Jyotiraditya Scindia in kolhapur : केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे उद्यापासून कोल्हापूर दौऱ्यावर
Jyotiraditya Scindia in Kolhapur : केंद्रीय विमान वाहतूकमंत्री ज्योतिरादित्य शिंदे उद्यापासून दोन दिवसीय कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. दोन्ही लोकसभा मतदारसंघात त्यांचे कार्यक्रम असतील.
Jyotiraditya Scindia in kolhapur : केंद्रीय विमान वाहतूकमंत्री ज्योतिरादित्य शिंदे (Jyotiraditya Scindia) उद्यापासून दोनदिवसीय कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. गुरुवार (19 जानेवारी) आणि शुक्रवार (20 जानेवारी)असा त्यांचा दोन्ही लोकसभा मतदारसंघात कार्यक्रम असेल. शिंदे यांच्या नियोजित दौऱ्यानुसार इचलकरंजी, कोल्हापूर शहरात कार्यक्रम होतील. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेऊन ते जिल्ह्यातील विकासकामांचा आढावा घेणार आहेत.
उद्या सकाळी साडे अकरा वाजता शिंदे यांचे कोल्हापूर विमानतळावर आगमन होईल. त्यानंतर ते इचलकरंजीला रवाना होतील. शिवतीर्थावर जाऊन ते छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करतील. त्यानंतर दुपारी 3 वाजता पंचरत्न हॉलमध्ये त्यांचा कार्यक्रम आहे. 4 वाजता नाट्यगृह चौकात त्यांचा कार्यक्रम होईल. त्यानंतर तारदाळमध्ये पाणीपुरवठा योजनेचे उद्घाटन करणार आहेत. त्यानंतर सायंकाळी 7 वाजता आळते येथे त्यांच्या उपस्थितीत कार्यक्रम होणार आहे. रात्री ते कोल्हापुरात मुक्कामासाठी येतील.
शुक्रवारी विकासकामांचा आढावा घेणार
ज्योतिरादित्य शिंदे शुक्रवारी (20 जानेवारी) सकाळी जिल्ह्यातील विविध विकासकामांचा आढावा घेणार आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक पार पडेल. दुपारी साडे बारा वाजता संभाजीनगरमध्ये त्यांच्या उपस्थितीत कार्यक्रम होणार आहे. तेथून ते शिरोली येथे होणाऱ्या कार्यक्रमासाठी जातील. त्यानंतर ते पुणे विमानतळाकडे मार्गस्थ होतील. तेथून ते विमानाने दिल्लीला रवाना होतील.
कोल्हापूर देशातील प्रत्येक शहराला जोडणार
दरम्यान, 13 जानेवारीला कोल्हापूर ते बंगळूर विमानसेवा सुरु झाली. यावेळी शिंदे यांनी (Jyotiraditya Scindia) कोल्हापूरला (kolhapur airport) प्रत्येक देशातील प्रत्येक शहराला जोडण्याची ग्वाही दिली. ते म्हणाले की, "राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या कार्यामुळे जगभरात कोल्हापूरला ओळखले जाते. कोल्हापूर विमानतळ विकासासाठी आजवर 255 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला असून कोल्हापूरचा विकास आणि प्रगती साधण्यासाठी यापुढेही इथल्या विमानतळ विकासाला प्राधान्य देण्यात येईल."
तीन महिन्यांनी दुसऱ्यांदा दौरा
दरम्यान, ज्योतिरादित्य शिंदे तीन महिन्यांमध्ये भाजपच्या लोकसभा मतदारसंघ प्रवास योजनेनुसार दुसऱ्यांदा दौऱ्यावर येत आहेत. यापूर्वी, ते सप्टेंबर महिन्यात कोल्हापूर दौऱ्यावर आले होते. या दौऱ्यात शिंदे यांनी कुलदैवत असलेल्या जोतिबा डोंगरावर तसेच कोल्हापूरमध्ये अंबाबाईचे दर्शन घेतले होते. ही माझ्या अस्तित्वाची माती असून माझे कौटुंबिक संबंध आहेत. छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, शिंदे महाराज यांची विचारधारा या मातीत येऊन पुढे घेऊन जाण्याचा संकल्प केल्याचे त्यांनी नमूद केले होते.
राजमाता विजयाराजे शिंदे यांच्या तैलचित्राचे अनावरण
याच दौऱ्यामध्ये राजश्री छत्रपती शाहू महाराज कॉलेज ऑफ ॲग्रीकल्चरमध्ये बसवण्यात आलेल्या राजमाता विजयाराजे शिंदे यांच्या तैलचित्राचे अनावरण त्यांच्या हस्ते करण्यात आले होते. राजमातांचे समर्पण विद्यार्थ्यांना प्रेरणा देईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली होती.
इतर महत्वाच्या बातम्या