Shivsena : 'वंचित'चे हाजी अस्लम सय्यद शिवबंधनात; हातकणंगले मतदारसंघात धैर्यशील माने- राजू शेट्टींसमोर अडचणी वाढणार?
Shivsena : वंचित बहुजन आघाडीचे (VBA) 2019 मधील कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले लोकसभा (Hatkanangale Lok Sabha) मतदारसंघातील उमेदवार हाजी अस्लम सय्यद यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे.
Shivsena : वंचित बहुजन आघाडीचे (VBA) 2019 मधील कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले लोकसभा (Hatkanangale Lok Sabha) मतदारसंघातील उमेदवार हाजी अस्लम सय्यद यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या उपस्थितीत अस्लम यांनी मंगळवारी मातोश्रीवर शिवबंधन बांधले. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीकडून निवडणूक लढविताना त्यांनी जोरदार टक्कर देत सव्वा लाखांवर मते मिळवली होती. त्यानंतर हाजी अस्लम चर्चेत आले होते.
यावेळी शिवसेना सचिव खासदार विनायक राऊत, उपनेते तथा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर,जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव, आसिफ सौदागर, संतोष शिंदे, मोहसीन मुल्लानी,फिरोझ महात,यासीन पठाण,साकिद पठाण यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
Shivsena : हाजी अस्लम सय्यद; फटका बसणार?
हाजी अस्लम यांना 2019 मते मिळालेली मते राजकीय भूवया उंचावणारी होती. वंचित बहुजन आघाडी पहिल्यांदाच रिंगणात असताना त्यांना मिळालेल्या मतांनी सर्वाधिक फटका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांना बसला होता. खासदार धैर्यशील माने यांच्या विजयात अस्लम सय्यद यांना मिळालेल्या मतांचाही मोठा वाटा होता.
हातकणंगले मतदारसंघातील हाजी असलम बादशाह सय्यद यांनी आज शिवसेना पक्षप्रमुख मा. उद्धवसाहेब ठाकरे यांच्या हातून शिवबंधन बांधून घेत शिवसेनेत प्रवेश केला.#ShivSena pic.twitter.com/7QytOZg8Hr
— Shivsena Communication (@ShivsenaComms) December 6, 2022
कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यात राजकीय समीकरणे बदलली
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेला खिंडार पाडल्यानंतर कोल्हापूर (kolhapur) जिल्ह्यातही फटका बसला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील दोन्ही शिवसेना खासदार संजय मंडलिक आणि धैर्यशील माने शिंदे गटात सामील झाले आहेत. शिवसेना आमदार प्रकाश आबिटकर, माजी आमदार राजेश क्षीरसागर सुद्धा शिंदे गटात आहेत. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलली आहेत. जिल्ह्यातील दोन्ही मतदारसंघावर भाजपकडून (BJP in Kolhapur) विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. भाजपच्या आतापर्यंत दोन केंद्रीय मंत्र्यांचा दौरा पार पडला आहे. त्यामुळे शिंदे गटात गेलेल्या मंडलिक माने यांना भाजप चिन्हावर लढण्यास सांगतिलं जाणार की भाजपचा स्वतंत्र उमेदवार असेल याबाबत अजूनही स्पष्टता नाही.
अशा परिस्थितीत सव्वा लाख मते मिळवलेल्या हाजी अस्लम यांच्या शिवसेना प्रवेशाने हातकणंगलेत शिवसेनेला लाभ होईल, अशी आशा आहे. धैर्यशील माने यांच्याविरोधात स्वतंत्रपणे राजू शेट्टी असतील. त्यांनी कोणाचाही पाठिंबा न घेता स्वतंत्रपणे लढण्याचा निर्णय आजघडीला, तरी घेतला आहे. त्यामुळे शिवसेनेकडूनही दोन्ही जागा लढवण्याचा निर्णय घेतल्यास राजू शेट्टी आणि धैर्यशील माने यांच्यासमोर अडचण वाढण्याची शक्यता आहे.
वंचित आघाडीला महाविकास आघाडीत सामील करण्यासाठी उद्धव ठाकरे प्रयत्न करत आहेत. ही बोलणी यशस्वी ठरल्यास हातकणंगले लोकसभा मतदारसंघात वंचितला मिळालेली मते निर्णायक ठरण्याची शक्यता आहे.
इतर महत्वाच्या बातम्या