
या सेवा व्यावसायांसाठीही करता येईल अर्ज
सेवा उद्योग व्यवसायासाठी जास्तीत जास्त दहा लाख मर्यादेपर्यंत अर्ज करता येतो सेवा उद्योग मध्ये रिपेरिंग सेंटर, सलून ब्युटी पार्लर, झेरॉक्स सेंटर, कॉम्प्युटर जाबवर्क, पॅथॉलॉजी लॅब, शाकाहारी भोजनालय, पिठाची चक्की, जिम अशा उद्योगाची उभारणी करता येऊ शकते. उद्योग उभारण्याची इच्छा असणाऱ्यांना व्यवसाय मार्गदर्शन देखील या ठिकाणी केले जाते. मोजक्या कालावधीसाठी व 900 लाभार्थ्यांपर्यंत ही संधी उपलब्ध आहे. त्यामुळे या संधीचा तातडीने फायदा घेण्याबाबतची आवाहन करण्यात आले आहे, अधिक माहितीसाठी जिल्हा उद्योग केंद्रासोबत संपर्क करावा, असे आवाहन करण्यात आले.