Ambabai Mandir Kolhapur : अंबाबाईच्या दर्शनासाठी येणाऱ्या महिला भाविकांची कुचंबणा; आधी रांगेतून दर्शन मग स्वच्छतागृह शोधण्यासाठी पायपीठ
कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यापासून पर्यटकांनी गजबजून गेला आहे. करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरामध्ये 24 डिसेंबर ते 1 जानेवारीपर्यंत तब्बल 7 लाखांवर भाविकांनी भेट दिली आहे.
Ambabai Mandir Kolhapur : कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यापासून पर्यटकांनी गजबजून गेला आहे. करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरामध्ये 24 डिसेंबर ते 1 जानेवारीपर्यंत तब्बल 7 लाखांवर भाविकांनी भेट दिली आहे. मात्र, मंदिर परिसरात महिला भाविकांची कुचंबणा होत असल्याने संतापाचा कडेलोट झाला आहे. कोल्हापूर शहरात येणाऱ्या महिला भाविकांना अंबाबाई मंदिर, रंकाळा तलाव, भवानी मंडप, चप्पल लाईन, टाऊन हॉल म्युझियम यांसारख्या लोकप्रिय पर्यटन स्थळांजवळ सार्वजनिक स्वच्छतागृह, स्वच्छतागृह किंवा स्तनपान करण्यासाठी शोधताना चांगलीच दमछाक होत आहे.
महिलांना स्वच्छतागृह शोधण्याची वेळ
नववर्षाचे स्वागत अंबाबाई चरणी नतमस्तक होऊन करण्यासाठी तब्बल 1 लाख 71 हजार भाविकांनी भेट दिली होती. यामध्ये महिला भाविकांसह तरुणींचा सुद्धा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. मात्र, स्वच्छतागृहाची वाणवा असल्याने त्यांना गैरसोयींना सामोरे जावं लागत आहे. बाहेरील जिल्ह्यातून तसेच परराज्यातून आलेल्या महिला भाविक याबाबत खंत बोलून दाखवत आहेत. एका महिला भाविकाने सांगितले की, मंदिरात दर्शन रांगेत दोन तासांहून अधिक वेळ घालवल्यानंतर सार्वजनिक शौचालय शोधण्यासाठी जावे लागले. शोधाशोध केल्यानंतर न सापडल्याने अखेर विनंती करून स्वच्छतागृहात जावं लागलं.
दरम्यान, महालक्ष्मी मंदिराचे व्यवस्थापन करणाऱ्या पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव शिवराज नायकवडे यांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या नोंदणी कार्यालयाबाहेर बांधकाम सुरू असलेल्या शौचालय सुविधेला विरोध झाल्याने कोल्हापूर महानगरपालिकेने मंदिराबाहेर फिरते वाहन टॉयलेट उभे केले. मात्र, गळतीची समस्या येऊ लागली. तूर्तास, पर्यटक राजाराम हायस्कूलच्या स्वच्छतागृहाचा वापर करत आहेत. परंतु, आम्ही यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याचा प्रयत्न करत आहोत.
पर्यटकांच्या वाढलेल्या गर्दीमुळे कोल्हापुरातील वाहतूक व्यवस्थेवरही ताण येत आहे. गेल्या काही दिवसांपासून आठवडाभरापासून कोल्हापूरमध्ये भाविकांचा गर्दीचा अक्षरशः महापूर सुरू आहे.
महापालिकेच्या स्वच्छतागृहांना विरोध
दुसरीकडे, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांनी दिलेल्या माहितीनुसार कोल्हापूर महानगरपालिकेने (Kolhapur Municipal Corporation) शहरातील 10 पर्यटनस्थळांवर टॉयलेट बांधण्याचा प्रस्ताव दिला आहे. मंजूर झाल्यानंतर सशुल्क सुविधा निर्माण केल्या जातील. यापूर्वी महापालिकेने बीओटी पद्धतीने 11 स्वच्छतागृहे तयार केली होती, मात्र, स्थानिकांनी या बांधकामाला विरोध केला होता. आणखी 19 शौचालयांचे बांधकामही रखडले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या