Raj Thackeray In Kolhapur : राज ठाकरेंना ज्येष्ठ इतिहास संशोधक जयसिंगराव पवारांनी कोणता सल्ला दिला?
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज कोल्हापूर दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी ज्येष्ठ इतिहास संशोधक डाॅ. जयसिंगराव पवार यांची भेट घेतली. या भेटीनंतर पवार यांच्याशी एबीपी माझाने संवाद साधला.
Raj Thackeray In Kolhapur : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज कोल्हापूर दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी ज्येष्ठ इतिहास संशोधक डाॅ. जयसिंगराव पवार यांची भेट घेतली. या भेटीनंतर पवार यांच्याशी एबीपी माझाने संवाद साधला. यावेळी बोलताना पवार यांनी राज ठाकरेंच्या हाती सत्ता गेल्यास जनतेला नवीन काहीतरी पाहायला मिळेल, अशी आशा व्यक्त केली. राज ठाकरे व्यक्ती म्हणून सत्यनिष्ठ वाटतात, लबाड बोलणारा, आशा पल्लवित करणारा वाटत नसल्याचेही त्यांनी नमूद केले. भोंग्याचे उदाहरण देत जेव्हा एखाद्या विषयाला हात घालता त्यावेळी तो पूर्ण करा असेही राज यांना सांगितल्याचे पवार म्हणाले. यानंतर राज यांनी उपक्रम पूर्ण आम्ही करणारच असल्याचे सांगत लोकांकडूनही सहकार्य अपेक्षित असल्याचे म्हणाल्याचे डाॅ. जयसिंगराव पवार यांनी सांगितले.
जयसिंगराव पवार यांनी भेटीनंतर बोलताना सांगितले की, राज ठाकरे यांच्याशी दुसऱ्यांदा भेट होती. राज काही ठरवून आले नव्हते. माझं संपूर्ण आयुष्य इतिहासाला वाहिलं आहे. त्यामुळे चर्चा इतिहासाभोवती झाली. सत्य इतिहास काय असतो, त्यातून निर्माण होणाऱ्या कलाकृती कशा असाव्यात, कोणत्या तत्वानुसार असली पाहिजेत, हे मी त्यांना सांगितलं.
बाबासाहेबांचा इतिहास खोटा कसा म्हणून चालेल?
बाबासाहेब पुरंदरे यांनी सांगितलेला सगळाच इतिहास खोटा आहे असं कसं म्हणून चालेल? असेही डाॅ. जयसिंगराव पवार म्हणाले. कागदोपत्री सिद्ध होतो तो इतिहास असतो. बाबासाहेबांच्या काही गोष्टी आम्हाला स्वीकाराव्या वाटत नाही, त्यावेळी आम्ही विरोध केला. आज त्याची उजळणी करण्याची किंवा चर्चा करण्याचा मुद्दा नाही. राज यांनी बाबासाहेबांचा दोनवेळा उल्लेख केला. शिवचरित्रकार गजानन मेहेंदळे यांच्याशी त्यांची चर्चा झाली.
हाती सत्ता दिल्यास काही तरी भरीव होऊ शकेल, आमच्यासारखी माणसे त्यांना विचारु शकतील. त्यांना महाराणी ताराराणी यांचा ग्रंथ भेट दिल्यानंतर राज यांनी महाराणी ताराराणींचे नाव घेणारा मी एकमेव राजकारणी असल्याचे ते म्हणाले. ग्रंथ भेट दिल्यानंतर प्रस्तावनेतील पहिलं आणि दुसरं पान वाचण्यास सांगितलं असल्याचेही जयसिंगराव पवार म्हणाले.
जनता पैशाला भीक घालत नाही; हसन मुश्रीफांचे राज ठाकरेंना कडक प्रत्युत्तर
दरम्यान, दरडोई उत्पन्नामध्ये कोल्हापूर जिल्हा देशात अव्वल स्थानी आहे, जनता पैशाला भीक घालत नाही, अशा शब्दात माजी मंत्री आमदार हसन मुश्रीफ यांनी राज ठाकरेंना प्रत्युत्तर दिले आहे. कोल्हापूरच्या 'पाकीट पॅटर्न'मुळे वाट लागली या राज ठाकरेंच्या वक्तव्याचा निषेध करत असल्याचे मुश्रीफ यांनी म्हटले आहे. राज ठाकरे यांनी केलेले वक्तव्य म्हणजे कोल्हापुरातील जनतेचा अपमान असल्याचेही ते म्हणाले. राज ठाकरे दोन दिवसांच्या कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. काल त्यांनी कोल्हापूरमध्ये पत्रकार परिषद घेतल्यानंतर कोल्हापूरच्या 'पाकीट पॅटर्न'मुळे वाट लागल्याचे वक्तव्य केले होते. कोल्हापुरातील जनता पैसे घेऊन मतदान करतात असे राज ठाकरे यांना म्हणायचे आहे का? अशी विचारणाही त्यांनी केली.
इतर महत्वाच्या बातम्या