Sharad Pawar : आम्ही हवी ती किंमत देऊ, पण देशात हुकूमशाही येऊ देणार नाही; शरद पवारांचा मोदींवर हल्लाबोल
Sharad Pawar : चलकरंजीमध्ये हातकणंगलेमधील लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजित पाटील यांच्या प्रचारार्थ सभा झाली. या सभेत बोलताना शरद पवार यांनी मोदींच्या कारभाराचा समाचार घेतला.
इचलकरंजी (जि. कोल्हापूर) : गेल्या अनेक दिवसांपासून लोकसभा निवडणुकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात सभा घेत आहेत. मात्र, या सभांमधून महाराष्ट्राच्या हितासाठी काय करणार हे न सांगता फक्त शरद पवार आणि उद्धव ठाकरेंवर प्रत्येक सभेतून टीका करत असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली. इचलकरंजीमध्ये हातकणंगलेमधील लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजित पाटील यांच्या प्रचारार्थ सभा झाली. या सभेत बोलताना शरद पवार यांनी मोदींच्या कारभाराचा समाचार घेतला.
मोदी हळूहळू हुकूमशाही आणत आहेत
शरद पवार म्हणाले की, फक्त विसंगत भूमिका घेतली म्हणून झारखंडच्या मुख्यमंत्र्यांना जेलमध्ये टाकण्यात आले. लोकननियुक्त नेत्याला अटक केली जात आहे. शिक्षणासाठी काम करणाऱ्या केजरीवालांना जेलमध्ये टाकले. मोदी या माध्यमातून निवडून दिलेल्या मुख्यमंत्र्यांना जेलमध्ये टाकत आहेत. त्यामुळे मोदी हळूहळू हुकूमशाही आणत आहेत. मात्र, आपण हवी ती किंमत मोजू, पण हुकुमशाही येऊ देणार नाही, अशा शब्दात हल्लाबोल केला.
सत्यजित नावामध्ये जित असल्याने ते मोठ्या मताने जिंकणार
तत्पूर्वी, त्यांनी इचलकरंजीमधील नेत्यांच्या आठवणींना उजाळा दिला. दत्ताजीराव कदम, कैलास खंजिरे यांची आठवण त्यांनी करून दिली. संबंध देशाला यंत्रमागच्या माध्यमातून इचकरंजी शहराची ओळख आहे. मात्र, यंत्रमाग अडचणीत असताना राज्यकर्ते ढुंकून बघत नसल्याचे ते म्हणाले. आमच्या दृष्टीने शेती सुद्धा महत्वाची असल्याचे ते म्हणाले. त्यांनी पुढे सांगतिले की, सत्यजित पाटलांची निवड आम्ही सर्वांनी केली आहे. सत्यजित नावामध्ये जित असल्याने ते मोठ्या मताने जिंकणार, असा विश्वास असल्याचे ते म्हणाले.
चारशे पार नारा सोडला, दोनशे पारही होणार नाहीत
राष्टवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही भाजपवर जोरदार टीका केली. त्यांनी चारशे पारचा नारा बंद केला असून आता दोनशे पार सुद्धा होणार नसल्याचा टोला जयंत पाटील यांनी लगावला. इचलकरंजी प्रश्न सोडवण्यासाठी वैयक्तिक लक्ष घालणार असल्याचेही ते म्हणाले.
इतर महत्वाच्या बातम्या