Shahu Maharaj in Kolhapur Loksabha : कोल्हापुरातून महाविकास आघाडीकडून शाहू महाराजांनाच उमेदवारी का? ही आहेत 5 कारणे
ठाकरेंकडील जागा काँग्रेसने आपल्याकडे घेत महाराजांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे महायुतीकडून त्यांच्याविरोधात मंडलिक असणार की भाजप उमेदवार बदलून आपला उमेदवार देणार? हे काही दिवसांमध्ये स्पष्ट होईल.
![Shahu Maharaj in Kolhapur Loksabha : कोल्हापुरातून महाविकास आघाडीकडून शाहू महाराजांनाच उमेदवारी का? ही आहेत 5 कारणे Why only Shahu Maharaj is nominated by Mahavikas Aghadi from Kolhapur loksabha Here are 5 reasons congress Shahu Maharaj in Kolhapur Loksabha : कोल्हापुरातून महाविकास आघाडीकडून शाहू महाराजांनाच उमेदवारी का? ही आहेत 5 कारणे](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/03/21/ca024138dea1f6e76f535cc5bb1b2b281711038502353736_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
कोल्हापूर : कोल्हापूर नगरीने शाहू महाराजांचा वारसा अभिमानाने जपताना राज्याला नव्हे, तर संपूर्ण देशाला पुरोगामी विचारांची दिशा दिली आहे. जे या करवीर नगरीत घडतं त्याचा संदेश देशपातळीवर दिला जातो, असा कोल्हापूरी विचारांचा पुरोगामी बाणा आहे. मात्र, त्याच विचाराला प्रतिगामी शक्तींकडून जाणीवपूर्वक बोट लावण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे 2023 या सरत्या वर्षात सातत्याने दिसून आले. मात्र, राजर्षी शाहूंच्या विचारांचा आणि कृतीचा वारसदार असलेल्या श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांनी थेट रस्त्यावर उतरून प्रतिगामी शक्तींना वेळीच जागा दाखवून दिली. तेच शाहू महाराज आता कोल्हापूर लोकसभा (Kolhapur Loksabha) निवडणुकीच्या रिंगणात असतील. महाविकास आघाडीने (Maha Vikas Aghadi) त्यांना उमेदवारीसाठी साद घातली होती. तिन्ही पक्षांनी त्यांना उमेदवारीसाठी आग्रह धरला होता. अखेर ठाकरेंकडील जागा काँग्रेसने आपल्याकडे घेत महाराजांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे महायुतीकडून त्यांच्याविरोधात संजय मंडलिक असणार की भाजप उमेदवार बदलून आपला उमेदवार देणार? हे काही दिवसांमध्ये स्पष्ट होईल.
उद्धव ठाकरेंनी न्यू पॅलेसवर घेतली भेट
महाविकास आघाडीकडून शाहू महाराजांच्या उमेदवारीची केवळ औपचारिकता राहिली होती. त्यामुळे आज (21 मार्च) कोल्हापुरात आलेल्या शाहू महाराज यांची उद्धव ठाकरे यांनी भेट घेतली. या भेटी त्यांनी शुभेच्छा घेत त्यांचा आशीर्वाद घेतल्याचेही ठाकरे म्हणाले.
कोल्हापूर लोकसभेला काँग्रेसची ताकद
दरम्यान, कोल्हापूर दक्षिण, कोल्हापूर उत्तर, करवीरमध्ये काँग्रेसचे आमदार आहेत. आमदार सतेज पाटील आणि विधानपरिषेदवर आहेत, तर जयंत आसगावकर हे शिक्षक पदवीधर संघातून आमदार आहेत. त्यामुळे कोल्हापूर लोकसभेला काँग्रेसची ताकद आहे. या सर्व पार्श्वभूमीवर कोल्हापूर काँग्रेस जिल्हाध्यक्ष सतेज पाटील यांनी कोल्हापूर लोकसभेला सरप्राईज चेहरा असेल असे म्हटले होते. यानंतर सतेज पाटील यांनी शाहू महाराज यांच्या उमेदवारीसाठी यांनी प्रयत्न सुरु केले होते. संभाजीराजे यांना शांत करण्यातही महाविकास आघाडीला यश आले. शाहू महाराज यांनी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर एबीपी माझाशी बोलताना सर्वाचे आभार मानले. जनतेची सेवा करण्याची संधी मिळाल्याचेही त्यांनी नमूद केले.
कोल्हापूरला दंगलीचा डाग लागताच महाराज रस्त्यावर
राज्यात 2023 मध्ये अनेक ठिकाणी दंगलीचे प्रसंग घडले. राज्यातील अनेक जिल्ह्यात जातीय आणि धार्मिक दुफळी निर्माण करण्याचा प्रयत्न झाला. यामध्ये कोल्हापूर सुद्धा मागे राहिले नाही. ज्या शिवाजी महाराज आणि छत्रपती शाहूंच्या पदस्पर्शाने आणि कृतीने पावन झाला त्या कोल्हापूरला सुद्धा शिवराज्यभिषेक दिनी दंगलीचा डाग लागला. यानंतर पोलिसांच्या भूमिकेवर शाहू महाराज यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित करून वाचा फोडली होती.
कोल्हापूरला डाग लावणाऱ्यांना सद्भावना रॅलीतून कडक प्रत्युत्तर
कोल्हापुरात गेल्यावर्षी 7 जून रोजी झालेल्या धार्मिक दंगलीनंतर पुन्हा एकोपा नांदण्यासाठी राजर्षी शाहू सलोखा मंचकडून शाहू सद्भावना रॅली आणि सभेचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीत स्वत: शाहू महाराज रस्त्यावर उतरले. गेल्या 100 वर्षात कोल्हापूरला डाग लागला नाही तो 7 जून रोजी लागल्याची खंत त्यांनी व्यक्त करताना प्रतिगामी शक्तींना खडे बोल सुनावले. कोल्हापूर टार्गेट केल आहे. मात्र, ते टार्गेट त्यांच्यासाठी कठीण आहे, कोल्हापूरला कोणतीही गोळी लागणार नाही, असा निर्धार शाहू महाराजांनी शिव शाहू सद्भावना रॅलीनंतर झालेल्या सभेत बोलून दाखवला होता. यानंतर कोल्हापुरातील वातावरण निवळले होते.
सामाजिक उपक्रमात सहभाग
कोल्हापूरला दंगलीचा डाग लागल्यानंतर सातत्याने सामाजिक उपक्रमात हिरारीने महाराजांनी रस्त्यावर उतरून सहभाग नोंदवला आहे. सामाजिक एकोपा टिकवण्यासाठी खडेबोल सुद्धा सुनावले आहेत. लोकराजा शाहू महाराजांच्या जयंतीदिनी रिक्षातून प्रवास करत साधेपणा दाखवून दिला होता.
मराठा आंदोलनाला पाठिंबा
मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आंदोलनासाठी रान पेटवल्यानंतर शाहू महाराज यांनी थेट आंतरवाली सराटीत जाऊन त्यांची भेट घेतली होती. सरकारला शब्द मानावाच लागेल, याचीही आठवण त्यांनी जरांगेच्या व्यासपीठावरून करून दिली होती. यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी कोल्हापूर दौरा केल्यानंतर महाराज व्यासपीठावर उपस्थित होते. शाहू महाराजांनी राष्ट्रवादी फुटल्यानंतर शरद पवारांच्या सभेचे अध्यक्षपद सुद्धा स्वीकारले होते.
शेतकऱ्यांसाठी हायवेवर पोहोचले
कोल्हापुरात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी गेल्यावर्षी प्रखर आंदोलन करताना महामार्ग रोखून धरला होता. त्यावेळी कोणाच्या ध्यानीमनी नसताना महाराज भर उन्हात थेट हायवेवर पोहोचून राजू शेट्टी यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला होता. साखरसम्राट राजू शेट्टींच्या विरोधात असतानाही महाराजांनी शेतकऱ्यांची बाजू लावून धरताना राजू शेट्टी यांनी केलेल्या आंदोलनाला महाराजांनी बळ दिले होते.
इतर महत्वाच्या बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)